दयातलोव पास चे रहस्य || Dyatlov Pass Incident in Marathi

दयातलोव पास चे रहस्य

Dyatlov Pass Incident in Marathi 



सूचना: सदर लेख हा स्टिव्ह मॅकग्रेगर यांच्या लेखाचा अनुवाद आहे. 
ह्याचे वापराचे व छपाई चे सर्व अधिकार स्टिव्ह मॅकग्रेगर आणि अमित भालेराव ह्यांचे आहेत. इतर कुठेही ह्याचा वापर अथवा छपाई आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 


  • प्रस्तावना 

१९५९ चा फेब्रुवारीत उरल पर्वतरांगेत नऊ रशियन गिर्यारोहक विचित्ररित्या मृतावस्तेथ सापडले. ह्यातील काही शरीराचे तापमान खूप कमी होऊन मृत झालेले तर काही खूप गूढरित्या जबर मार लागून मारले गेलेले. ही पूर्ण टीम अनुभवी स्कीअर्स व गिर्यारोहक आणि संसाधनांनी सुसज्ज अशी होती आणि त्यांचं गिर्यारोहण व्यवस्तिथपणे आखलं गेलेलं होत. ह्यातले काहीजण स्वेर्डलोस्क (आताचं एकातेरीनबर्ग) येथील Ural Polytechnic Institute (UPI) च्या स्कीईंग आणि ट्रेकिंग क्लब चे सदस्य सुद्धा होते. पण इतकी आखीव आणि तयारीपूर्वक यात्रा असूनसुद्धा काही न उलगडणाऱ्या अरिष्टाने ह्या ग्रुपचा ह्या बर्फाच्छादित डोंगरांत तळ ठोकून असताना बळी घेतला. 

त्या दिवशी त्यांच्यासोबत काय घडलं ह्याबद्दल आजही बरीचशी सिद्धांतं वर्तवली जात आहेत. ह्यात रोजची हिमस्खलने, हायपोथर्मियापासून येणारं वेडेपण यांसारखी साधी ; रशियन मिलिटरी प्रयोग, रशियन सैनिकांकडून कत्तल, गुलागातून पळालेल्या कैद्यांकडून खून यांसारखी विलक्षण तसेच परग्रही हल्ला, रागीट यति चा हल्ला ह्यांसारखे अतार्किक सिद्धांत सुद्धा मांडले जातात. ह्या विषयावर तुम्हाला बरीचशी पुस्तकं आणि वेबसाईट्स मिळतील पण दुर्देवाने ती सर्व एका विशिष्ट दृष्टीनेच ह्या घटनेकडे पाहतात आणि जी त्यांच्या थिअरी ला दुजोरा देत नाहीत अशा सिद्धांतांना नाकारतात. म्हणूनच मला ह्या घटनेकडे अविकारी दृष्टीने पाहून ह्या दुर्देवी ग्रुप सोबत काय घडले यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न करायचा आहे. हा खूप किचकट (तसेच आजपर्यंत मी अभ्यासलेला सर्वात विलक्षण असा) केस आहे त्यामुळे माझ्या दुसऱ्या लेखांपेक्षा हा लेख खूप लांबलचक असा असेल.  शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा आणि तुम्हाला नक्की काहीतरी भन्नाट असं भेटेल हे मी लिहून देतो. 

सावधान: ह्या लेखात तुम्हाला ह्या गिर्यारोहकांच्या मृत शरीराचे फोटोज दिसतील ह्याने काही लोकांना त्रास होऊ शकतो परंतु केस जास्त चांगल्या पद्धतीने समजावता यावी यासाठी त्यांचा वापर करावा लागला आहे. 

  • घटनेची वस्तुअतिथी

ह्या सेक्शन मध्ये जे काही फोटोग्राफ्स आहेत ही सगळी त्या ग्रुप ने सोडलेल्या टेन्ट मध्ये भेटलेल्या कॅमेरा रीळ मधील आहेत जी नंतर इनवेस्टीगेटर्सनी डेव्हलप केली. 

१९५० च्या दशकात कम्युनिस्ट रशियात स्कीईंग आणि वॉल्किंग क्लब्स हे खूप लोकप्रिय झाले होते. १९५३ साली स्टॅलिनच्या मृत्यूनंतर देश युद्धकालीन साधेपणा आणि शिस्तबद्धता ह्यातून बाहेर पडत होता. निकिता ख्रुश्चेव्ह यांच्या कारभारात अखेरीस लोक सामान्य नागरिकांप्रमाणे जीवनाचा आनंद घेऊ शकणाऱ्या गोष्टी करू लागले होते त्यातीलच एक म्हणजे क्रीडाभ्रमंती (sports tourism). विशेषकरून युवकांनी या संधीचा वापर करून आपल्या पालकांपासून दूर, पार्टी मुक्त अशा वातावरणात संचार करण्यास सुरुवात केली. 


स्वेर्डलोस्क येथील Ural Polytechnic Institute, १९५९. ग्रुपमधल्याच एका सदस्याने प्रवास सुरू करण्याअगोदर हा फोटो घेतला आहे. 

Ural Polytechnic Institute ची मुलं याला अपवाद नव्हती आणि इन्स्टिट्यूट मधला स्कीईंग अँड मौंटेनेरींग क्लब हा तेथे भलताच लोकप्रिय होता. १९५९ मध्ये २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी यादरम्यान संयुक्त सोविएत कम्युनिस्ट पार्टी ची  २१ वी बैठक होणार होती आणि ही बैठक साजरी करण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या १० विद्यार्थ्यांनी उरल पर्वत चढण्याची तीन आठवडी सहल आखली. ह्या ग्रुप मधील सर्वजण २१ ते २४ या वयोगटातील होते ज्यात आठ पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश होता.  हा प्रवास मानवी वस्तीपासून शेकडो किलोमीटर दूर होणार होता आणि १,२३४ मीटर उंचीचा माऊंट ओरोटेन सर करणे हे ह्या ट्रेकच उद्दिष्ट होत. ही सफर कॅटेगरी III (सगळ्यात कठीण आणि खडतर) ह्या प्रकारातील होती. अनुभवी वॉकर आणि स्किअर, इगोर अलेक्सेईवीच दयातलोव ह्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याला ह्या ग्रुपचा लीडर म्हणून निवडले गेले. जानेवारीच्या उत्तरार्धात दयातलोवची ३८ वर्षीय सेवानिवृत्त सैनिक सिमन झोलोताऱेव ह्याच्याशी ओळख झाली.  सिमन हा Minsk Institute of Physical Education येथील विद्यार्थी होता ज्याला गिर्यारोहण गाईड म्हणून काम करण्याचा अनुभव होता. ह्या अनुभवामुळेच दयातलोव ने सिमन ला आपल्या ट्रेक मध्ये समाविष्ट करून घेतले. 

The Group 

इगोर दयातलोव (Igor Dyatlov), २२, ग्रुपचा लीडर आणि अभियांत्रिकी विद्यार्थी 

झिनैदा कोल्मोगोरोवा (Zinaida Kolmogorova), २२, रेडिओ अभियांत्रिकी विद्यार्थी 

रुसतेम स्लोबोदिन (Rustem Slobodin), २३, UPI चा अभियांत्रिकी पदवीधर 

ल्यूदमिला दुबिणीना (Lyudmila Dubinina), २१, अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्राची विद्यार्थी 

अलेक्सान्दर कोलेवातोव (Aleksander Kolevatov), २५, भौतिकशास्त्र विद्यार्थी 

निकोलाई थिबेऑक्स- ब्रिगनोल (Nicolai Thibeaux-
Brignolle). २५, UPI चा १९५८ चा वास्तुविशारद पदवीधर 

युरी दोरोशेन्को (Yuri Doroshenko), २१, अभियांत्रिकी विद्यार्थी 

युरी क्रिव्होनीशेन्को (Yuri Krivonishenko), २४, UPI चा १९५९ चा अभियांत्रिकी पदवीधर 

युरी युदीन (Yuri Yudin), २२, अभियांत्रिकी विद्यार्थी

निकोलाई पोपोव (Nicolai Popov), २२, अभियांत्रिकी विद्यार्थी

सिमन झोलोतारेव (Semen Zolotarev), ३८, सेवानिवृत्त सैनिक, Minsk Institute of Physical Education चा माजी विद्यार्थी, माजी गिर्यारोहण गाईड 

२३ जानेवारीच्या संध्याकाळी ह्या ग्रुप ने स्वेर्डलोस्क (Sverdlosk) येथून २०० मैल उत्तरेस असलेल्या सेरोव (Serov) ह्या छोट्याशा गावाला जाणारी ट्रेन पकडली.  सेरोव ला ११ जण पोहोचणे अपेक्षित होते परंतु काही कारणास्तव निकोलाई पोपोव ह्याची ट्रेन सुटली आणि सेरोव ला फक्त १० जणच पोहोचली.  सेरोव येथे एक दिवस काढून ग्रुप ने अजून लहानशा अश्या इवदेल (Ivdel) गावाकडे जाण्यासाठी ट्रेन पकडली. इवदेल हे उत्तरेकडचे शेवटचे स्टेशन होते आणि ग्रुप २५ जानेवारीच्या मध्यरात्री इथे पोहोचला. त्याच दिवशी नंतर त्यांनी येथून विझेय गावाला जाणारी बस पकडली आणि तेथे ते दुपारी दोन वाजता पोहोचले.  


विझेय गावातील स्थानिक आणि सैनिक यांसोबत ग्रुपने घेतलेला फोटो. उजवीकडून दुसरा व्यक्ती हा ग्रुप लीडर इगोर दयातलोव आहे. 

२५ची रात्र त्यांनी ह्या गावातीलचं एका छोट्या हॉटेलमध्ये घालवली आणि दुसऱ्या दिवशी एका ओपन ट्रक मधून येथील जंगलातील ४१ क्वार्तल (41st Kvartal) ह्या कामचलाऊ वर्ककॅम्पकडे आपला प्रवास सुरु केला. खूप लांब, थंड आणि दयनीय असा हा प्रवास होता. येथील लाकूडतोड्यांच्या हॉस्टेल मधेच ग्रुपची राहण्याची सोय होती परंतु येथे पोहोचेपर्यंत युरी युदीन हा आजारी पडला. 


४१ क्वार्तल साठी केलेला ट्रकमधील प्रवास. 

आपलं कॅम्पिंगच आणि इतर सामान वाहून नेण्यासाठी २७ जानेवारीला ग्रुप ने स्तानिस्लाव व्याल्यूक्यविचस (Stanislav Valyukyavichus) या गुन्हेगारी पार्शवभूमी असलेल्या रहिवाश्याला भाडेतत्वावर सोबत घेतलं. ४१ क्वार्तल पासून २० किमी अंतरावर असलेल्या सेकंड सेव्हरनी (Second Severny) या भूगर्भशास्त्रांच्या (सोडलेल्या) कॅम्प पर्यंत ग्रुपच सामान वाहून नेणे हे स्तानिस्लावच काम होतं. त्याच संध्याकाळी ग्रुप कॅम्पला पोहोचला परंतु येथील वीस इमारतींपैकी फक्त एकच इमारत ही वापरण्याजोगी होती यामुळे ग्रुप आणि स्तानिस्लाव यांनी येथेच ती रात्र घालवली. २७च्या सकाळी ते माऊंट ओरोटनला नेणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवासास मार्गस्थ झाले. तथापि, युरी युदीनची तब्येत आणखीनच खालावली यामुळे त्याने हाईक न करण्याचा निर्णय घेतला. युदीन हा स्तानिस्लाव च्या कार्ट चा वापर करून ४१ क्वार्तल येथे परतला व येथून परतीचा प्रवास करून तो ३१ जानेवारीला स्वेर्डलोस्क येथे पोहोचला. 


२७ जानेवारी. ग्रुपने आपलं सामान स्तानिस्लावच्या घोडागाडीवर ठेवून ४१ क्वार्तल ते सेकंड सेव्हरनी असा प्रवास केला. सर्वात मागे सुटलेला व्यक्ती हा युरी युदीन आहे. 

ह्यानंतर ग्रुप सोबत जे काही घडलं याची माहिती इन्वेस्टीगेटर्सना त्यांची शेवटची कॅम्पसाईट, त्यांच्या मिळालेल्या जर्नल्स आणि फोटोग्राफ्स ह्यातून प्राप्त झालेली आहे. ग्रुपमधील काही जणांकडे स्वतःच्या रोजनिशी डायऱ्या होत्या पण त्याचबरोबर ग्रुपची स्वतःची वेगळी अशी एक गृपडायरी (Group Journal) सुद्धा होती.  ही डायरी कदाचित स्वेर्डलोस्क येथील हायकिंग क्लबला सुपूर्द करण्यासाठी ते लिहित असावेत असं मानलं जातं. मुख्यत्वे हवामान, रस्ते-वाटा आणि प्रत्येक कॅम्पसंबंधी माहिती  ह्या ग्रुपडायरी मध्ये नोंदवली जात होती. यासोबतच आपले गिर्यारोहक 'Evening Oroten' नावाचं एक  नियतकालिक सुद्धा लिहित होते ज्यात त्यांच्या अनुभवांना ते विनोदी पद्धतीने नोंदवत होते. ग्रुपचे मेंबर आळीपाळीने हे सगळं लिखाण करत आणि असं दिसून येत कि हे सगळं लिखाणकाम हे संध्यकाळच्या वेळेस टेन्ट मध्ये बसून केलं जायचं (संध्याकाळचे ४. ४५ ते सकाळचे ८. यादरम्यान काळोख असायचा). 


सेकंड सेव्हरनी. ग्रुपने उजवीकडील इमारतीत रात्र घालवली

या जर्नल आणि डायऱ्यांसोबतच चार कॅमेरे आणि काही एक्सपोज्ड फिल्म्स सुद्धा शेवटच्या टेन्ट मध्ये सापडल्या. २८ जानेवारी नंतर ह्या मुलांसोबत नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी इन्वेस्टीगेटर्सने एक्सपोज्ड रोल आणि कॅमेऱ्यांतील फिल्म नंतर डेव्हलप केल्या. एक पाचवा कॅमेरा सुद्धा तपासात मिळाला पण तो सिमन झोलोतारेव ह्याच्या मृत शरीराच्या गळ्यात लटकला होता व त्याचे शरीर हे तीन महिने हा कॅमेरा घेऊन पाण्यात बुडालेल्या अवस्तेथ होतं. ह्यामुळे फिल्म खराब झाली आणि एकही फोटो रिकव्हर करणे जमलं नाही. एक बाब लक्ष देण्याजोगी आहे जी म्हणजे युरी युदीन च म्हणणं होत कि तपासात अजून कॅमेरे मिळायला हवे होते कारण ग्रुपमध्ये सर्वांकडे कॅमेरे होते. परंतु तपासाच्या अहवालात असा कुठलाही उल्लेख नाही आणि त्यामुळे ह्या कॅमेरांतील फोटोज काही भेटले नाहीत. 


सेकंड सेव्हरनी येथे युरी युदीनचा निरोप घेताना झिनैदा आणि त्यांना पाहताना सिमन झोलोतारेव.  

शेवटी नऊ जणांच्या ह्या ग्रुपने सेव्हर्नीच्या उत्तरेकडील लोझवा नदीच्या मार्गाने वाटचाल सुरु केली आणि २८ जानेवारीला येथे त्यांनी साधारण पाचच्या सुमारास तळ ठोकला.  वातावरण खूप थंड (-८°C) परंतु स्पष्ट होत आणि यामुळे त्यांना बेदिक्कत लांब एरिया कव्हर करता आला. ह्याच संध्याकाळी ग्रुप ने युरी दोरोशेन्कोचा वाढदिवस सुद्धा साजरा केला आणि त्याला मँडरीन संत्र भेटवस्तू म्हणून देऊ केलं. ही संत्री रशियात दुर्मिळ होती व फक्त नविन वर्ष साजरा करताना भेट म्हणून दिली जायची. दोरोशेन्कोने ही संत्री बाकीच्या सात जणांसोबत वाटून खाण्याची इच्छा व्यक्त केली - काही कारणात्सव ल्युदमिला दुबिणीना तिच्या टेन्ट मधेच रुसून बसली होती.   


लोझवा नदीचा मार्ग चालताना. २८ किंवा २९ फेब्रुवारी. सर्वात पुढे आहे युरी दोरोशेन्को, त्याच्या मागे सिमन आणि रुसतेम. ल्यूदमीला दुबिणीना यांना पाहताना.  

२९ जानेवारीला तापमान अजून कमी झाले (-१३°C) पण स्पष्टता चांगली होती म्हणून ग्रुपला लॊझवा नदी ते ऑस्पिया नदी हा पल्लाही पूर्ण करता आला आणि येथेच त्यांनी ५.०० च्या सुमारास दूसरा तळ ठोकला. ह्या भागात मानसी नावाचे आदिवासी लोक फार पूर्वीपासून वास्तव्य करून आहेत आणि चालताना ग्रुपला अधून मधून मानसींच्या पायवाटा दिसायच्या. मानसी आदिवासी हे झाडांना थोडं कापून त्यांच्यावर वाटा मार्क करत. आपला ग्रुप ह्या अशा मार्किंग्स चा अभ्यास म्हणून अधे मध्ये थांबून त्यांचाबद्दल नोंदी करत व फोटो सुद्धा घेत. 


वाटेत थांबून झिनैदा तिच्या डायरीत लिहिताना. मागील व्यक्ती झोलोतारेव. 



झिनैदा कोलमोगोरोवाच्या डायरीतील शेवटची नोंदणी. ह्यात तारीख ३०.२.५९ अशी नोंदवली आहे पण ती चुकून लिहिली असावी कारण फेब्रुवारीच्या ३० तारखेला  झिनैदाच्या  मृत्यूला एक महिना झाला होता. संशोधकांनी हे ठरवलंय की ही नोंदणी ३०.१.५९ अशी वाचावी. 

सदर नोंदणी अशी आहे:


३०.२.५९ ऑस्पी नदीला धरून चाललो. मानसींची वाट संपली. सुरूचे (Coniferous) जंगल.
सकाळी स्पष्ट सूर्य होता आणि आता ढगाळ वातावरण आहे. पूर्ण दिवस हा ऑस्पी नदीच्या वाटेने गेला. 
कोहलला काम करण्यापासून थांबवलं आहे आणि सगळे मदत करत आहेत. Mitten (हातमोजे) आणि 
2nd Yurkino स्वेटर जाळले. तो पूर्ण वेळ शिवीगाळ करतो. आज कदाचित आम्ही स्टोरेज शेड बांधणार. 


३० जानेवारीला सुद्धा ग्रुप ऑस्पी नदीच्याच कडेकडेने चाललेला पण थंडी खूपच ( तापमान दिवसा -१७°C तर रात्री -२६°C चा आसपास होतं) वाढत चालली होती. ह्यामुळे त्यांना पुढील प्रवास करणे कठीण जात होते आणि त्या दिवशी त्यांनी फक्त १७ किमी इतकाच काही तो प्रवास केला. वारा सुद्धा जोरात वाहू लागला होता आणि त्यात बर्फवृष्टी पण सुरु झाली. त्या दिवशी त्यांनी मानसी लोकांची पायवाट पकडूनच मार्गक्रमण केलं आणि त्यांना  पूर्ण वाटेत मानसींच्या संकेत खुणा दिसत राहिल्या. 


वाटेत लागलेलं मानसी चिन्ह पाहताना रुसतेम.  

३१ जानेवारीलाही ते सकाळी मानसी वाट चालत राहिले. ह्या वेळी त्यांना असेही वाटले कि ह्याच मार्गावर थोडं पुढे एखादा मानसी आदिवासी हरणाची शिकार करत आहे. अतिबर्फवृष्टी आणि अंधुक वातावरण यामुळे हवामान खडतर होत गेलं. यामुळे संध्याकाळी त्यांनी पायवाट सोडली व स्कीईंग करून जंगलातून वाटचाल करू लागले. सकाळी बराच वेळ खोल बर्फातून (१.२ मी) चालल्यामुळे ते फार थकून गेले होते. इतके की त्यांनी जेव्हा तळ ठोकला तेव्हा त्यांनी शेकोटी सुद्धा पेटवली नाही. त्यांनी आपलं खाद्य खाल्लं आणि टेन्ट मध्ये निजून गेले. 

ग्रुप जर्नल/ ग्रुपडायरी लिहिली गेलेला ३१ जानेवारी हा शेवटचा दिवस. यामुळे १ फेब्रुवारीला काय घडलं असेल ह्याचा आपल्याला तार्किक विचार करावा लागेल. असं समजून येतं ह्या दिवशी त्यांनी त्यांच्या तळाजवळ जमिनीपासून थोडा उंच असा एक लाकडी फलाट बांधला. इथे त्यांनी पुढच्या प्रवासात गरजेचं नसलेलं असं सगळं सामान व्यवस्थित ठेवून दिल. ह्यामागच ध्येय कदाचित भार जितका कमी करता येईल तितका कमी करणं आणि परतीच्या प्रवासात हे सामान पुन्हा घेऊ असं असावं. ह्या दिवशीच्या रस्त्याने त्यांना Elevation १०७९ आणि Elevation ८८० या दोन पर्वतांच्या मधोमध असलेल्या पासमधून न्यायला हवं होत (१९५९ पर्यंत हा पास अनामिक होता- नंतर ह्याला मृत गिर्यारोहकांची आठवण म्हणून दयातलोव पास असं नाव देण्यात आलं) . पण काही न उलगडलेल्या  कारणास्तव त्यांनी हा रस्ता सोडून Elevation १०७९ [(मानसी लोकांच खोलत स्याखल {Kholat Syakhl)] हा पर्वत चढायला सुरुवात केली. दिवसभर फक्त चार किमी चा प्रवास करून  ४.०० च्या आसपास त्यांनी  Elevation १०७९ च्या स्लोपवरच तळ ठोकला. हा टेन्ट पर्वताच्या ७००मी (२,३०० फूट) पॉइंटवर  होता. 


ग्रुपच्या शेवटच्या काढलेल्या फोटोंपैकी एक फोटो. ते झाडांपासून दूर, मोकळ्या आणि बर्फाने भरलेल्या जागेत आहेत. हा फोटो नक्कीच Elevation १०७९ चढताना घेतलेला असावा. दुर्देवाने ते जिकडे जात होते तो त्यांचा शेवटचा कॅम्प बनणार होता. 

ग्रुप सुखरूप विझेय इथे पोहोचल्यावर आपण स्वेर्डलोव्स्कच्या हायकिंग क्लब ला तार पाठवू असं प्रवास सुरु करण्याआधीच दयातलोवने सांगितल होत. ही तार आखणी केल्याप्रमाणे १२ फेब्रुवारीच्या अगोदर करणे अपेक्षित होते. पण प्रवास सुरु करण्याअगोदर दयातलोवने युरी युदीन ला बोलता बोलता समजावलं होत की ही ट्रेल प्लॅन केलेल्या तारखेपेक्षा उशिरा संपू शकते त्यामुळे जरी उशीर झाला तरी आमची काळजी करण्याचे कारण नाही.  तरीही मुलांकडून संपर्काच्या अभावामुळे २० फेब्रुवारीला ह्या गिर्यारोहकांचे पालक, नातेवाईक, आणि मित्र काळजी करायला लागले होते. त्यांच्या मागणीमुळे एक शोधमोहीम सुरु करण्यात आली जिच्यात पहिले फक्त विद्यार्थी आणि इतर गिर्यारोहकांचा समावेश होता पण नंतर पोलीस आणि लष्करी तुकड्या ह्याही येथे विमान आणि हेलिकॉप्टर वापरून मुलांचा शोध घेऊ लागले. 


शोधकर्त्यांची मदत करताना एक हेलिकॉप्टर, २५ फेब्रुवारी. 

२७ फेब्रुवारीला खोलत स्याखल येथे ग्रुप चा टेन्ट सापडला. शोधकर्त्यांनी बारकाईने सगळ्या जागेची तपासणी केली. त्यांनी असं नोंदवलं की टेन्टचा अर्धा भाग हा ढासळला होता. त्याचबरोबर ह्या ढासळलेल्या भागावर खूप सारे काप आणि वार केले गेले होते. इतकं सगळं होऊन सुद्धा टेन्टच मुख्य द्वार हे सुरक्षितपणे बंद होते. टेन्टची एक बाजू ही सहा उभे वार आणि सहा आडवे वार यांमुळे पूर्णपणे नष्ट झाली होती. टेन्टवरील हे वार आत बसलेल्या लोकांच्या eye level ला केले गेलेले. गिर्यारोहकांचं चढाईचं सामान, कुऱ्हाडी, बुटं, जॅकेट्स, स्लीपिंग बॅग्स असं बरचस सामान हे व्यवस्थितरित्या सुरक्षितपणे टेन्टमध्येच ठेवलेल आढळलं. काही खाद्यपदार्थ हे वाढून ठेवलेले आढळले. ह्यावरून असा तर्क लावला जातो कि त्यांनी संध्याकाळची न्याहारी अर्ध्यावरच टाकून टेन्ट सोडला असेल. अजून काळजीपूर्वक बाब ही की टेन्ट मधून खाली दरीतील जंगलात जाणारे आठ ते नऊ जणांच्या पायांचे ठसे सापडले. ह्यातील एका व्यक्तीने त्याच्या एकाच पायात बूट घातलं होत तर बाकीचे अनवाणीच किंवा फक्त मोजे घालून चालत होते. हे ठसे टेन्ट पासून खाली ५०० मी पर्यंत पाठलाग करण्याजोगे होते कारण पुढे नव्या बर्फाच्या आच्छादनाखाली  हे ठसे दबून गेले होते.    


अर्ध्या ढासळलेल्या टेन्ट चा शोध, २७ फेब्रुवारी. 

त्याच दिवशी नंतर टेन्ट पासून १५०० मीटर, जंगलाच्या टोकावर, एका मोठ्या देवनार वृक्षाच्या खाली शोधकर्त्यांना एका विझलेल्या शेकोटी शेजारी युरी दोरोशेन्को आणि युरी क्रिव्होनीशेन्को यांची मरणासन्न शरीरं सापडली. ह्या दोघांनी फक्त शर्ट्, ट्राउझर आणि अंडरवेअर हे कपडे घातले होते. दोघांच्याही पायात बुटं नव्हती. दोघांनाही खूप काळजीपूर्वक जमिनीवर ठेवलं (?) गेलं होतं आणि त्यांना संलग्न असलेल्या झाडाच्या खूप साऱ्या फांद्या ह्या तुटलेल्या दिसल्या आणि त्याच झाडाच्या खोडाच्या थोड्या वरच्या भागात मानवी रक्त आणि त्वचेचे काही तुकडे सापडले.  


सैल बर्फ बाजूला केल्यानंतर दोरोशेन्को आणि क्रिवोनीशेन्को च शरीर.   

दुसऱ्या दिवशी हे झाड आणि टेन्ट यांच्यापासून दूर एका समरेषीय भागात  इगोर दयातलोव आणि झिनैदा कोलमोगोरोवा यांची मृत शरीरं सापडली. झाडापासून दयातलोव हा ३०० मीटर तर कोलमोगोरोवा ६०० मीटर दूर होते. ह्या दोघांच्याही अंगावर आधी सापडलेल्या शवांपेक्षा जास्त कपडे होते. दयातलोव ने शर्ट आणि स्वेटर वर एक फर कोट त्याचबरोबर स्की पॅन्ट आणि ट्राउझर असा पेहराव केला होता. कोलमोगॊरोवने दोन हॅट, दोन स्वेटर, दोन शर्ट, ट्राउझर, स्की पँट्स आणि मोज्यांचे तीन जोडे असा पेहराव केला होता.  पण दोघांनीही पायात बुटं घातली नव्हती. 

५ मार्च ला रुसतेम स्लोबोदिन याच शव सापडलं. तेही टेन्ट आणि देवदार झाडाच्या समरेषीय भागात भेटलं व दयातलोव आणि कोलमोगोरोवा ह्यांच्या शवांपासून साधारण मध्यम अंतरावर ते भेटलं. स्लोबोदिनच्या अंगावर दोन शर्ट, एक स्वेटर आणि दोन ट्राउझर होत्या पण फक्त एकाच पायात बूट होता.  


शोधकर्त्यांना रुसतेमच सापडलेल शरीर. 

५ मे पर्यंत उरलेल्या चार गिर्यारोहकांचा शोध सुरु राहिला. ५ मे ला एका मानसीच्या कुत्र्याने ह्या चार जणांची शवं जंगलातच ४ मीटर बर्फाखाली झाकलेल्या छोट्या दरीत शोधून काढली.  ही छोटी दरी ही देवनार वृक्षापासून ७५ मीटर दूर होती. ह्या चौघांनी एक शेकोटी पेटवलेली आणि जिथे शव सापडले तेथून थोड्या अंतरावर काठ्यांपासून एक छोटा निवारा बनवण्याचा प्रयत्न केलेला हे आजू बाजूची स्थिती बघून ज्ञात होत होतं. ह्या चौघांपैकी फक्त सिमन झोलोतारेव यानेच बुटं घातली होती- बाकीचे फक्त मोज्यांवरच होते. ह्या चौघांच्या अंगावर स्वतःचे तर कपडे होतेच पण काही अतिरिक्त कपडे सुद्धा होते जे कदाचित दोरोशेन्को आणि क्रिवोनिशेन्को यांचा शरीरावरून घेतले असावेत. सिमन झोलोतारेवच्या गळ्यात त्याचा कॅमेराही होता.  


अर्ध बर्फात आणि अर्ध छोट्या झऱ्यात बुडालेली कोलेवातोव आणि ब्रिगनोल यांची शरीरं. येथूनच खाली काही अंतरावर सिमन च शरीर सापडलं. 

हा सगळा शोध फारच विचित्र असा होता. असं काय घडलं असेल ज्यामुळे नऊ अनुभवी गिर्यारोहकांनी इतक्या अंधारात आणि थंडीत ( त्या रात्री तापमान हे -२५°C ते -३०°C इतकं कमी होतं) आपल्या टेन्ट मधून पळ काढला? असं काय झालं कि त्यांनी कपडे किंवा बुटं न घालताच दरीत खाली धाव घेतली? ह्याही पेक्षा गोंधळायला लावणारा प्रश्न म्हणजे ते बाहेरचं का राहिले आणि स्वतःचा टेन्ट, कपडे व इतर साहित्य फक्त १,५०० मीटर दूर असून सुद्धा ते बाहेरचं शेकोटी आणि कामचलाऊ निवारा बनवण्याचा प्रयत्न का करत होते? जेव्हा शवविच्छेदनाचा अहवाल आला  तेव्हा तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं आणखीनच किचकट झालं. 


शोधकर्त्यांनी अहवालासाठी बनवलेला शव कुठे भेटली हे दाखवणारा कामचलाऊ नकाशा. ह्यात लाल रंगातील लिखाण माझ्याद्वारे केलं गेलं आहे.  

लेव इवानोव ह्या पोलीस अधिकाऱ्याकडे ह्या केसचा तपास करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ४ मार्च ला विभागीय कार्यालयीन न्यायवैद्यक रोगनितीतज्ञ (regional bureau forensic pathologist), डॉ. बोरिस अलेक्सीवीच वोजरोजदेनीय (ज्यांच्या शेवटच्या नावाचा अर्थ रशियन भाषेत 'पुनर्जन्म' हा आहे, किती उपरोधात्मक) आणि स्वेर्डलोस्क  चे शहर आरोग्य तपासनीस इवान इवानोविच लापतेव ह्या दोघांनी पहिल्या चार शवांचं शवविच्छेदन पार पाडलं. 

युरी दॊरोशेन्कोच्या  शवविच्छेदनात त्याचा चेहरा, खांदे, हात आणि पाय यांवर खूप ओरखडे आणि जखमा आढळून आल्या. त्याचे कान, नाक आणि तोंड हे रक्ताने माखले होते. त्याच्या उजव्या खांद्यावर दोन काप होते. त्याच्या तोंडात राखाडी रंगाच द्रव्य सापडलं जे त्याच्या फुफ्फुसांतून तोंडात आलेल. कुठूनतरी पडल्यामुळे फुफ्फुसाला इजा झाल्याने हे द्रव्य तोंडात आले असावे. त्याच्या मानेच्या मागच्या भागात, धडात आणि हातापायांत रक्त साकळल्याचे आढळले. ह्यावरून हे समजतं की मृत्यूनंतर त्याच शरीर (जे की पालथं पडलं होत) हे हलवलं गेलेलं. दोरोशेन्कोच्या हातापायाची सर्व बोटं ही अती हिमबाधा झाल्याची चिन्हं दर्शवत होती. जरी दोरोशेन्को जगला असता तरीही त्याची हातापायाची बोटं कापावी लागली असती इतकी तीव्र हिमबाधा त्याच्या बोटांना झाली होती. ज्या काही जखमा किंवा ओरखडे त्याच्या शरीरावर होते ते सगळे जीव घेणारे नव्हते. यामुळेच डॉक्टरांनी दॊरोशेन्कोचा मृत्यू शरीराचे तापमान कमी झाल्यामुळे (Hypothermia) झाला असं गृहीत धरले. मृत्यूच्या ६ ते ८ तास अगोदर दॊरोशेन्कोने अन्नग्रहण केले होते. 

युरी क्रिवोनिशेन्कोच्या शरीराने सुद्धा अश्याच काहीशा जखमा आणि ओरखड्यांचा पॅटर्न दाखवला. त्याच्या दोन्ही हातांची त्वचा ही खोलवर फाटली होती. अस मानलं जातं की ह्या जखमा क्रिवोनिशेन्कोला  देवनार वृक्ष चढताना झाल्या असाव्यात आणि झाडावर भेटलेले मानवी रक्त आणि त्वचा हे त्याचेच असावेत. त्याच्या डाव्या हातावरील मागच्या बाजूचा २ सेमी इतका त्वचेचा तुकडा गायब होता. हा २ सेमी चा तुकडा त्याच्या तोंडात भेटला जो त्याने आपल्या दातांत घट्ट पकडून ठेवला होता. त्याच्या डाव्या पायाचा बराचसा भाग हा मोठ्या प्रमाणात जळाला होता. दोरोशेन्को सारखेच याच्याही जखमा जीवघेण्या नसल्यामुळे हायपोथर्मिया हेच मृत्यूचे कारण म्हणून नोंदवले गेले. यानेही मृत्यूच्या ६ ते ८ तास अगोदर अन्नग्रहण केले होते. अधिकाऱ्यांनी दावा केला की ग्रुपच्या दुसऱ्या सदस्यांनी यांच्या अंगावरील कपडे काढले असतील कारण दोघांचेही कपडे कापल्याचे दिसत होते व यांतल्या कमीत कमी एकाचे तरी शरीर मृत्यू नंतर हलवले गेले हे पुराव्यासहित सिद्ध झाले होते. 

यानंतर देवनार वृक्ष आणि टेन्ट यांच्यामधील जागेत भेटलेल्या शवांचं विच्छेदन करण्यात आलं. इगोर दयातलोव झाडाच्या जवळ सापडला होता आणि त्याच्याही चेहऱ्यावर, हातांवर व टाचांवर ओरखडे आणि जखमा होत्या. त्याच्या उजव्या हातावर आणि बाहुवर ओरबडल्याचे दिसत होते. त्याचाही मृत्यू हायपोथर्मिया ने झाला असे नोंदवले गेले. दयातलोवच्या अंगावरील शर्ट हा युरी युदीनचा शर्ट होता. हा शर्ट त्याने दोरोशेन्कोला ग्रुपला विदा करताना दिला होता असे युदीन ने कोर्टात दिलेल्या साक्षीत सांगितले. कदाचित दयातलोवने हा शर्ट दोरोशेन्कोच्या शवावरून काढून घेतला असावा. 


इगोर दयातलोवच शरीर .

देवनार झाडापासून ६०० मीटर वर सापडलेल्या झिनैदा कोलमोगोरोवाच्या शरीरावर खूप साऱ्या जखमा आणि ओरखडे होते. तिच्या उजव्या हाताच्या त्वचेचा काही भाग हा तिथे नव्हता. तिच्या उजव्या किडनीवरील भागात भडक लाल आणि लांबलचक अशी एक जखम होती. कोणीतरी तिला जोरात काठीने किंवा दांडक्याने तेथे मारले असावे असे भासत होते. तिचा मृत्यू हिंसक अपघातामुळे आलेल्या हायपोथर्मियाने झाला असे नोंदवले गेले. शरीराच्या पुढील बाजूत रक्त साकलळ्याचे दिसत होते ह्यावरून मृत्यूनंतर तिचं शरीर उलटलं गेलेलं असे समजते. 

यानंतर ८ मार्च ला डॉ. बोरिस अलेक्सीवीच वोजरोजदेनीय यांनी रुसतेम स्लोबोदिन याचे शवविच्छेदन पार पाडलं. त्याचे शरीर दयातलोव आणि झिनैदा यांच्या शवांपासून मधोमध अशा जागेत सापडले होते. बाकीचांसारखचं त्याच्याही चेहऱ्यावर, हातांवर आणि डोक्यावर ओरखडे आणि जखमा होत्या. पण त्याचसोबत त्याच्या कवटीच्या उजव्या बाजूला एक मोठी चीर पडली होती. डोक्याच्या दोन्ही बाजुंनी रक्तस्राव झाला होता आणि उजव्या हातावरील त्वचा गहाळ होती. रक्तस्राव आणि इतक्या जखमा असूनसुद्धा त्याच्या मृत्यूचे कारण हायपोथर्मिया असे नोंदवले गेले.त्याच्याही शरीराच्या पुढील बाजूत रक्त साकलळ्याचे दिसत होते ह्यावरून मृत्यूनंतर त्याचं शरीर उलटलं गेलेलं असे समजते. 


रुसतेमच्या कवटीवरील इजा. उजव्या बाजूवरील घट्ट रेघ ही फ्रॅक्चर दाखवते तर दोन्ही बाजूंवरील छायांकित भाग रक्तस्राव दर्शवतात. 

पहिल्या शवांचे शवविच्छेदन झाल्यानंतरही उरलेल्या चार लोकांचा तपास सुरूच होता. त्यांची शवं मृत्यूच्या तीन महिन्यांनंतर ५ मे या दिवशी सापडले. तीन महिने उलटल्या मुळे शरीरं कुजायला लागली होती. चारीही शवं एका छोट्या दरीच्या तळाला भेटली होती. ९ मे ला त्यांची शवविच्छेदनं करण्यात आली. 

तीव्र जखमा असलेल्या ल्यूदमीला दुबिणीनाचे शवविच्छेदन पहिले केलं गेलं. तिच्या चेहऱ्यावर आणि पायांवर जखमा होत्या. नाक तुटलं होत. तिच्या दहा फासळ्या तुटल्या होत्या. शरीराला आतून जखमा होत्या. तिच्या हृदयाच्या उजव्या अलिंदात मार बसून खुप जास्त प्रमाणात शरीराच्या आतमधेच रक्तस्राव झाला होता. ह्या रक्तस्रावालाच तिच्या मृत्यचे कारण म्हणून नोंदवले गेले. तिची जीभ, डोळे आणि चेहऱ्याची काही त्वचा गहाळ झाली होती. कोणत्यातरी शिकारी प्राण्याने तिच्या कुजणाऱ्या शवावर हल्ला केला असावा असा अंदाज आधी बांधला गेला. पण तिच्या पोटामध्ये १०० ग्राम गोठलेल रक्त भेटलं जे असं दाखवत होतं कि जीभ काढली गेली तेव्हा ल्यूदमीला जिवंत होती. 

सिमन झोलोतारोव याच्या शरीरावरही अश्याच जखमा होत्या. त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजूस एक खुली जखम होती. छातीवर जोरदार माराच्या जखमा होत्या व दहा फासळ्या तुटल्या होत्या. त्याचेही डोळे आणि चेहऱ्यावरील काही त्वचा ही तिथे नव्हती. सिमन आणि ल्यूदमीला यांच्या जखमा ह्या एखाद्या जबरदस्त कार अपघातातील बळींसारख्या होत्या असे शवविच्छेदन केल्यानंतर डॉ. वोझरोजदेनीय यांनी सांगितले. ह्यात ते पुढे असेही म्हणाले की ह्या जखमा आणि मार काही इतक्या छोट्या दरीत पडून लागलेला नाही. ह्यातही विलक्षणीय बाब अशी की दोघांच्याही छातीत इतक्या जबर इजा होऊनही त्यांचा त्वचेला मात्र बाहेरून काहीही इजा झाल्या नव्हत्या. 


शवविच्छेदनात दिसलेले ब्रिगनोल च्या कवटीवरील जबरदस्त फ्रॅक्चर.

निकोलाई ब्रिगनोल चा शवविच्छेदनामध्ये त्याच तुटलेलं नाक, उजव्या बाहुवर मोठी जखम व कवटीच्या उजव्या बाजूत बऱ्याचश्या चिरा निदर्शनास आल्या. ह्या कवटीतल्या चिऱ्या इतक्या जबरदस्त होत्या की त्या ह्या छोट्या दरीत किंवा तिच्यातल्या दगडांवर आपटून सुद्धा पडू शकत नाहीत असे डॉ. वोझरोजदेनीय ह्यांनी आपल्या टिप्पणीत सांगितले. निकोलाईच्या हातात दोन बंद पडलेली घड्याळेही परीक्षण करताना दिसून आली. ह्यातील एका घड्याळात ८.१४ तर दुसऱ्यात ८. ३९ अशी वेळ झाली होती. 

शरीर कुजल्यामुळे अलेक्सान्दर कोलेवातोव या अंतिम बळीच्या शवविच्छेदनात त्याच्या जखमा किंवा मृत्यूचे कारण यांसारखी माहिती प्राप्त करता आली नाही. त्याच्याबाबतीत फक्त त्याच तुटलेलं नाक, कवटीत असलेली उघडी जखम आणि 'मानेत विकृती' इतकंच नोंदवलं गेलं आणि ह्यातील शेवटच्या शब्दांचा अर्थ अजून कोणाला उलगडला नाही. चेहऱ्यावरील त्वचा सुद्धा गहाळ झाली होती. अलेक्सान्दरच्या स्वेटर आणि ट्रॉउझर्स वर रेडिएशनचे प्रमाण दिसून आले. परंतु कोलेवातोव हा भौतिकशास्त्राचा विद्यार्थी होता आणि बऱ्याचश्या रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल संबंधी प्रोजेक्ट्स वर त्याचं काम सुरु होतं त्यामुळे त्याच्या कपड्यांवर जे काही रेडिओऍक्टिव्ह ट्रेस झालं ते त्याच्या प्रोजेक्टमुळे आले असावे असा अंदाज बांधला गेला. येथे येण्यापूर्वीच तो Moscow Research Institute for Inorganic Material येथुन तो आण्विक ऊर्जेसंबंधीच्या साहित्याच्या निर्माणाबद्दल काम करून आलेला. 

मुलांबरोबर नक्की काय झाले हे शवविच्छेदनाच्या निकालातून लक्षात आले नाही. पहिल्या चार पुरुषांच्या हात आणि बोटांवरील जखमांवरून असं दिसत होत की त्यांनी कशासोबत तरी मारामारी केली होती. शेवटच्या तीन पुरुषांच्या शवांवर आतल्या बाजूने जबरी मार बसल्याचे दिसून आले परंतु बाहेर काही जास्त इजा नव्हत्या. ल्यूदमिलाच्या शरीरावरील जखमा सर्वात तीव्र होत्या आणि ती गहाळ झालेली जीभ हे तिच्या मृत्यूला आणखीनच विचित्र बनवते. जीभ कापली गेली, फाडली गेली की शिकारी प्राण्याकडून काढली गेली हेही शवविच्छेदनात नमूद केलेलं नाहीये. त्यात फक्त 'गहाळ' इतकंच लिहिलं आहे. न्यायवैद्यक तपासातून अजून एक बाब समजली ती ही अशी की टेन्ट वर जे काही काप होते वार होते हे सगळे टेन्ट चा आतून केलेले होते. टेन्ट वर एकच वार बाहेरून केला गेलेला आणि तोसुद्धा शोधमोहिमेतील एका शोधकर्त्याने आपल्या हिमकुऱ्हाडीने टेन्टच्या आत पाहण्यासाठी केला होता. 

आपल्यावर तपासनिय अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचा खूप दबाव होता असे तपासाचे मुख्य अधिकारी, लेव इवानोव यांनी सांगितले. शवविच्छेदना नंतरच्या तीन आठवड्यातच, २८ मे ला हा अंतिम अहवाल सादर केला गेला. नऊ गिर्यारोहक आपल्या टेन्ट मधून त्या देवनार वृक्षाखाली गेले व तेथे त्यांनी शेकोटी पेटवली असं या अहवालात सुचवलं गेलं होत. क्रिवोनिशेन्को आणि दोरोशेन्को यांचा मृत्यू होईपर्यंत ते तेथेच थांबले आणि नंतर त्यांच्या मृत मित्रांच्या शरीरावरील कपडे घेऊन त्यांनी स्वतःला दोन गटांत विभागले. ह्यातील एका गटाने (दयातलोव, कोलमोगोरोवा आणि स्लोबोदिन) आपल्या टेन्ट कडे परत जाण्याचा प्रयत्न केला पण जात असताना रस्त्यातच त्यांचा हायपोथर्मियाने मृत्यू झाला. उरलेल्या चौघांनी मग खाली जंगलाकडे जायला सुरुवात केली. थोडं घनदाट जंगल लागल्यावर त्यांनी एक शेकोटी पेटवली आणि छोटा आसरा बनवला. येथे त्यांच्यासोबत काही अपघात घडला आणि नंतर ते स्वतः मृत्यू पावले. अहवालात हे सांगितलं गेलं की नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं ज्याने त्यांचा मृत्यू झाला याचा अंदाज बांधने कठीण आहे. मृत्यूचे कारण 'कोणतीतरी लक्षवेधी अज्ञात ताकद (compelling unknown force)' असे लिहून अहवालाचा शेवट करण्यात आला. 




युरी दोरोशेन्को, युरी क्रिवोनीशेन्को, इगोर दयातलोव आणि झिनैदा कोलमोगोरोवा यांचा दफनविधी, ९ मार्च, स्वेर्डलोव्स्क. 

नऊ गिर्यारोहकांच्या मृत्यूने सगळ्या सोव्हिएत युनियन च लक्ष वेधलं गेलं. स्वेर्डलोस्कमध्ये पार पाडलेल्या त्यांच्या दफनविधीला शोकाने हळहळणाऱ्या शेकडो लोकांनी उपस्थिती दर्शविली. खुद्द निकिता ख्रुश्चेव्ह ह्यांनी या तपासाच्या अंतिम अहवालाची प्रत स्वतःकडे मागवून घेतली. १९६३ साली त्यांच्या अंतिम टेन्ट पासून थोड्या अंतरावर त्यांचं लाकडी स्मारक बांधलं गेलं. Elevation १०७९ व Elevation ८८० यांमधून जाणाऱ्या पास चे नामकरण दयातलोव पास (Dyatlov Pass) असे केले गेले. ह्याच पास वर आपल्या नऊ गिर्यारोहकांचे फोटो आणि नाव असलेलं एक मोठं स्मारक उभारलं गेलं. 


दयातलोव पास स्मारक. 

९० च्या दशकात सोविएत युनियन च विभाजन झालं आणि तोपर्यंत या तपासाशी संबंधित सगळी कागदपत्रं ही अत्यंत गुप्त म्हणून वर्गीकृत (Classified) करून ठेवण्यात आलेली. सोविएत ब्रेकअप नंतर जेव्हा संशोधकांनी ही सगळी कागदपत्र बघत घेतली तेव्हा साहजिकच ह्यातील बरीचशी कागदपत्र ही गहाळ झाली होती. ह्या हरवलेल्या सामानात काही कागदं, एक किंवा एक पेक्षा अधिक रोजनिशी/श्या, Evening Oroten ची शेवटची आवृत्ती, मानसी लोकांकडून तपासयंत्रणेने मिळवलेली स्केचेस आणि टेन्ट मध्ये सापडलेल्या काही कागदांचा समावेश आहे. 

  •  थिअरीज आणि तर्क 

अंतिम तपास अहवालात नमूद केलेल्या घटनाक्रमात बऱ्याचश्या विसंगती आढळून येतात. या अहवालानुसार सर्व गिर्यारोहक पहिले देवनार झाडाकडे गेले आणि तेथे ते ५ ते ६ तास थांबले. क्रिवोनिशेन्को आणि दोरोशेन्को यांचा हायपोथर्मिया ने मृत्यू होईपर्यंत सर्व तिथेच थांबले.  त्यानंतर दयातलोव, कोलमोगोरोवा आणि स्लोबोदिन हे टेन्टकडे जायला निघाले परंतु अर्ध्या रस्त्यातच त्यांचा हायपोथर्मिया ने मृत्यू झाला. मुलांच्या अंगावरील जखमा आणि हात फाटेपर्यंत ग्रुप ने देवनार झाडावर चढण्याचा केलेला प्रयत्न ह्या बाबींकडे अहवालात दुर्लक्ष केलं गेलं आहे. 
उदाहरणार्थ, जर स्लोबोदिनच्या कवटीला इतक्या तीव्र चिरा पडल्या होत्या तर त्याने मरण्याअगोदर टेन्ट कडे जायला जवळ जवळ ५०० मीटर इतका प्रवास कसा केला असता? त्याने तर अगोदरच जमिनीवर कोसळायला हवं होतं. 
मुलांनी टेन्टकडे जाण्या अगोदर इतका वेळ कसली वाट बघितली याचेही उत्तर या अहवालात नाहीये. शेवटच्या चार बळींच्या शरीरांवरील जबरदस्त जखमा आणि मार यांबद्दल सुद्धा हा अहवाल मूक आहे. परंतु सर्वप्रथम मुलं टेन्ट सोडून बाहेर का पळाली ह्या महत्वाच्या प्रश्नाचेसुद्धा उत्तर देणे या अहवालास जमलेले नाही. ह्या सगळ्या अतृप्त प्रश्नांची उत्तरे म्हणून १९५९ पासून ते आजवर बऱ्याचशा थिअरीज उदयास आल्या आहेत.  त्यांबद्दल बोलायला सुरुवात करताना सगळ्यात तर्कसंगत थिअरीज पासून सुरुवात करू. 

सर्वात जास्त मानली गेलेली थिअरी आहे ती अशी की येणारे हिमस्खलन टेन्टला गिळंकृत करेल या भीतीने ग्रुप टेन्ट सोडून पळाला. आपल्याला इतकं तर नक्कीच माहिती आहे की अशा प्रकारची हिमस्खलनाची कोणतीही घटना ग्रुप तेथे वास्तव्यास असताना घडली नाही. असती तर ते आपल्याला टेन्टच्या स्थितीने समजले असते. नैसर्गिकरित्या, हिमस्खलन हा पळण्याचा हेतू असू शकतो हे नक्कीच परंतु खोलत स्याखलच्या ज्या भागात त्यांनी तळ ठोकला होता त्या भागाच्या वरील बाजूचा उतार हा खूप उथळ असल्याने हिमस्खलनाचा धोका हा फारच कमी होता. तरीही हे धरून चालू की हिमस्खलन झाले. आपल्याला शवविच्छेदनानुसार इतकं तर माहिती आहे की क्रिवोनिशेन्को आणि दोरोशेन्को यांचा मृत्यू अन्नग्रहण केल्याच्या ६ ते ८ तास नंतर झाला होता. टेन्ट मधील अर्धवट खाल्लेलं अन्न बघून ग्रुप ने अन्नग्रहण अर्धवट सोडून टेन्ट सोडला होता हेही आपल्याला समजते. ह्यावरूनच आपण असाही तर्क लावू शकतो की ह्या दोघांचाही मृत्यू हा १ फेब्रुवारीच्या  मध्यरात्रीदरम्यानच झाला असेल. आपल्याला हेही ज्ञात आहे की त्यांच्या मित्रांनी ह्या दोघांच्याही शरीरांवरील वस्त्रे नंतर काढून घेतली. याचा अर्थ ग्रुप मधील काही सदस्य हे ज्या काही घटनेने त्यांना टेन्ट सोडण्यास भाग पाडलं ती घडल्यानंतर सात तास म्हणजेच कमीत कमी २ फेब्रुवारीच्या रात्री १. ०० वाजेपर्यंत तरी जिवंत होते. आता एक सांगा,  हिमस्खलन झालेच तरी हिमस्खलन झाल्याच्या काही वेळानंतर तरी ग्रुप ने आपले गरम कपडे आणि इतर साहित्य मिळवण्यासाठी टेन्ट कडे पुन्हा धाव घेतली असतीच ना? जेव्हा नव्या हिमस्खलनाची काही चिन्हे दिसत नव्हती तेव्हा तरी ग्रुप ने २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर असलेल तळ गाठायला हवं होत पण हिमस्खलनच झाले नसेल तर ते हे सगळं का म्हणून करतील?!  
आणि परत टेन्ट वरील काप बघून हे समजत की टेन्ट चा आतील बाजूने आय लेव्हलला काही छोटे छोटे काप  केले गेले होते. ग्रुप ने पहिले हे छोटे काप पाडले व त्यानंतर त्यांनी मोठे काप मारून टेन्ट मधून पळ काढला. चला जरी हिमस्खलनाचा धोका इतकाच अटळ होता की ग्रुपचे सदस्य त्यांची बुटं, कोट न घालताच, टेन्ट चा दरवाजा न खोलताच थेट टेन्ट कापुन पळाले तराही मग छोटे काप मारून बाहेरचा अंदाज घेण्यात त्यांनी वेळ का घालवला असता? म्हणून मला नाही वाटत की हिम्सखलन झाले असेल. हिमस्खलन किंवा हिमस्खलनाची भीती ही कल्पना पहिल्या क्षणी फार छान आणि तर्कसंगत वाटते परंतु जेव्हा आपण भेटलेल्या पुराव्यांकडे पाहतो तेव्हा हीच कल्पना तर्कविसंगत भासते. त्यामुळे ह्या थिअरीला विसरलेलेच बरे. 


विझेय ला नेल्यानंतर पुन्हा उभारलेला तळ. ह्यावर कमीत कमी उभे आणि मोठे सहा काप तर आडवे आणि लहान सहा काप (आय लेव्हल ला) केले आहेत. हे सगळे काप आतून केले आहेत असे न्यायवैद्यकीय तपासात निष्पन्न झाले आहे. 
 
ग्रुप मधील काही सदस्यांचे हिंसक भांडण झाले आणि ज्यांना ह्या भांडणात पडायचं नव्हतं ते टेन्ट फाडून पळाले असाही युक्तिवाद केला जातो. ग्रुप मधील कोणीही हिंसक अथवा मानसिकरित्या असंतुलित नव्हतं हे सत्य जरी आपण दुर्लक्षिलं, तरीही ह्या युक्तिवादात विसंगती आढळून येतात. उदाहरणार्थ, टेन्ट वर केले गेलेले छोटे काप. आणि जरी हिंसक मारामारी झाली आणि एका ग्रुप ने दुसऱ्या ग्रुप चा जीव घेण्यासाठी पाठलाग जरी केला असेल तरीही त्यांनी कुऱ्हाडीसारखं खून करण्यासाठी लागणार महत्वाचं सामान टेन्ट मध्येच का बरं सोडलं? जरी एका ग्रुप ने दुसऱ्या ग्रुप चा मागोवा घेऊन शिकार केला असेल तरी त्यांनी त्यानंतर टेन्टकडे येऊन आपली हत्यारं, गरम कपडे आणि बुटं का उचलली नाहीत? एकाच्याही शरीरावर मानवी हिंसेतून झालेल्या प्राणघातक जखमा व इजा का बरं नाहीत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एकमेकांच्या जीवावर उठलेली लोक शेकोट्या का पेटवत बसली? जर तुम्ही जंगलात लपून स्वतःचा एखाद्या खुन्या पासून बचाव करत असाल तर शेकोटी पेटवणे हा सगळ्यात मोठा मूर्खपणा ठरेल कारण तुम्ही कुठे लपला आहात हे त्या आगीने लगेच जाहीर होईल. ही सगळी प्रश्न ह्या अंतर्गत हिंसेच्या युक्तीवादाला मूठमाती देण्यास पुरेशी आहेत. 

ग्रुप बाहेरील लोकांनी ग्रुपमधील लोकांचा खून केला अशीही एक थिअरी आहे. पण सर्वप्रथम, हे दुसरी लोकं कोण असतील? ह्यात मग अस बोललं जातं की ती एकतर मानसी लोक असावीत, विझेय गुलाग कॅम्प मधून पळालेले गुन्हेगार असतील किंवा रशियन स्पेशल फोर्स ची माणसं असतील नाहीतर CIA चेही माणसं असतील. ह्या लोकांना ग्रुपची हत्या करण्याचे काहीही कारण नव्हते त्यामुळे ही थिअरीही फोल ठरते. जरी चोरीच्या हेतूने त्यांचा खून केला असेल तरीही त्यांचे पैसे, कपडे, साहित्य आणि कॅमेरे हे तशेच सोडले होते. जेव्हा लोकं इतर सुदृढ शरीराच्या व्यक्तींचा खून करतात तेव्हा ते सुऱ्या, बंदुका, बोथट वस्तू, इत्यादी वस्तू वापरून करतात. ते सुऱ्या खुपसतात, गोळ्या मारतात, डोक्यात जड वस्तू घालतात किंवा गळा दाबून हत्या करतात. ग्रुपच्या शवांवर मानवी हत्येची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. आणि वर बोललो त्याप्रमाणेच जर तुम्ही रात्रीच्या अंधारात कोणापासून स्वतःचा जीव वाचवत लपून बसले असाल तर तुम्ही शेकोटी पेटवून स्वतःलाच संकटात का बरं टाकणार? ह्या सगळ्या कारणांमुळेच मला ही थिअरी सुध्दा अशक्य वाटते. 

आता मला UFO आणि Aliens यांबद्दलही बोलणं भाग आहे. खूप पूर्वीपासूनच उरल पर्वतं  हे UFOs चा मोठा केंद्रबिंदू राहिली आहेत. आजही येथे काही प्रमाणात UFOs च्या हालचाली चालूच आहेत. हरवलेल्या ग्रुप ची तपास मोहीम चालू असताना अधिकाऱ्यांनी ग्रुप च्य तळापासून ३० किमी अंतरावर तळ ठोकून असलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपची मुलाखत घेतली होती. हा ग्रुपही १ फेब्रुवारी ला त्याच पर्वतावर होता. ह्याच ग्रुपमधील एकाने मुलाखतीत असेही म्हंटले,

" आकाशात एक चमकती गोलाकार वस्तू  दक्षिण उत्तरेकडून उत्तर पूर्वेला गावावरून उडत गेली. ही गोलाकार तबकडी पौर्णिमेचा चंद्राएवढ्या आकाराची होती. एका निळसर पांढऱ्या तेजोमयी प्रकाशाने ती चहूबाजुंनी वेढलेली होती. हा तेजोमय प्रकाश अधून मधून चमकत होता. ही वस्तू क्षितीजाच्या मागे दिसेनाशी झाली पण ती जिथे नाहीशी झाली  तेथील आकाशाचा तो भाग पुढील बरीच मिनिटं प्रकाशित होता."

मृत गिर्यारोहकांच्या कॅम्पच्या ७० किमी दूर काही भूगर्भशास्त्रीही त्या दिवशी त्यांचं काम करत होते. त्यांनीही १ फेब्रुवारीला तश्याच गोलाकार, लकलकणाऱ्या वस्तू खोलत स्याखलच्या दिशेने उडताना पाहिल्या. १७ फेब्रुवारीला ह्याच भागात ड्युटीवर असलेल्या सैनिकांनीसुद्धा चमकणाऱ्या गोलाकार वस्तू खोलत स्याखल कडे जाताना पाहिल्या. ह्या वस्तू धुळीच्या ढगाने किंवा वाफेने वेढलेल्या होत्या आणि त्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जात होत्या असेही सैनिकांनी सांगितले. गिर्यारोहकांच्या शोधमोहिमेच्या वेळेस आणि त्याआधीही म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात तपास अधिकारी, विद्यार्थी, भूगर्भ वैज्ञानिक,मानसी आणि सैनिक अशा बऱ्याच प्रत्यक्षदर्शींनी या भागात आकाशात चमकणाऱ्या वस्तू उडताना पाहिल्याच सांगितलं आहे. 
तपासाचे मुख्य अधिकारी लेव इवानोव यांनी कझाख दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत असं सांगितलं,

" त्या वेळीही मला वाटत होते आणि आता तर मला खात्री आहे की आकाशात उडणाऱ्या त्या वस्तूंचा ग्रुपच्या मृत्यूशी थेट संबंध होता." 

अंतिम तपास अहवालातून UFOs चे सगळे संदर्भ काढून टाकावेत असा आदेश त्यांना देण्यात आला होता असाही दावा इवानोव यांनी केला आहे. 

१९५९ च्या सुरुवातीच्या काही महिन्यांत बऱ्याच लोकांनी उरलच्या आकाशात काही विचित्र वस्तू बघितल्या हे मी नाकारत नाही. आजही हे प्रकाशाचे विचित्र गोळे तिकडे उडताना दिसतात आणि ते काय आहेत ह्याबद्दल माझ्याकडे काहीही उत्तर नाही. जोपर्यंत आपण हे गोळे aliens aircraft आहे आणि त्यांनी त्यांच्या विमानातून उतरून आपल्या ग्रुपला मारलं असं मानत नाहीत तोपर्यंत तरी हे अनाकलनीय गोळे आणि गिर्यारोहकांचा मृत्यू यांत मला काहीही संबंध दिसत नाही. ह्या थिअरीला दुजोरा देणारा असा काहीही पुरावा आपल्याकडे नाही. किमान एकही पुरावा नाही.  परत इथेही तेच की जर aliens पासून वाचण्यासाठीच मुलं अंधाऱ्या जंगलात लपली होती तर त्यांनी आग का पेटवली? आगीमुळे aliens ना ते लगेच सापडले असते. उरल मध्ये वारंवार दिसणाऱ्या UFOs कुतूहलाचा विषय आहेत पण त्यांचा आपल्या गिर्यारोहकांच्या मृत्यूशी कोणताही थेट किंवा तार्किक संबंध मला दिसत नाही.

अजून एक तर्क असा की या भागात रशियन air-dropped mines (हवेतील सुरुंग) ची चाचणी चालू असताना ग्रुप चा अपघाती मृत्यू झाला. (Air-dropped mines ने बसणारा मार हा शरीराच्या आतून जास्त तर बाहेरून कमी बसतो त्यामुळेच बाहेर जखमाही कमी होतात. ग्रुप चा शवविच्छेदनात हा प्रकार दिसून आलेला.) १९५० च्या दशकात रशियन जेट विमाने येथून उडायची हे खरं आहे आणि air-dropped mines हे विश्वास करण्यासारखं कारणही आहे परंतु जर सगळी मुलं टेन्ट मधेच मृत सापडली असती तरच हे कारण तर्कसंगत वाटले असते. आणि जरी mine च्या स्फोटात ही मुलं मारली गेली हे आपण मानलं तरीही फक्त दोनच शवांवर आपल्याला mine सारख्या जखमा दिसल्या आहेत. कशाला तरी घाबरून त्यांनी टेन्ट सोडला व त्यानंतर सहा तासांनी त्यांचा मृत्यू झाला म्हणजेच mines ची थिअरीही अतार्किक आहे. 

आणखीन एक थिअरी आहे ती अशी की freak wind आणि हवामान यांमुळे उठलेल्या इन्फ्रा ध्वनी तरंगांमुळे (infra sound) गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. हे तरंग खरे आहेत आणि मानवी कानाच्या क्षमतेपेक्षा बऱ्याच खालच्या स्तरावर (२० hertz) त्या आवाज करतात. इन्फ्रारेड आवाज अनुभवल्यावर एक पंचमाउंश लोकांना भीती, चिंता आणि श्वसनाचा त्रास होतो असे २००३ मध्ये UK मध्ये केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. तर हे २०% सोडून आपण असं मानू की १००% (संपूर्ण ग्रुप) लोकांचे चित्त ह्या इन्फ्रा ध्वनी तरंगाने हरपले, ते घाबरले आणि भीतीने टेन्ट मधून पळाले. आता ते का घाबरले आणि पळाले हे आपल्याला इन्फ्रा ध्वनी तरंगाच्या तर्काने समजू शकतं पण त्यांच्या जखमा आणि मार ह्या थिअरीतुन स्पष्ट होत नाही.


देवनार वृक्ष ह्या अवस्थेत होता. झाडाचा वरील भाग जेथे फांद्या तुटल्या आहेत तो जमिनीपासून १५ फूट उंचीवर आहे. 

जंगली श्वापदांचा हल्ला ही शेवटची कॉमन थिअरी आहे. खरं तर आपल्याकडे असलेल्या सगळ्या पुराव्यांत हीच थिअरी नीट बसते. जर ग्रुपला टेन्टबाहेर कोणत्या प्राण्यांची चाहूल लागली असेल तर त्यांनी टेन्टला बारीक छिद्र करून त्याला पाहण्याचा प्रयत्न केला असता. त्यानंतर जर त्या प्राण्याने जबरदस्ती टेन्ट मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असता तर आपला ग्रुप तेथून पळत सुटला असता जस त्यांनी थोडा पर्वत उतरून केलेही. ह्याच प्रकारे आग का पेटवली गेली ह्याचही कारण स्पष्ट होते. आगीने जरी मानवी शत्रू आकर्षित होत असतील तरी प्राणी हे मात्र घाबरून दुसरीकडे निघून जातात. टेन्ट सोडल्याच्या ७ तासानंतर ग्रुप मधील काही सदस्य जिवंत असूनही हिंस्र प्राण्यांच्या भीतीमुळे पुन्हा टेन्टकडे फिरकले नाहीत हेही ह्यास सुसंगत वाटते. शेवटी देवनार झाडावर चढण्याचा केलेला प्रयत्न सुद्धा एखाद्या प्राण्याला घाबरूनच केला गेला असावा हे सुद्धा ह्यात बिनदिक्कत बसते. 
आता ह्यात दिक्कत आहे ती अशी की प्राणी तर मग कोणता प्राणी? 
उरलच्या काही भागांमध्ये तपकिरी अस्वलांचं वास्तव्य आहे परंतु खोलत स्याखलवर त्यांची अजूनही कधी नोंद झालेली नाही. हिवाळी दिवसांमध्ये तपकिरी अस्वल साधारण १०० दिवसांसाठी झोपी (hibernate) जातात. पण एखादं अस्वल १ फेब्रुवारीला कॅम्पसाइटला हजर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक पूर्णपणे वाढ झालेलं तपकिरी अस्वल ८ फूट उंच आणि ६०० किलो वजनाच्या आसपास असतो. ही अस्वले फार भयानक असतात आणि त्यांनी माणसांवर हल्ला चढवल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु ह्यात मूळ समस्या अशी की जर अस्वल आलं होतं तर त्याच्या पायाचे ठसे हे कोणत्याही शोधकर्त्याला मोहिमेत भेटले नाहीत आणि कोणत्याही शरीरावर अस्वलाच्या हल्ल्याची चिन्ह दिसत नाहीत. हीच समस्या उरल मधील इतर मोठे शिकारी प्राणी जसे की कोल्हे, लिंक्स, वोल्वरिन यांच्या बाबतीतही आहे. टेन्ट मधून पळ काढून शेकोटी करेपर्यंतचा सगळा घटनाक्रम हा चांगल्यापैकी ह्या थिअरीत बसतोय. ग्रुपची वर्तणूक एखाद्या प्राण्याच्या भीतीमुळे अशी झाली असावी हेही खरे वाटते पण गिर्यारोहकांच्या मृत्यूला कारणीभुत ठरलेल्या जखमा उरल मधील कोणत्याही प्राण्याच्या हल्ल्याशी साधर्म्य दाखवत नाही आणि कोणत्याही शरीरावरील मांस हे प्राण्यांनी खाल्लं आहे असं तपासात सापडलेलं नाही.

माझे मत

हल्ला करणारा जर एखादा अस्वल किंवा कोल्हा नव्हता तर असा कोणता भयानक हिंस्र प्राणी होता ज्याने मुलांना पळण्यास भाग पाडलं आणि इतक्या जबरदस्त जखमाही दिल्या? 

सूचना: येथून पुढे सगळं काही गंभीररीत्या विचित्र असं होणार आहे. खरंच! जेव्हा मी दयातलोव पासच्या शोकांतिकेवर संशोधन सुरू केलं तेव्हा मला वाटलंही नव्हतं की मी या रंजक ठिकाणी येऊन थांबेन. पण ते बोलतात ना, पुराव्यांचा मागोवा घेत रहा मग ते तुम्हाला कोठेही नेऊन सोडोत त्यांचा माग सोडू नका. 
असो, चला बघूच काय ते...

ज्या पर्वताच्या उतारावर शेवटचं तळ ठोकलं गेलं त्या पर्वताचे मानसी भाषेत नाव आहे खोलत स्याखल. मुलं जी नकाशे वापरत होती त्यांवर हे नाव लिहिलेलं नसेल आणि त्यांना हे स्थानिक नाव माहितीही नसेल. त्यांना पर्वताचे फक्त Elevation १०७९ हे भावनाहीन नाव माहिती असेल. 

खोलत स्याखलचा अर्थ आहे मुडद्यांचा पर्वत किंवा मृतांचा पर्वत. ज्या भागातुन ग्रुप प्रवास करत होता त्या भागात मानसींनी प्रवेश निषिद्ध केला आहे (ग्रुप ज्या माऊंट ओरोटेनची चढाई करण्याच्या बेतात होता त्याच्या नावाचा मानसी भाषेत अर्थ आहे: तिथे जाऊ नका पर्वत). भूतकाळात नऊ मानसी शिकाऱ्यांचा खोलत स्याखलवर गुढरित्या मृत्यू झाल्याच्या गोष्टी येथील मानसी लोकांमध्ये प्रचलित आहेत. मानसी लोकं १९५९ साली कॅलेंडरचा वापर करत नव्हती. येणाऱ्या जाणाऱ्या वेळेला ते इतकं महत्व देत नसत यामुळे या नऊ शिकाऱ्यांचा मृत्यू नक्की पाच की पन्नास की आणखीन काही वर्षांपूर्वी झाला हे सांगणे अशक्य आहे. अशी घटना खरोखर घडली की नाही हे सांगणही अशक्यच आहे. तस असलं तरी मानसी लोकांचा ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास होता आणि यामुळेच या भागात त्यांच्या शिकाऱ्यांना येण्यास मज्जाव होता. हिवाळ्यात शिकार हा मानसींच्या जगण्याचा एकमेव आधार होता त्यामुळे इतका मोठा भाग निषिद्ध ठरवणे ही  खरं तर खूप गंभीर गोष्ट आहे. 

मानसींच्या मते मेंक (Menk)/ मैंकवी (Menkvi) नावाचा भयानक प्राणी येथे राहत होता त्यामुळे सगळे मानसी ह्या भागात येणं टाळत. मेंकची विभिन्न वर्णनं केली गेली आहेत पण त्या सर्वांत एका मोठ्या, ताकदवर, केसाळ, वानरासारख्या दोन पायावर चालणाऱ्या प्राण्याचे वर्णन केले आहे. तो खूप आक्रमक आहे, हिंसक आहे, प्रादेशिक मालकीच्या भावनेने भरलेला आहे आणि तो अंधार पडल्यानंतर सक्रिय होतो अस मेंकच वर्णन करताना मानसी सांगतात. त्यांच्यामते मेंक ने माणसांबद्दल दाखवलेल्या आक्रमकतेमुळे देवाने क्रोधीत होऊन जग बुडवले होते(the great flood). मानसी मेंक ला अलौकिक प्राणी मानत असले तरीही तो एक खरा प्राणी आहे ह्यावरही विश्वास ठेवतात. मुलांचा मृत्यू होण्याच्या काही आठवडे अगोदर एका मानसी गुराख्याने मेंकने त्याची हरणं खाल्ल्याची तक्रार केली होती. मुलांच्या शोधकार्यात जेव्हा शेवटची चार शवं भेटली तेव्हा तेथे उपस्थित असलेली मानसी लोकं खूप चिंताग्रस्त झालेली असं नोंदवलं गेलं आहे. शवं बघितल्यानंतर त्यांनी हे मेंकचेच काम आहे असं लावून धरलं. मेंकच्या भागातून जाताना नऊ च्या गटाने जाणे हे सुरक्षित नसतं कारण नऊ हा मेंक भागात दुर्देवी क्रमांक आहे असे मानसींच म्हणणं होतं. जर काही कारणास्तव मानसींना ह्या भागातून प्रवास करावा लागलाच तर ते तो दिवसा करीत, लवकर करीत आणि कधीही नऊच्या गटात इकडे फिरकत नसत.

मोठ्या, वानरासारख्या दिसणाऱ्या आणि रिमोट भागांत राहणाऱ्या प्राण्यांबद्दल रशियात फार पूर्वीपासून नमूद केलं गेलं आहे आणि आजही अश्या प्राण्यांबद्दल रशियात बोललं जातं. फक्त मानसी हे त्याला मेंक या नावाने संबोधतात बाकी इतर रशियन भागांमध्ये त्याला अलमस (Almas) म्हणून ओळखलं जाते. स्थानिक लोक जरीही त्यांना कुत्र्या मांजरांइतकंच खरं मानत असली तरीही ह्या प्राण्यांच्या अस्तित्वाबद्दल काहीएक पुरावा उपलब्ध नाही. बरेचशे प्राणितज्ञ त्यांना हिमालयातील यति किंवा उत्तर अमेरिकेतील सासस्क्वाच सारखाच एक पौराणिक प्राणी म्हणूनच ग्राह्य धरतात. याविरूद्ध वेगवेगळ्या असंख्य विश्वासार्ह प्रत्यक्षदर्शींची वृत्तांत, प्राण्यांच्या मिळालेल्या पायांच्या खुणा आणि फोटोंज यांच्या अभ्यासानंतर बऱ्याच लोकांचा ह्या प्राण्यांच्या अस्तित्वावर विश्वास बसला आहे. ते याला खरा पण न सापडलेला प्राणी म्हणून मानत आहेत.

ग्रुप जर्नल च्या ३१ तारखेच्या भागात (जी त्या दिवशी दयातलोव ने लिहिली आहे) एक गुप्त नोट लिहिली आहे. यात ग्रुपला असे वाटत होते की एका मानसी शिकाऱ्याने तेथून प्रवास केल्याच्या काही काळानंतर ते तेथून वाटचाल करत होते. ह्या पानावर 'थोडयाच वेळा अगोदर' (not long ago) अस लिहिलेलं आहे. कोणाबद्दल हा उल्लेख केला गेलाय हे माहिती नाही. येथे ग्रुप ला पायांचे ठसे दिसले असतील का? की पुढील वाटेवर किंवा झाडांत काही मानवी आकृती? 

खाली कदाचित ३१ जानेवारीला लिहिल्या गेलेल्या Evening Oroten च्या शेवटच्या भागाचे पूर्णपणे भाषांतर केले आहे. 

२१ व्या पार्टी बैठकीने वाढली पर्यटकांच्या डोक्याची सुपीकता 
प्रेम आणि भटकंती या विषयांवर रोज टेन्टच्या आवारात भरते एक तत्वज्ञानी चर्चासत्र. मुख्य व्याख्यानकार डॉ. थिबाल आणि विज्ञानाची उमेदवार दुबिनीना. 
आर्मेनी कोडं
काय नऊ पर्यटक एक स्टोव्ह आणि एक ब्लॅंकेट यांनी उष्ण राहू शकतात?
विज्ञान
यतिच्या अस्तित्वावरून शास्त्रीय वर्तुळात सध्या चांगलाच वादविवाद रंगलाय. ऐकण्यात आलं आहे की यति हे उत्तरी उरल चा ओतोरटेन भागांत आढळून येतात.
तांत्रिक बातमी
हातोडा हा कार, ट्रेन आणि घोड्यावर कामाचा आहे, बर्फात नाही. मुख्य कल्पक कोलेवातोवेम
यांचा सल्ला घ्या.
क्रीडा
दोरोशेंको- कोलमोगोरोव या शिपाई तुकडीने सहज नेता येणाऱ्या घडीच्या शेगडीची १ तास, २ मिनिटं व २७.४ सेकंदांत उभारणी करून एक नवा विश्वविक्रम केला. 

विज्ञान मथळ्याखालील लिखाण सुचवत की ग्रुप यति सारख्या प्राण्याबद्दल चर्चा करत होता. कशामुळे त्यांना ह्या बद्दल चर्चा करण्याचा विचार आला असेल? त्यांनी काही बघितलं होत का? हा यतिचा उल्लेख ग्रुपजर्नल मधल्या मानसी शिकाऱ्यासंबंधी असेल की निव्वळ योगायोग असेल? ही बाबसुद्धा लक्षात घेतली पाहिजे की Evening Oroten चा हा अंक त्यांच्या सामानातून १९९० च्या दशकात गहाळ झाला होता. आणि हे लिखाण नंतर एका रशियन संशोधकाने शोधून काढलेलं आहे. त्यामुळे ह्याची सत्यता पडताळता येणं कठीण आहे. पण लिखाणातील मजेशीरपणा हा बाकीच्या लिखाणाशी साधर्म्य राखतो त्यामुळे ती खरी असण्याची शक्यताही दाट आहे. 

गहाळ झालेल्या पानांमध्ये Evening Oroten च्या अजून एका पानाचा समावेश आहे. ते पान आहे १ फेब्रुवारीच्या अंकाचं. कदाचित हा अंक लिहितानाच ग्रुप टेन्ट सोडून पळाला असावा. हे पान नंतर सापडलेले असून त्यात फक्त एक हेडलाईन पूर्ण लिहिली आहे ती अशी: "आम्हाला आता कळलंय की हिममानवं आहेत!"
नंतर असं समजलं की तपासा दरम्यान ह्या वाक्यावर चर्चा झाली होती व अस गृहीत धरलं गेलं की इतक्या वेळ उघड्या रानात फिरून फिरून अंगावर जमलेल्या बर्फामुळे ग्रुप स्वतःला हिममानव म्हणून संबोधत होता. हा अंदाज बरोबरही असेल परंतु आपल्याला हेही जाणून घ्यायच आहे की ग्रुप ने त्यांनी आखणी करताना ठरवलेला रस्ता सोडून १ फेब्रुवारीला दुसरा रस्ता पकडायचं का ठरवल. जंगलातून पास पर्यंत मार्ग काढून तिकडेच कुठेतरी तळ ठोकायचा सोडून मुलांनी जंगल सोडलं, खोलत स्याखल चढुन त्याच्या बर्फाने भरलेल्या एका उतारावर तळ ठोकला. पूर्ण प्रवासात पहिल्यांदाच त्यांनी जंगलाच्या बाहेर तळ ठोकला होता. १ फेब्रुवारीच्या सकाळी त्यांनी जंगलात अस काही पाहिलं होतं का ज्याने त्यांना खूल्या जागेत राहणे सुरक्षित वाटलं असेल? शेवटच्या Evening Oroten च्या मथळ्यातील वाक्यातुन ह्याबद्दलच बोललं गेलं होतं का?

ज्या शोधकर्त्यांना टेन्ट सापडला त्यांच्या रिपोर्ट मध्ये असं नमूद केलेलं की टेन्ट पासून खाली जाणाऱ्या ठस्यांमध्ये एक ठसे (ठस्यांची जोडी म्हणा) बुटं घातलेल्या व्यक्तीचे होते, काही ठसे मोजे घातलेल्यांचे होते, एक ठसे एकाच पायात बूट घातलेल्या व्यक्तीचे होते आणि एक ठसे हे अनवाणी व्यक्तीचे होते. पण जर मिळालेल्या शवांपैकी कोणतेही शरीर अनवाणी नव्हते तर मग हे अनवाणी पायांचे ठसे कोणाचे होते? कोणी टेन्ट मधून पळताना मोजे हातात घेऊन पळून नंतर ते मोजे पायात घातले का? कोणीतरी पळताना अनवाणी पळून नंतर ग्रुप मधील इतर कोणाकडून त्यांचे मोजे घेतले असतील का (ग्रुप मधील काही सदस्यांनी एकापेक्षा अधिक मोजे घातले होते यामुळे हेही शक्य आहे)? पण अनवाणी पायांचे जे ठसे भेटले ते मानवी ठसे तरी होते का? कदाचित ग्रुप ज्याला घाबरून टेन्ट सोडून पळाला त्याचेच ते ठसे असतील आणि त्याने त्यांचा पुढेही पाठलाग केला असेल तर? 


शेवटी आपण टेन्टमध्ये मिळालेल्या एका फिल्मरोल कडे लक्ष देऊ. हा रोल १ फेब्रुवारीच्या संध्येच्या अगोदर कॅमेऱ्यातून काढून सील करून इतर एक्सपोज्ड फिल्म रोल्स सोबत एका बॉक्स मध्ये ठेवला गेला होता. ह्या रोलमध्ये सतरा फोटो एक्सपोज केले गेलेले जे पुढील तपासात डेव्हलप केले गेले. हे फोटो निकोलाई ब्रिगनोलने घेतले असावेत असा अंदाज आहे.  सतरा मधील सोळा हे ग्रुप चे २७ जानेवारीपासून प्रवासादरम्यान घेतलेले फोटो आहेत. ह्या सतरामधील पहिले सोळा फोटो हे चांगल्या पद्धतीने फोकस करून घेतलेली आहेत परंतु सतरावा फोटो हा खूप अंधुक आणि घाई गडबडीत घेतला गेलेला भासतो. हा फोटो कधी घेतला गेला हे आपण नक्की सांगू शकत नाही पण त्याची रोल वरील जागा बघून असे वाटते की तो नक्कीच ३१ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीच्या सकाळी खोलत स्याखल चढण्याच्या आधी घेतला गेला असावा. 


ब्रिगनोल ने घेतलेला १७ वा आणि शेवटचा फोटो.  

ह्या फोटोग्राफ मध्ये काय दिसतंय? तपासावेळी हा फोटो ग्रुपमधीलच एका स्की जॅकेट घातलेल्या व्यक्तीचा काही अरुंद वाट उतरतानाचा आऊट ऑफ फोकस फोटो म्हणून ठरवून दुर्लक्षित केला गेला. तो तो असेलही. तरीसुद्धा ह्या फोटोतील शरीराचा आकार आणि प्रमाण हे जड स्की जॅकेट व दोन तीन ट्राऊझर घातलेल्या मानवी शरीरापेक्षा खूप वेगळ वाटत.  उदाहरणार्थ, ह्या फोटोची त्याच रोल मध्ये असलेल्या रुसतेम स्लोबोदिनच्या खालील फोटोसोबत तुलना करून पहा. 


ग्रुपमधील सर्वांनी स्लोबोदिनच्या पेहरावासारखाच काहीसा पेहराव परिधान केला होता. खाली साध्या प्रकारच्या एक किंवा दोन ट्राऊझर आणि त्यावर गडद रंगाची एक जलरोधक स्की ट्राऊझर घातली आहे. एक हलक्या रंगाचा अवजड स्की जाकीट व त्याखाली काही शर्ट आणि स्वेटर. ह्यातून मी आपल्याला अस सांगतोय की फोटोमध्ये कम्बरेजवळचा भाग जेथे अनेक कपड्यांचे थर आहेत हा अवजड आणि पसरलेला वाटतोय. अंधुक फोटोमधील आकृती ह्यापेक्षा खूप वेगळी दिसते आहे. तिच्या कपड्यांचा रंग गडद ट्राउझर आणि हलका जाकीट यामध्ये विभागने तर कठीण आहेच परंतु त्या शरीराचा छातीकडील भाग विस्तृत तर कंबरेकडील भाग हा बारीक होत गेला आहे. जरीही तो वेगळा करण्यास कठीण असला तरीही तो ग्रुप मधल्या कोणत्याही सदस्याच्या फोटोसारखा दिसत नाही. आणि शेवटी हाही प्रश्न उपस्थित होतो की ब्रिगनोलने ही फिल्म कॅमेऱ्यातुन का काढली? न वापरलेली फिल्म रोलमध्येच राहिली पण ती फिल्म कॅमेऱ्यामधून काढली गेली. असे का? हा फोटो महत्वाचा आहे असे ब्रिगनोलला वाटले असेल का? त्यामुळेच त्याने तो सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला असेल का?

याचा अर्थ या नऊ जणांचा खून यतिने केला असं मला वाटत का? नाही. मी अजूनही ह्या निकषावर खात्रीने थांबू शकत नाही. पण तरीही ग्रुप ने ज्या प्रकारे टेन्ट सोडला त्यावरून तरी असेच भासते की त्यांना कोणत्यातरी बाह्य गोष्टीचा धोका जाणवला होता. पळ काढल्यानंतरच्या त्यांच्या हरकती आणि जखमा पाहून हेही समजते की ते हिमस्खलन किंवा शिकारी प्राणी ह्यांपासून पळाले नव्हते. मग उरतं काय?
काही सदस्यांच्या अंगावरील जखमा ह्या नक्कीच विचित्र आहेत आणि मानसींनी मेंक च्या हल्ल्यांबद्दल जी काही माहिती दिली आहे त्याच्याशी त्या साधर्म्य राखून आहेत. असं बोललं जातं की मेंक कडे मोठी नखे व दातही नाहीत आणि तो कोणत्याही प्रकारचं हत्यार सुद्धा वापरत नाही. माणसांवर आक्रमक असलेले मेंक शरीरानेच इतके ताकदवर आहेत की आपल्या शक्तीच्या जोरावर फक्त हात आणि पाय वापरून ते माणसांचा जीव घेतात. खरं तर अश्या प्रकारच्या हल्ल्यातून डोक्याला व शरीराला जबर मार लागू शकतो व शारीरिक जोर वापरून केलेल्या अश्या हल्ल्यात त्वचेला न तोडताच थेट शरीराच्या आतील भागात मार बसू शकतो. ब्रिगनोल ने घेतलेला शेवटचा फोटो खरच विलक्षनिय आहे. मी जितक्या जास्त वेळेस ह्या फोटो कडे पाहतो तितकं जास्त मला अवघडल्यासारखं होत. ह्या फोटोतील आकृती मला वारंवार अमानवी वाटते. ग्रुपला यतिच्या कोण्या रशियन भाईबंधाने पळवून मारले हे मी खात्रीपूर्वक नाही म्हणू शकत. परंतु पुरावे पाहिल्यानंतर ग्रुप ला एका मोठ्या, वानरासारख्या दिसणाऱ्या प्राण्याने मारले हेही मला अमान्य करता येत नाही. 

मी आतापर्यंत अभ्यासलेल्या केसेस पैकी ही केस सर्वात वेगळी आणि तितकीच विलक्षणीयही आहे. मला तार्किक निकषांवर पोहोचायला आवडतं आणि जेव्हा मी ह्या केसचा अभ्यास सुरू केला तेव्हा मी असेच मानून चालत होतो की ह्याचे उत्तर हे एकतर हिमस्खलन, हिमस्खलनाची भीती किंवा ग्रुप मधील किंवा ग्रुप बाहेरील व्यक्तींकडून ग्रुपचा खून हेच असेल. परंतु प्राप्त पुरावे माझ्या डोक्यातल्या कोणत्याही प्रमेयाला आधार देत नाहीत. घटनेतील परिस्थिती आणि ग्रुप ला लागलेला मार हे दोन्हीही खुप वेगळ्या प्रकारचे होते. पूर्ण केस आणखीनच विचित्र होऊन जाते जेव्हा तुम्ही ह्या समीकरणात UFO रिपोर्ट्स आणि यतिला टाकता. फक्त आता ह्यात जर लॉच नेस मॉन्स्टर टाकला तर केसमध्ये क्रिप्टो झुओलॉजीच्या सगळ्या शाखा व्यापतील. 

ते काहीही असो पण १९५९ मध्ये कोण्या वेगळ्या गोष्टीने ह्या नऊ गिर्यारोहकांचा जीव घेतला. मी केलेलं विश्लेषण आणि संशोधन शेवटी असमाधानकारकच आहे आणि खऱ्या तपसाच्या उपलब्धीपेक्षा मी काही जास्त असं सांगू शकलो नाही याचा मला खेद आहे. ही गिर्यारोहकं कुठल्यातरी 'अज्ञात लक्षवेधी ताकदीने' मारली. आणि आज ह्या घटनेला साठ वर्षं उलटल्यांनंतर आपण ह्यापेक्षा जास्त काही बोलू शकतो किंवा सुचवू शकतो असे मलातरी वाटत नाही. आजही आणि कदाचित भविष्यातही.

१९५९ नंतरही या भागात नव्या शोकांतिका घडतच राहिल्या. १९६०/६१ मध्ये इकडे तीन विमानं क्रॅश झाली. यात नऊ भूगर्भशास्त्री आणि पायलट यांना आपला जीव गमवावा लागला. १९६१ मध्ये लेनिनग्राड मधून आलेल्या ९ गिर्यारोहकांचा ह्याच भागातील दुसरा पर्वत चढताना मृत्यू झाला. २००८ साली एका Mi-8 हेलिकॉप्टरच इंजिन खोलत स्याखल जवळ आल्यावर निकामी झालं. हेलिकॉप्टरला निकडीने तेथेच उतरवावे लागले आणि नशिबाने त्यावेळी हेलिकॉप्टर मध्ये असलेल्या नऊ जणांपैकी कोणालाही काही इजा झाली नाही. आता मागे २०१६ मध्ये नऊ वाटसरूंना खोलत स्याखल जवळ एका माणसाचं शवं भेटल्याची बातमी एका रशियन दैनिकात आली होती. हा माणूस दयातलोव पासच्याच रहस्याच संशोधन करायला निघालेला असाही उल्लेख त्यात केला होता. ह्या सगळ्या घटनांमध्ये तुम्हाला काही पॅटर्न दिसतोय?

तुम्हाला ह्या केस बद्दल काय वाटत?

सूचना

२०१२ पासून गिर्यारोहकांनी घेतलेले काही फोटोज रशियन सोशल नेटवर्किंग साईट्स वर फिरत आहेत. हे फोटो दयातलोव केसमधील न प्रसिद्ध झालेली फोटो म्हणून फिरवली जात आहेत. ह्यातील बरेचसे फोटो हे मुख्य तपास अधिकारी लेव इवानोव यांच्या मुली मार्फत दिली जात आहेत अस बोलल जातंय. हे फोटो तिच्या वडिलांना तपास करताना भेटले होते परंतु त्यांनी ते अंतिम अहवालात वापरले नाहीत. ह्यात खोलत स्याखल वर काहीतरी मोठी वस्तू उडताना दाखवणारे काही फोटो खरंच धक्कादायक आहेत. पण ह्या फोटोंबद्दल, त्यांच्या खरेपणाबद्दल साशंकता असल्यामुळे मी ते फोटो येथे वापरलेले नाहीत.  त्यामुळे ह्या लेखात फक्त तपासादरम्यान शोधकर्त्यांकडून खात्री पटवलेले फोटोच वापरले आहेत. 

शवं शोधलेल्या काही शोधकर्त्यांनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी शवांवरील त्वचेचा रंग उडाल्याचेही सांगितलं आहे.  ह्याबद्दलच्या उल्लेखांत शरीराचा रंग हा उन्हाने काळवंडलेला किंवा पूर्णपणे काळा झालेला सांगितलं आहे. काही उल्लेखांत त्वचेचा आणि केसांचा रंग पूर्णपणे नाहीसा झाल्याचेही सांगितलं आहे. मी त्यांना येथे नमूद केले नाही कारण मला शवविच्छेदन आणि तपासातील कागदपत्रांमध्ये असा कोणताही उल्लेख आढळला नाही. त्यात फक्त नैसर्गिकरित्या शरीर व केसांचं विघटन झाल्याने रंगबदल झाल्याचं बोललं आहे.

अनुवादकाच्या सूचना 

हा लेख स्टीव्ह यांनी मार्च २०१६ मध्ये लिहिला होता त्यानंतर ह्या घटनेसंबंधी काही महत्वाच्या नव्या घडामोडी झाल्या आहेत ज्या मी मांडू इच्छितो.

फेब्रुवारी २०१९ मध्ये रशियन अधिकाऱ्यांनी बऱ्याच फिर्यादींमुळे दयातलोव पास ची केस रिओपन केली. ही केस एकदाची पूर्णपणे बंद करून टाकू असा यामागील उद्देश होता. 

जुलै २०२० मध्ये, साधारण एक वर्ष तपास करून गिर्यारोहकांचा मृत्यू हिमस्खलनामुळे झाला असे सांगून ही केस पूर्णपणे उलगडल्याचे जाहीर करून तीला बंद केले गेले. 

हा निकष खूपच हास्यास्पद आणि अपमानकारक आहे. मी स्वतः मागील दहा वर्षांपासून वर्षाचे दहा दिवस तरी ह्या केस कडे बघण्यात घालवतो आणि जरी मेंक हे उत्तर नसेल (मी या बाबतीत संभ्रमित आहे) तरीही अजून काही थिअरी आहेत ज्या या घटनेची उत्तरं देऊ शकतात. 

ग्रुप ने भाडेतत्वावर सामान वाहून नेण्यास ठेवलेला मानसी आदिवासी हा गुन्हेगारी पार्शवभूमीचा होता. याबद्दलही एक थिअरी आहे परंतु स्टीव्ह यांनी ती येथे उल्लेखली नाहीये कारण जखमा ह्या मानवी हत्यारं किंवा अवजारांपासून झालेल्या नाहीत. 

दुसरी एक थिअरी अशीही आहे की जिथे घटना घडली तिथे सोविएत रशियाची सेना स्फोटकं आणि विमानं यांच्या बेजबाबदारपणे चाचण्या घेत असत. पण येथे कोणतीही शेल्स किंवा स्फोटकांतून आलेला कचरा मिळाल्याचे अजूनतरी माझ्या वाचनात आलेले नाही म्हणून ही थिअरी सुद्धा बाद होते.  

सध्या तरी मेंक किंवा तत्सम लाजरा व हिंस्र प्राणी येथे असल्याचेच मी मानेन. नवी माहिती पुढे अली तर हे बदलूही शकतं किंवा हीच थिअरी खरीसुद्धा ठरू शकते. 

ह्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी

Dyatlov-Pass.com 
इंग्रजीभाषेत दयातलोव बद्दलची उत्तम, व्यापक व सर्वसमावेशक अशी कोणती साईट असेल तर ती हीच असेल.

ZAJIMAVOSTI.info
इथे दयातलोव पासच्या रहस्याबद्दलचे बरेचसे लेख उपलब्ध आहेत. खऱ्या तपासादरम्यान लिहिलेल्या अमूल्य अश्या खऱ्या कागदपत्रांची स्कॅन्स येथे मिळतील. नव्या लेखात दयातलोव पास संबंधी भेटलेल्या 'नव्या' फोटोंबद्दल बोललं आहे. साईट झेक भाषेत असल्याने ती वाचण्यासाठी तुम्हाला गुगल ट्रान्सलेट वापरावे लागेल. 

Mountain of the Dead: The Dyatlov Pass Incident, २०१०, Keith McCloskey.
हे बऱ्यापैकी मधला मार्ग काढून लिहिलेलं पुस्तक आहे. बऱ्याचशा सर्वश्रुत असलेल्या थिअरी ह्या पुस्तकात कव्हर केल्या आहेत. 
लिंक: https://amzn.to/2E3HYv1

Dead Mountain: The Untold True Story of the Dyatlov Pass Incident, २०१४, Donnie Eichar.
बरचशी इत्यंभूत माहिती ह्यात आहे आणि एक मध्यम मार्ग घेऊन ह्या घटनेबद्दल या पुस्तकात लिहिलं आहे. घटनेशी संबंधीत असलेल्या काही लोकांच्या मुलाखती यात आहेत. तसेच ग्रुप ने पायवाट केलेला पूर्ण रस्ता पुन्हा शोधण्याचा प्रयत्नही यात केला आहे.
लिंक: https://amzn.to/3iSe4Z6

Author 

Steve MacGregor



स्टिव्ह मॅकग्रेगर (Steve MacGregor) हे UK बॉर्न इंग्लिश लेखक आहेत. ते इतिहास, रहस्य आणि गुन्ह्यांशी संबंधित लेख व पुस्तकं लिहितात. तुम्ही त्यांची पुस्तकं ऍमेझॉन वर विकत घेऊ शकता. 


स्टिव्ह यांची वेबसाईट


ह्या लेखाबद्दल जे काही मत असेल ते कमेंट मध्ये कळवा आणि नव्या गूढ रहस्य संबंधित लेखांसाठी साईट ला भेट देत रहा. 

माझे लेख आवडत असतील व पुढील लेखांसाठी मला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर माझ्या ऍमेझॉन अफिलिएट लिंक्स वरून शॉपिंग करा. 

ऍमेझॉन अफिलिएट लिंक

अजून रहस्य लेखांसाठी वेबसाईटला भेट देत रहा. तुम्हाला कोणत्या रहस्याबद्दल लेख हवा असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये तसं कळवा. 

तोपर्यंत माझ्या YouTube Channel ला भेट देऊन वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल जाणून घ्या!


Comments

Popular Posts

कोसला समीक्षा अणि विश्लेषण || Kosla Book Review & Analysis

Why you need to watch Asur? || Asur Webseries Review