कोसला समीक्षा अणि विश्लेषण || Kosla Book Review & Analysis

कोसला

समीक्षा अणि विश्लेषण



भटकते भूत कोठे हिंडते?

पूर्वेकडे? की उत्तरेकडे.

पश्चिमेकडे? की दक्षिणेकडे. 

देवाचे अन्न पृथ्वीच्या कोपऱ्याकोपऱ्यात विखुरले आहे आणि तुला 

ते खाता येत नाही, कारण तू मेलेला आहेस.

ये, हे भटकत्या भूतां, ये.  म्हणजे तुझी सुटका होईल आणि तू 

मार्गस्थ होशील. 

                                           ~ तिबेटी प्रार्थना 

  • माझं आणि कोसलाच असलेलं नातं:

     मित्रांनो, मराठी वाङमयाबद्दल बोलायचं झालं तर माझं इतकं काही फारसं वाचन नाहीये. शाळेत आम्हाला स्टेट बोर्डाने मराठी पाठ्यक्रमात जे शिकवले ते व बाकी सर्व चांदोबा, ठकठक, चंपक व इतर बालमासिकें व दैनिकांमधील सदरे हीच सर्वे माझी मराठी साहित्याशी असलेली ओळख. अधून मधून वडील मला वाचण्यासाठी प्रभोधनकार ठाकरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. पानसरे अशा मोठ्या मंडळींची पुस्तके आणत असत व तीही मी तितक्याच कुतूहलाने वाचत असत. लहानपणी वाचल्यामुळे ह्या पुस्तकांचं समाजात असलेले महत्व व त्यांचा क्रांतिकारी गाभा मला काही एवढा समजला नाही आणि मी मराठी साहित्याकडे दुर्लक्ष करत राहिलो.

    हे सर्व तेव्हा बदललं जेव्हा माझं माझ्या तत्वज्ञानाच्या प्राध्यापकांशी बोलणं होऊ लागलं. ते आमच्या संवादात अधून मधून मराठी साहित्याची रेफरेंन्सेस द्यायचे. त्यातलेच एक लेखक म्हणजे आमचे भालचंद्र नेमाडे. नक्की हा माणूस लिहितो तरी काय कि माझे सर ह्याचे इतके गोडवे गातात हे बघण्यासाठी म्हणून मी हे पुस्तक मागवले आणि व्हायचं ते झालं, मी underrated मराठी साहित्याच्या (underrated in the sense, real literary treasure of Marathi language is overshadowed & hidden by mediocre books written in 'platonic' language & we are the ones to take the blame) प्रेमात पडलो. 

  • भालचंद्र नेमाडे व कोसला:

     भालचंद्र नेमाडे हे मराठी साहित्यातील नावाजलेलं नाव आहे आणि कोसला ही त्यांची पहिली व सर्वात जास्त विक्री झालेली कादंबरी आहे. कोसला हे नेमाडेंनी १९६३ मध्ये पब्लिश केले आहे आणि तेव्हा पासून हे पुस्तक आता पर्यंत २५ पेक्षा जास्त वेळा रिप्रिंट आहे. बऱ्याच नैराश्यग्रस्त तरुणांनी ६० व ७० च्या दशकात हे पुस्तक वाचून आत्महत्या केल्या आहेत. नेमाडेंबद्दल अजून माहिती साठी त्यांच्या मुलाखती व भाषणे पहा. 

  • कथेचा सारांश:
  • मी खूप स्पॉईलीश सारांश लिहिला होता व तो ह्या पुस्तकाला मुळीच न्याय देत नाही म्हणून हे amazon.in वरील पब्लिशर चे शब्द जसेच्या तसे पेस्ट करत आहे
     "खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या साऱ्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो." 
                                                                                           ~ पॉप्युलर प्रकाशन, मुंबई 

  • लिखाणाची पद्धत:
    साधारणतः कोणताही मराठी लेखक हा लिहिताना एका विशिष्ट प्रकारची लिखाणाची पद्धत वापरतो. इथे तस काहीही नाहीये. पुस्तक हे first person perspective मध्ये लिहिलं आहे आणि एक जीवनचित्र किंवा आत्मकथन म्हणून वाचक ते वाचतो. बराचसा भाग हा दैनंदिनी लिखाणाचा पद्धतीने लिहिला आहे. व्याकरणाची काही पर्वा करणे किंवा एका linear पद्धतीने पुस्तक लिहिणे अस काहीही केलं गेलेलं नाहीये. पण त्याच्यामुळेच कि काय हे पुस्तक एवढं वेगळ आणि जवळच वाटत (same reason as I said earlier, nobody talks or writes in the self proclaimed 'clean' or 'real' Marathi language in their daily lives). कथेस खूप महत्वाचे असलेले प्रसंग तर असे चितारले आहेत कि वाचक पुस्तक खाली ठेवून विचारात हरवतो किंवा बोलतो कि बस, एवढे पुरे, I need a break. पुस्तकाचा पूर्वार्ध खूप हलका फुलका, मजेशीर व खोचक आहे परंतु उत्तरार्ध हा खूपच दांभिक व मनाला त्रासदायक आहे. पुस्तक संपल्यावर वाचक emotionally पुरता drain झालेला असेल ह्याच हेतूने हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे आणि ते नेमाडेंनी आपल्या लेखणीतून उत्कृष्टपणे साध्य केलं आहे. 


  • पुस्तकाचा गाभा (पुस्तक वाचलं नसेल तर हा मुद्दा skip करा):
       १. परकीयपणा, हरवलेपणा:
     सर्वात महत्वाची theme alienation ही आहे. पांडुरंग हा खेड्यात राहणाऱ्या सगळ्या मुलांप्रमाणे आपल्या छोट्या गावालाच जग समजत असतो व पूर्णपणे आत्मविश्वासू असतो परंतु जसा तो पुण्यात पाय ठेवतो तस त्याचा मनात न्यूनगंडाची भावना निर्माण होते, कॉलेजच्या पहिल्या वर्षात तो पुण्यात व पुण्यातील आपल्या शहरी मित्रांशी जुळून घेण्यासाठी त्यांची सर्व कामे करतो, पैशांची मदत वगैरे करतो पण हेच नंतर त्याचा अंगाशी येतं. नंतर दुसऱ्या वर्षांपासून व पुढे तो अनुभवातून शिकतो व बेजाबदार आणि टवाळ बनतो. ह्यात स्वतःच्या शिक्षणाची वाट लावतो व एक failure बनून राहतो. शहरात काम भेटत नाही आणि गावात परतल्यावर गावात रुळत येत नाही कारण 'शहरातून शिकून आलोय' वाला superiority complex. 

     कथेत जे काही alienation दर्शवणारे प्रसंग आहेत ते १९६० ला जितके खरे होते ते आजही तितकेच खरे आहेत. जेव्हा गावातून मुलं शहरात शिक्षणासाठी जातात तेव्हा त्यांच्यात स्वतःबद्दल कमीपणाची भावना येते. त्यांना शहरात दुसरेपणा किंवा आपण खूप वेगळे आहोत (being the other) असे वाटत राहते. ह्या शहरातून मिळण्यासाठी ते त्यांनी गावाकडून आणलेले चांगलं व वाईट दोन्ही शिकवणी नष्ट करून टाकतात व शहरी राहणीमान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. ह्यात ते स्वतःच स्व पण नष्ट करतात पण ते कधीच शहरी बनत नाहीत आणि शहरी लोक त्यांना आपलसं करत नाहीत. त्यांनी पाहिलेली, छोटी का होईना, जी काई स्वप्न असतात ती ते सोडतात व ऐहिक सुखाचा मागे धावतात ज्यात पैसे व वेळ दोन्ही खर्च होतात. जेव्हा स्वतःचा पायावर उभं राहायची वेळ येते तेव्हा ह्या मुलांकडे काहीच नसते व त्यांना दोनच पर्याय उरतात, पाहिलं म्हणजे आत्महत्या आणि दुसरं म्हणजे समाज आणि परिवार जे बोलेल ते करायचं आणि शहराचं जीवन विसरून जायचं. ह्याचं कारणामुळे बऱ्याच तरुणांनी ६०-७० च्या दशकात आत्महत्या केल्या.

     आपल्या देशाने स्वातंत्र्यकाळी तरुणाईला जी काही स्वप्ने दाखवली, देश ती अजूनही पूर्ण करू शकला नाहीये. आजही देशाचा युवक हा आपल्या भवितव्याबाबतीत उदासीनच आहे आणि ही परिस्तिथी सद्यस्तिथीला खूपच elevate झाली आहे फक्त मोफत internet सेवेमुळे व इतर व्यग्र करणाऱ्या गोष्टींमुळे ह्याची गंभीरता समजून येत नाहीये.

      २. पितृसत्ता:
     पांडुरंगला लहानपणापासून त्याच्या वडिलांबद्दल चीड असते कारण त्याचे वडील सुधन असून देखील पैशास लालची असतात व भौतिकवादास जपतात. वडील जबरदस्ती त्याच्यावर जुनी मूल्य आत्मसात करण्याची जबरदस्ती करत असतात जी पांडुरंगला लहानपणापासूनच अर्थहीन वाटत असतात. पुढे पुण्याला जाऊन त्याचा हा पुरोगामीपणा अजून पक्का होतो व त्याचे वडील त्याच्याशी वाद घालणे सोडून देतात.

     पांडुरंग हा इतका तत्ववादी असतो कि तो शेवटपर्यंत त्याचे views बदलत नाही पण आधी बोलल्याप्रमाणे हो failure बनून गावात आल्यामुळे त्याच्या शब्दाला किंवा पुरोगामी मताला काडीचीही किंमत मिळत नाही.

     पुस्तकाच्या शेवटी पांडुरंग पितृसत्तेला शरण जातो, हार मानतो व आपले वडील जे बोलतील, आपला परिवार जे बोलेल व आपला समाज जे बोलेल तेच आपण करणार ह्याला तो राजी होतो. ह्या मनातल्या मनात केल्या निर्धाराने तो मुळीच खुश नाहीये परंतु ह्या क्षणाला त्याला हे समजून चुकलं आहे कि जर आपण तत्व-तत्व करत बसलो तर आपण ह्या गावात किंवा ऐकून जीवनात काही निभाव लागणार नाही. खरं तर ही वैचारिक प्रगल्भता व हा निर्णय हार नसून हा त्याची स्वतःवर विजय आहे.

      ३. अस्तित्ववाद आणि अनित्यपणा:
     पुस्तकाचा सुरुवातीलाच नेमाडे लिहितात कि हे पुस्तक त्यांनी १०० मधील ९९ वांस उद्देशून लिहिलं आहे, आणि इथूनच ते आपला व आपल्या पांडुरंग चा शुल्लक पणा बोलून टाकतात. आपला कथेतील हिरो हाही काही special नाही आणि वाचणारा मनुष्य हाही काही special नाहीये तर गैरसमज काढून टाका.

    गावात आणि मग शहरात दोन्हीकडे पांडुरंग जगण्याचा अर्थ शिक्षणातून, नात्यांमधून आणि अध्यात्मातून शोधण्याचा प्रयत्न करतो पण दोन्हीही त्याला हताश करतात. त्याला कधीच असं परिपूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. शिक्षण त्याला जगणं कस अनिर्थक आहे हेच सांगते तर नाती त्याला जगणं आणि नाती किती क्षणभुंगर आणि खोटी असू शकतात हे सांगते. त्याचा बहिणीचा मृत्यूने तो सगळ्यांपासून emotionally detach होऊन जातो. अध्यात्मातला फसवेपणा व दुटप्पीपणा त्याला लहानपणीच समजलेला असतो.

     शेवटी घेतलेला निर्णय हाच त्याचा जगण्याशी केलेला एक करार आहे. हो, मी जन्माला आलोय, आत्महत्येची हिम्मत नाही मग आता जागूनच घेतो, जेवढं वाईट व्हायचं तेवढं झालं , आता आणखीन काय होणार ?


  • माझं मत:     
     वैयक्तिक बोलायचं झालं तर मी स्वतः गावातून शहरातून शिक्षण घ्यायला जायचो आणि आता शहरातून गावात शिकवायला जातो. मला कोसला हे खूप जवळच पुस्तक वाटतं. आणि जसं पहिले बोललो तसं, स्वतः नेमाडे म्हणतात की हे पुस्तक त्यांनी १०० मधील ९९ वास उद्देशून लिहिल आहे आणि मी त्यातलाच एक आहे. आणि सद्यस्तिथीला १ लाखातील ९९,९९९ वास असं लिहिलं तरी वावगं ठरणार नाही.
     बोलण्याचं तात्पर्य इतकच की प्रत्येक मराठी माणसाने मग गावातील किंवा शहरातील किंवा कोणत्याही वयोगटातील असो, कोसला हे जीवन संपण्याच्या आधी एकदातरी वाचलं पाहिजे.

मी YouTube वर सुद्धा कोसलाबद्दल विडिओ अपलोड केला आहे.
लिंक: https://www.youtube.com/watch?v=jXhVZ7WZWHo









Comments

Popular Posts

Why you need to watch Asur? || Asur Webseries Review

दयातलोव पास चे रहस्य || Dyatlov Pass Incident in Marathi