जॅक द रिपर चे रहस्य । Jack The Ripper Mystery In Marathi

 जॅक द रिपर चे रहस्य । Jack The Ripper Mystery In Marathi


लेखक: अमित संजय भालेराव

  • प्रस्तावना

साल १८८८. ठिकाण लंडन. राणी व्हिक्टोरियाचा काळ. 
या वर्षाच्या ऑगस्ट ते नोव्हेंबर या काही महिन्यांमध्ये पाच महिलांची फार निर्घृण पद्धतीने कत्तल करून विकृत केलेली शरीरं सापडली. ती कोणी, कशी व का केली हे कोणालाही समजत नव्हतं. पुढे अजून काही मृतदेह सापडत राहिली पण हा खुनी काही सापडला नाही. हा न सापडलेला खुनी जॅक द रिपर म्हणून कुप्रसिद्ध झाला. त्या तीन महिन्यांच्या काळात पोलीस आणि रहिवासी रात्री बाहेर पडावयास घाबरत. काही लोकांना हे भुताचं काम वाटे तर काही लोकांना सैतानाचं. या घटनांची जगभरात चर्चा झाली आणि १८८८ किंवा लेट व्हिक्टोरिअन इरा म्हंटल की जॅक द रिपर हीच ओळख जगभरात रूढ झाली. आज १३२ वर्षांनंतरही या खुनांमागचं रहस्य कायम आहे. ही केस अजूनही ओपन आहे आणि बऱ्याच लोकांनी त्यांचं पूर्ण आयुष्य खुन्याचा तपास करण्यात घालवलं आणि अजूनही घालवत आहेत. जॅक द रिपर चा अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांना Ripperologist असं म्हंटल जात आणि त्याच्या अभ्यासाला Ripperology. आज पर्यंत हजारो विद्यार्थी, प्राध्यापक, इतिहासकार, शास्त्रज्ञ आणि तपास अधिकाऱयांनी या घटनेवर आपले आपले रिसर्च पेपर व dissertations प्रकाशित केले आहेत. लंडन हे रिपर शिवाय अपूर्ण आहे.  
मला स्वतःला या True Crime खुनांमध्ये खूप रुची आहे. True Crime च वैशिष्ट्य असं की त्या खूप थरारक असतात. त्याचबरोरबर त्या हेही दाखवतात की माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो. वेगवेळ्या True Crime बद्दल मी अधून मधून काहीतरी नवीन भेटलं तर वाचत असतो. आजच्या लेखात मी माझ्या वाचकांपर्यंत या केसबद्दलची सर्व प्रकारची महत्वाची माहिती पोहोचवून यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

  • घटनेची वस्तुस्तिथी 

या घटनेला आपण लंडनची परीस्थिती, जॅकच थैमान, खुनांचा परिपाकसंशयित या चार भागांमध्ये विभागून त्यांकडे पाहूयात. 

लंडनची परीस्थिती 


१८८८ या काळाला ब्रिटिशांचा सुवर्णकाळ म्हंटल जातं. सामाजिक न्याय व हक्क यांत सुधारणा होत चालल्या होत्या व व्यापाराने चांगलीच पकड घेतल्याने सगळ्यांच्याच पगारात वाढ होऊन लंडनच्या भरभराटीस सुरुवात झाली होती. पण हे फक्त उच्चभ्रू वस्ती असलेल्या व्हिक्टोरिअन भागांपुरतीच मर्यादित होतं. 

व्हाईटचॅपल हा अक्षरश: गरिबीने पछाडलेला भाग होता. या भागात गरिबांचे तीन वर्ग होते ते खालीलप्रमाणे: 

१. गरीब [गवंडी, कामगार, दुकानदार, गोदीवरील (dock) कामगार, शिंपी]

२. अतिगरीब (शिवणकाम, विणकाम आणि कपडे धुणारे लहान मूलं आणि स्त्रिया)

३. बेघर (हमेशाचं वंचित राहणारी लोकं)

१८८२ पासून लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात ज्यू, आयरिश आणि रशिअन लोकांचं स्थलांतरण चालू होत व त्यांनी लंडनच्या अतिपूर्व भागात, व्हाईटचॅपलमध्ये ठाण मांडण्यास सुरुवात केली होती. ही घटना घडली तेव्हा लंडनच्या या भागात ७८,००० लोकांचं वास्तव्य होत. इतकी गर्दी असल्याने घरं आणि कामं मिळेनाशी झाली. ज्याने गरिबी वाढली. उपासमार आणि आजार यांमुळे जीवनाचा दर्जा इतका कमी झाला की पूर्व भागात जन्माला येणाऱ्या मुलांतील ५०% मुलं पाच वर्ष वय गाठण्याअगोदरच मरू लागली. गरिबीमुळे चोऱ्या, मारामाऱ्या, मद्यपान खूपच सामान्य झालं आणि जगण्यासाठी बऱ्याच तरुणी वैश्याव्यवसायाकडे वळू लागल्या. रस्त्यांवर मानवी दुर्गंधी वाढू लागली व आजार पसरू लागले.


गरीब व निराधार लोकांसाठी लॉजिंग हाउसेस मध्ये रात्रीची सोया केली जायची.  येथे तुम्हाला कमीत कमी ८० इतर लोकांसोबत एका छोट्या वसतिगृहात तुंबलं जायचं. ४ पेन्स दिले तर तुम्हाला एक 'पलंग' दिला जायचा जो खरं सांगायचं झालं तर जमिनीवर ठेवलेल्या शवपेटीशिवाय कमी नव्हता. २ पेन्स साठी तुम्हाला एका रश्शीचा आधार दिला जायचा. हि रश्शी भिंतिच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर बांधलेली असायची.  रोज रात्री ८५०० पुरुष, स्त्रिया व लहान मुले या भिंतींमध्ये निवारा घेण्याचा प्रयत्न करत असत. 

या स्थलांतरणांमुळे व तिच्यासोबत आलेल्या गरिबी आणि उपासमारीमुळे जनसामान्यांत वर्णद्वेष, सरकारबद्दल रोष आणि ब्रिटिश राष्ट्रभाव वाढू लागला. ज्यामुळे या भागात सतत उठाव व आंदोलने होऊ लागली. गरिबी आणि व्हाईटचॅपल हे शब्द विनिमेय होऊन बसले. आणि याच भागात पुढे घडणाऱ्या घटनेमुळे ही परिस्तिथी आणखीनच तीव्र होणार होती. 

जॅकच थैमान


जॅकचा शेवटचा बळी (unsure). १८९१ मधील एका दैनिकातील चित्र. 

सूचना: जॅकच्या काळात लंडनच्या याच भागात बरेचशे खून झाले आणि बऱ्याच खुणांची पद्धत ही काहीशी साधर्म्य खाणारी होती परंतु अनेक रिपरॉलॉजिस्टनी अभ्यास करून फक्त पाच खुनांना रिपरशी जोडलं आहे. या पाच खुनांना 'कॅनोनिकल फाईव्ह' असं संबोधलं जात. आपण फक्त या पाच खुनांकडेच लक्ष देऊयात.

शुक्रवार,  ३१ ऑगस्ट, १९८८ या दिवशी चार्ल्स क्रॉस हा बक्स रो या रस्त्यावरून चालला होता. या रस्त्याच्या उत्तरी अंतावर त्याला कसलीतरी मोळी (bundle) बांधलेली दिसली. तेथेच चालत असलेल्या रॉबर्ट पॉल या दुसऱ्या इसमाने आपला क्रॉस हातात घेतला व  त्या मोळीजवळ जाऊन शवाची पाहणी केली. शव भेटल्यावर लगेचच पोलिसांना पाचारण करण्यात आले. 


मेरी ऍन निकोलस, शवगृहातील फोटो.

भेटलेलं शव होतं मेरी ऍन निकोलसचं. तीच शव भेटलं होतं पहाटे ३.४० या वेळी. तीच्या शरीराचे विकृतीकरण केलं गेलं होतं. खोलवर दोन वार करून मेरीचा गळा चिरला गेला होता. यातील एक वार इतका जबरदस्त होता की तिच्या पाठीच्या कण्यापर्यंत जखम झाली होती. तिच्या योनीला दोन वेळा भोकसले गेले होते. तिच्या उदराचा खालील भाग चिरून एक दांडगी जखम तयार झाली होती. या जखमेतून तिच्या आतड्या बाहेर निघाल्या होत्या. तिच्या उदराच्या पुढील व मागील दोन्ही बाजूस त्याच सुऱ्याने काही काप करण्यात आले होते. काप बघून हे समजत होत की ते वरून खाली या दिशेने केले गेले होते. तीचं शरीर भेटण्याच्या अर्धा तास अगोदरचं तिचा खून झाला होता असा पोलीसंच अंदाज होता. याचाच अर्थ शव भेटलं तेव्हा खुनी याच भागात फिरत होता. 

श्रीमती एमिली हॉलंडने तीच शव भेटण्याच्या एक तास अगोदर तिला व्हाईटचॅपल रोडच्या दिशेने जाताना पाहिलं होत. काही महिन्यांपूर्वी एमिलीने मेरीसोबत एका वसतिगृहात पलंगाचा एकत्रित वापर केला होता ज्यामुळे ती तिला ओळखत होती.  


ऍनी चॅपमन, शवगृहातील फोटो. 

या घटनेच्या एक आठवड्यानंतर, ८ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता २९ हॅनबरी स्ट्रीटच्या मागील बाजूस एका घराच्या पायऱ्यांवर ऍनी चॅपमन च शव सापडलं. तीचं उदर कापून पूर्णपणे उघडं केलं गेलं होत. तिच्या पोटावरील काही मांस काढून तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलं होत आणि तिचं अजून काही ठिकाणचं थोडं मांस व आतडे काढून ते तिच्या उजव्या खांद्यावर ठेवण्यात आले होते. तीचं गर्भाशय, मूत्राशय आणि योनीचा भाग शरीरातून काढून घेण्यात आला होता असे तिच्या शवविच्छेदनात कळून आले. 

पोलीस तपासात एलिझाबेथ लॉन्ग या स्त्रीने आपण ऍनीला त्याच दिवशी सकाळी ५. ३० वाजता २९ हानबुरी स्ट्रीटच्या बाहेर उभं असलेलं पाहिलं होत असं सांगितलं. ती काळ्या केसांवर डियर हॅट व काळा कोट घातलेल्या एका वरच्या वर्गातील इसमासोबत उभी होती हेही एलिझाबेथने सांगितले. त्या इसमाने ऍनीला 'तू करशील का?' असा प्रश्न विचारला व यावर ऍनीने 'हो' असं उत्तर दिल असंही आपण ऐकलं हे तिने नमूद केलं. 

ज्याप्रकारे इतक्या अचूकपणे काप करून अवयव काढले गेले होते त्यावरून खुन्याला मानवी शरीराबद्दल इत्यंभूत माहिती असावी असा दावा पोलीस शल्यविशारद डॉ. जॉर्ज फिलिप्स यांनी केला. 

याच महिन्यात २७ सप्टेंबरला सेन्ट्रल न्यूज एजन्सीला खुन्याकडून एक पत्र आलं. त्या पत्रात असं लिहिलं होत:


हे दोन पानी पत्र लाल शाहीने लिहिलं होत. या पत्रातील लिखाणात आणि व्याकरणात बऱ्याचश्या चुका होत्या. या पत्रातून लिहिणाऱ्याला पोलिसांची व तपासाची टर उडवायची होती.

''डिअर बॉस,

मला ऐकू आलं कि पोलिसांनी माझा छडा लावला आहे पण ते मला सध्यातरी पकडनार नाहीयेत. मी खूप हसलो जेव्हा त्यांनी तपास योग्य दिशेने सुरू आहे असे सांगून आपण हुशार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला. तो चामडी ऍप्रॉनचा विनोद ऐकून मला चक्कर आल्यागत झालं. मी वैश्यांचा खून करण्याचं ठरवलं आहे आणि जोपर्यंत मला पकडलं जाणार नाही तोपर्यंत मी त्यांना कापणं थांबवणार नाही. मागचं काम तर मस्तचं झाल. मी त्या बाईला इवळायचीपण मुभा दिली नाही. आता ते मला कसे पकडणार. मला माझं काम आवडत आणि पुन्हा सुरु करायचं आहे. तुम्हाला माझ्याबद्दल व माझ्या गमतीशीर खेळांबद्दल लवकरच कळेल. मागच्या कामात मिळविलेली ती लाल सामग्री मी एका बिअर बॉटलमध्ये जमवून ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून मला ती पत्र लिहायला वापरता येईल परंतु ती गोंदासारखी घट्ट होऊन गेली आहे. लाल शाहीनेच काम चालवावं लागेल असं वाटतय हा हा. पुढील कामात मी बाईचा कान कापून तो पोलिसांना गंमत म्हणून पाठवण्याचा विचार करतोय. जोपर्यंत मी थोडं काम करतोय तोपर्यंत हे पत्र असंच राहुद्यात, मग ते लगेच बाहेर पसरवा. माझा सूरा इतका मस्त असा तीक्ष्ण आहे की मला संधी मिळाली तर लगेच कामावर जावे असं वाटतं आहे. गुड लक. तुमचा विश्वासू 
जॅक द रिपर 

माझ्या उद्योगास धरून मला हे नाव द्यायला हरकत नाही. 

PS मेलं हे पत्र हातावरून सगळी लाल शाही जाईपर्यंततरी देता येणं जमलं नाही. अजूनही नाही. आता ते मी डॉक्टर आहे असं बोलतायेत. हा हा. ''

२७ सप्टेंबरला मिळालेलं हे पत्र सेंट्रल न्यूज एजन्सी ने लगेच २९ तारखेला स्कॉटलंड यार्डकडे सुपूर्त केलं.  नक्की खुन्यानेच हे पत्र पाठवलं आहे का याची खात्री नसल्यामुळे आणि तत्सम खोटी पत्रं मोठ्या प्रमाणात सगळीकडे येत असल्यामुळे १ ऑक्टोबरपर्यंत हे पत्र जाहीर केलं गेलं नाही. जेव्हा हे पत्र दैनिकात प्रकाशित झालं तेव्हा जॅक द रिपर हे नाव सगळ्यांच्याच डोक्यात बसलं व तेव्हा पासूनच त्याला जॅक द रिपर या नावाने जगभरात ओळखलं जाऊ लागलं. 


एलिझाबेथ स्ट्राईड, शवगृहातील फोटो.
 
पत्र मिळाल्याच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच ३० सप्टेंबरला बर्नर स्ट्रीट वर लोईस डेमशट्झ याला एलिझाबेथ स्ट्राईडच मृत शरीर सापडलं. वेळ होती रात्री १.०० ची. एलिझाबेथचा फक्त गळा चिरण्यात आला होता. तिच्या गळ्यावरील घाव हा सहा इंचाचा होता आणि त्याने तिची श्वसननलिका व कॅरोटिड शीर कापली गेली होती. तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची विकृती केली नसल्यामुळे तपासात संभ्रम निर्माण झाला. तो असा की, हे नक्की जॅकचच काम होत की हा खून करताना लोईस डेमशट्झ तेथे येण्याची चाहूल लागल्यामुळे जॅकने तेथून पळ काढला. तिच्या शरीराची पाहणी १. १५ ला करण्यात आली तेव्हा तिचा मृत्यू अर्ध्या तासापुर्वी झाला होता असे समजले. 
काही प्रत्यक्षदर्शींनी आपण २९ च्या संध्याकाळी व ३० च्या सुरुवातील प्रहरामध्ये स्ट्राईडला  बर्नर स्ट्रीटचा आसपास एका व्यक्तीसोबत वावरताना पाहिलं असं आपल्या जबाबात सांगितलं. परंतु प्रत्येकाने या माणसाचं वर्णन वेगवेगळं केलं आहे. कोणी हा व्यक्ती कृष्णवर्णीय होता असं सांगीतलं तर कोणी गोरा. कोणी त्याचा पेहराव श्रीमंतासारखा होता असं सांगितलं तर कोणी तो गरीब वाटत होता असं सांगितलं.

स्ट्राईडचं शव मिळाल्याच्या ४५ मिनिटांनंतर आणखीन एक शव सापडलं. हे शव बर्नर स्ट्रीटच्या पश्चिमेस असलेल्या मायटर स्क्वेयर या ठिकाणी सापडलं. या एका रात्री जॅकने दोन शिकार केले होते आणि या स्त्रीच नाव होत कॅथेरीन ऐडोवज्. 


कॅथेरीन ऐडोवज्, शवविच्छेदनापुर्वी काढलेला फोटो.

कॅथरीनचा गळा चिरलेला होता. तीचं पोट पूर्णपणे कापुन व खोलून आतमधले आतडे बाहेर पसरवले होते. काही आतडे हे तिच्या उजव्या खांद्यावर ठेवले होते. तिच्या शरीरातून उजवी किडनी आणि मूत्राशय काढून घेतले होते. तिच्या चेहऱ्याचे पूर्णपणे विद्रुपीकरण केले गेले होते. नाक तोडले होते, गाल कापून काढले होते. तिच्या डोळ्यांच्या पापण्यांवर अर्धा ते एक इंच इतके मोठे वार केले होते. तिच्या दोन्ही गालांवर डोळ्यांच्या दिशेने टोक असलेले त्रिकोण कोरले होते. तिच्या उजव्या कानाचे तुकडे करून तिच्या कपड्यांमध्ये ठेवलेलं होते. हे सगळं करायला खुन्याला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला असावा असे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी नमूद केले. 


कॅथरीनच्या शवाचं पोलिसांनी काढलेलं चित्र. 

खून होण्याच्या काही वेळापूर्वी सिगारेट विकणारा एक व्यक्ती आपल्या मित्रांसोबत याच भागातून जात होता तेव्हा त्याला गोरे केसं असलेला एक गरीब माणूस कॅथरीनसारख्या स्त्री बरोबर फिरताना दिसला होता. या सिगरेट विक्रेत्याच्या मित्रांना मात्र त्या व्यक्तीचे वर्णन करायला जमले नाही. 

कॅथरीनचा खून केल्यानंतर खुनी पुन्हा बर्नर स्ट्रीट कडे गेला व इथे त्याने जाणून बुजून एक पुरावा सोडला. या पूर्ण केस मध्ये फक्त एकच पक्का पुरावा भेटला आणि तो म्हणजे कॅथरीनच्या एप्रनचा रक्ताने माखलेला तुकडा. हा तुकडा आल्फ्रेड लॉन्ग या व्यक्तीला गोलस्टन स्ट्रीट वर सापडला. या तुकड्यावर खडूने काहीतरी लिहिले होते ते असे:

''The Juwes are The men That Will not be Blamed for nothing.'' 

याचा थोडक्यात अर्थ असा की या खुनांमागे एक किंवा अनेक ज्यू लोकांचा हात होता. या पुराव्याचे महत्व हे असे की तो कॅथरीनच्या मर्डर साईटच्या पूर्वेस, स्ट्राईडच्या मर्डर साईटच्या दिशेस सापडला होता. म्हणजेच खुन्याने जाणीवपूर्वक पोलिसांची गर्दी असलेल्या या भागातुन पुन्हा प्रवास केला होता. यावरून दोन गोष्टी आपण ग्राह्य धरू शकतो. 

१. खुनी पोलिसांना चकवा देण्यात माहीर होता. 
२. खुनी याच भागात राहत होता त्यामुळेच त्याला येथून जाणे भाग होते. 


दोन खून एकाच रात्री घडल्यामुळे ही घटना 'डबल इव्हेंट' म्हणून ओळखली जाऊ लागली परंतु हेही नाव जॅकनेच ठेवलं आहे. दोन्ही खून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ ऑक्टोबरला सकाळी पोलिस स्टेशनला एक पोस्टकार्ड पोच झालं. पोस्टकार्ड लिहीणाऱ्या व्यक्तीने तो जॅक द रिपर असल्याचा दावा केला होता व त्याचे हस्ताक्षरही जॅकशी मेळ खाणारे होते. पत्र खालीलप्रमाणे:

''डिअर बॉस, सूचना दिली तेव्हा मी काही मजाक करत नव्हतो, तुला सॉसी जॅकच्या कामाबद्दल उद्या कळेलच या वेळी डबल इव्हेंट पहिली जराशी ईव्हळली लगेच संपवता आलं नाही पोलिसांसाठी कान काढायला वेळ भेटला नाही. मागील पत्र हे काम न होईपर्यंत गुपित ठेवल्याबद्दल धन्यवाद. 
जॅक द रिपर ''

हे पत्र जॅकनेच लिहिलं आहे का हे सांगणं कठीण आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे हे खून झाल्याची माहिती अजून लोकांपर्यंत दैनिकांद्वारे पोहोचली नव्हती. आणि जर हे पत्र खरच १ ऑक्टोबरला आले असेल तर लिहिणारा हा जॅक द रिपरच होता. 

शुक्रवार ९ नोव्हेंबर १९८८ ला कॅनोनिकल फाईव्ह मध्ये गणलेला शेवटचा खून झाला. खून झालेली व्यक्ती होती मेरी जेन केली. मेरीचा १३ मिलर कोर्ट येथील तिच्या राहत्या घरातच सकाळी १०.४५ ला खून करण्यात आला होता. घरमालकाच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती जेव्हा घरभाडं मागण्यासाठी तिच्या घरी गेला तेव्हा तिचा खून झाल्याचे समजले. 


मेरी जेन केली, मेरीचा खून तिच्या बेड वरच करण्यात आला होता. 

मेरीच्या शरीराचे जबरदस्त विकृतीकरण केलं गेलं होत. तीच शरीर कापून पूर्णपणे उघड केलं गेलं होतं. तिच्या शरीरावरील जवळजवळ सगळीच कातडी सोलून काढण्यात आली होती. तिचा चेहरा वार करून इतका छिन्नविछिन्न केला गेला होता की तिची ओळख पटणे असंभव झाले होते. तिचा गळा पाठीच्या कण्यापर्यंत कापला होता. तीचं मूत्राशय, किडनी आणि एक स्तन हे कापून तिच्या डोक्याखाली ठेवण्यात आले होते. शरीरातील इतर अवयव कापून तिच्या पायाजवळ ठेवण्यात आले होते. तिच्या मांड्या कापून बेडजवळील टेबलावर ठेवल्या होत्या. तीच हृदय क्राईम सिन वरून गायब होते. कॅनोनिकल फाईव्ह मधील हा सर्वात भयानक खून होता. 

हे झाले कॅनोनिकल फाईव्ह. परंतु या खुणांच्या आधी व नंतरही बरेचशे खून होत राहिले. या खुणांची मोडस ऑपरंडी काहीशी वेगळी असल्यामुळे त्यांना रिपर लेजंड मध्ये समाविष्ट केलं जात नाही. 

कॅनोनिकल फाईव्ह मधील सगळे खून हे रात्री आणि आठवड्याच्या शेवटी झाले होते. जसे जसे खून वाढत गेले तशी तशी शरीरांच्या विकृतीची तीव्रताही वाढत गेली. 

त्याकाळात झालेल्या पोलिसी तपासात व्हाईटचॅपल मर्डररने फक्त हे पाचच खून केले असे बऱ्याच अधिकाऱ्यांनी नोंदून ठेवलं आहे. खुनी एक होता की अनेक आणि नक्की कोणी कोणता खून केला यावर त्या काळात बरीच चर्चा झाली. काही रिपरॉलॉजिस्ट अजूनही मानतात की जॅक ने ११ लोकांचा खून केला तर काही मानतात की त्याने फक्त तीन लोकांचा खून केला. आपण याबद्दल काही म्हणणे हे चुकीचेच ठरेल म्हणून त्यावर न बोललेलं बरे.

खुनांचा परिपाक

मेरी ही जॅकची शेवटची बळी होती आणि मृत्यू, अटक, आजार किंवा स्थलांतर या गोष्टींमुळे जॅकचा हाहाकार थांबला असावा असे आता मानले जाते. या सगळ्या खुणांच्या वेळी प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी जॅक द रिपरची एक प्रोफाइल तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यात असं ग्राह्य धरलं गेलं की खुनी हा २५ ते ३५ वयोवर्ष गटातील असावा. ५.५ ते ५.८ इतकी त्याची उंची असावी. त्याच्या बांधा सशक्त असावा. वर्ण गोरा असावा आणि एक लांब मिशीही त्याच्या चेहऱ्यावर असावी. तो काळा कोट आणि काळी हॅट असा पेहराव करून फिरत असावा. स्कॉटलंड यार्ड च्या एका टीमने जॅकच्या दिसण्याचे वर्णन 'मनाने संतुलित, दिसायला अगदी साधा पण सर्वात निर्दयी कामं करण्यास तत्पर माणूस' असे केले आहे. 


इकडे जॅकने केलेल्या खुनांमुळे लंडन हादरून गेलं होत. आजपर्यंत लंडन म्हणजे व्हिक्टोरिअन ड्रीम हाच सगळ्यांचा समज होता व गरिबांबद्दल, त्यांच्या खुनाबद्दल किंवा उपासमारीबद्दल कोणालाही काहीएक घेणं नव्हतं. परंतु जेव्हा हे राक्षसी खून बाहेर येऊ लागले व दैनिकांनी सतत त्यांना लावून धरल्यामुळे लंडनची ही प्रतिमा पूर्णपणे मलीन झाली. कारण एक उच्च वर्गातील बुर्ज्वा माणूस गरिबांच्या वस्तीत जाऊन वैश्यांचा खून करत होता आणि त्यातून काहीतरी लैगिक आणि शारीरिक सुख (मानसिकरीत्या) प्राप्त करत होता.  

जॅक हा काही कारण मनात ठेवून खून करत नव्हता. त्याचे कोणतेही बळी हे एकमेकांशी संबंधित नव्हते. जॅक फक्त एक विकृत आनंद प्राप्त करण्यासाठी हे सर्व करत होता. गरीब स्त्रियांचा भांडवली सत्तेत होणार असा अमानवी अत्याचार हा मुद्दा डाव्या लोकांनी सत्ता उलथवण्यासाठी वापरायला सुरुवात केली. दैनिकांतुन व जनसमान्यांतून पोलिसांच्या तपास यंत्रणेवर आणि ऐकूनच स्कॉटलंड यार्डवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ होऊ लागले. या केस च्या दबावामुळे काही मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या सोडून दिल्या. 


त्याकाळी दैनिकांत खुनांचे व हिंसेचे कव्हरेज खूप उत्कृष्ठ अशी चित्रे काढून केलं जायचं.
 
आपली प्रतिमा जपण्यासाठी व्हिक्टोरिअन पोलिसांनी या केसला आणखीनच महत्व देऊन त्यावर सगळ्या दिशांनी तपास करण्यास सुरुवात केली. या तपासादरम्यान त्यांनी सात संशयित गोळा केले त्यांबद्दल खालील भागात.

संशयित

त्यावेळी जॅक द रिपर तपासादरम्यान सात मुख्य संशयित होते. दैनिकं आणि इतर समकालीन तपासणीसांनी त्यांचे स्वतःचे वेगळे तपास करून काही इतर लोकं संशयित असल्याचे दावे केले होते. आजवर चालू असलेल्या या तपासात अनेक लोकांना संशयित म्हणून पाहिलं गेलं आहे. मी इथे फक्त त्या काळातील तपासातल्या अधिकृत सात संशयितांपैकी महत्वाच्या तीन बद्दल मी इथे बोलेल. संशयित त्यांच्या क्रमाप्रमाणे. तीनही संशयित हे सर मेल्व्हील मॅकनागटन या सुप्रसिद्ध Assistant Commissioner (Crime) यांनी मांडले होते. 

१. मोन्तेग जॉन ड्रुइट 


मोन्तेग जॉन ड्रुइट

मोन्तेग ड्रुइट एक वकील होता ज्याचे काका किंवा भाऊ हे डॉक्टर होते असं मानलं जात. डिसेंबर १९८८ मध्ये ड्रुइटच सडलेला शव थेम्स नदीमध्ये तरंगताना आढळलं. मृत्यूच्या वेळी ड्रुइट ४० वर्षाचा होता व त्याला सर्जन बनण्यात रुची होती. ड्रुइट हा पहिला खून होण्याचा एक महिना अगोदरपासून त्याच्या डॉक्टरकी करणाऱ्या भावासोबत व्हाईटचॅपल परिसरात राहत होता. ड्रुइटची आई आणि आजी या दोघीही मानसिकरीत्या असंतुलित होत्या आणि 'मीही पागल होत चाललोय' असे ड्रुइटने आपल्या एका पत्रात लिहून ठ्वल होत. पोलिसांनी त्यांच्या तपास नोंदणीत हेही लिहिलं आहे की मोन्तेग चे घरचेच त्याला व्हाईटचॅपल मर्डरर म्हणून मानत होते आणि तो लैगिकरीत्या पागल होता. शेवटच्या खुनानंतर मोन्तेग ड्रुइट गायब झाला आणि चार आठवड्यानंतर त्याचे शव नदीत सापडले. सर मेल्व्हील यांनी माध्यमांत सांगून ठेवलं होतं की त्यांना जॅक कोण आहे हे पूर्णपणे माहिती आहे परंतु इतक्या निकृष्ठ आणि अमानवी वृत्तीच्या माणसाला प्रसिद्धी नको म्हणून मी त्याची ओळख पटवणारे सर्व दावे पुरावे नष्ट केले आहेत, तो १८८८ लाच मृत पावला आहे म्हणून आता याबद्दल शोध घेण्यात काही अर्थ नाही अस मेल्व्हील बोलले होते. मेल्व्हील ज्या इसमाबद्दल बोलत होते तो मोन्तेगच होता.

२. मायकेल ऑस्ट्रॉग 


मायकेल ऑस्ट्रॉग

मायकेल ऑस्ट्रॉग हा एक रशियन डॉक्टर आणि गुन्हेगार होता. तो लोकांना काहीतरी खोटी माहिती देऊन त्यांची फसवणूक करत असे. हिंसक वृत्तीमुळे तो एकदा तुरुंगातही राहून आला होता. खून झाले तेव्हा तो कुठे होता हे तो पुराव्यानिशी तेव्हा सांगू शकला नाही परंतु त्याने खून केले हेही सिद्ध करता न आल्यामुळे तपास सुरु राहिला. काही वर्षानंतर एका वेगळ्या तपास अधिकाऱ्याने मायकेल ऑस्ट्रॉग हा खून झाले तेव्हा जेल मध्ये होता याबद्दल शोध लावला.  

३. आरोन कोस्मिन्सकी 

आरोन कोस्मिन्सकी हा एक पोलिश ज्यू होता ज्याला १८९१ मध्ये पागलखान्यात टाकण्यात आले होते. सर मेल्व्हील, सर स्वान्सन आणि सर रॉबर्ट अँडरसन या अधिकाऱ्यांच्या लिखाणांमध्ये कोस्मिन्सकीचा संशयित म्हणून उल्लेख आहे. अँडरसन यांनी लिहून ठेवलं आहे की आरोन हा ज्यू होता आणि त्याला खून करताना पाहिलेला माणुसही ज्यू होता यामुळे तो कोस्मिन्सकीच्या विरुद्ध साक्ष देत नव्हता. काही संशोधक अँडरसन याना दुजोरा देतात तर काही सर मेल्व्हील यांचं लिखाण वापरून अँडरसन यांची ही नोंदणी खोडून काढतात. कोस्मिन्सकीची बऱ्याच ब्रिटिश व अमेरिकन अधिकाऱ्यांनी प्रोफाईलींग केली आहे आणि त्यातून त्यांनी हेच सांगितलं आहे की कॉस्मीनस्कीने जर खून केले असते तर त्याने ते अभिमानाने बोलून दाखवलं असतं. कॉस्मीनस्की वेडा होता आणि त्याच्या डोक्यात बर्याचश्या उलथापालथी चालू असतं आणि त्याचं पागलखान्यातील ऐकूनच राहणं आणि वागणं हे खूपच सेल्फ प्रिझर्व्हेटरी होतं. 

२०१४ मध्ये कॅथरीन एडोवज् च्या शालीचं (showl) DNA Analysis केलं गेलं. या शालीवर कोस्मिन्सकीच्या वीर्याचे (semen) प्रमाण आढळून आले. परंतु या विषयातील तज्ञ अजूनही या पद्धतीच्या वापराबद्दल सहमत नाहीत. २०१९ मध्ये अशीच रिसर्च Journal of Forensic Sciences मध्ये प्रकाशित करण्यात अली होती परंतु अजूनही याबद्दल संभ्रम आहेत. 

  • थिअरीज 


जितके संशयित तितक्या थिअरीज!

आता इतक्या मोठ्या केस मध्ये थिअरीज सुद्धा मुबलकच असतील आणि आहेतही. या थिअरीज, थिअरीज कमी आणि कन्स्पिरसी जास्त वाटतात. इथे मी फक्त माझ्या आवडत्या तीन थिअरीज बद्दल बोलेल. 

पहिली थिअरी आहे जिल द रिपरची!
डिटेक्टिव्ह एबेरलाईन यांनी सर्वप्रथम ही थिअरी मांडली होती. एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या जबाबात सांगितलं होत की तिने मेरी जेन केलीचे कपडे घातलेली एक स्त्री तीच शव मिळण्याच्या काही वेळा अगोदर त्याच भागात फिरताना पाहिली होती.  एक सुईण (midwife) स्त्रियांचे खून करून त्यांचेच कपडे परिधान करून मोकळ्यारीतीने फिरू शकते ही बाब एबरलाईन यांच्या डोक्यात बसली. त्यांचं असं मत होतं की खुनी आपल्या हातातून सुटतोय कारण आपण फक्त पुरुषाला खुनी म्हणून शोधतोय. कदाचित हा जॅक, जॅक नसून जिल असला तर? आणि स्त्रियांचा इतक्या घृणास्पद पद्धतीने फक्त एक सुईणच (midwife) खून करू शकते. ती सुईण असल्यामुळे ती रात्री अपरात्री फिरू शकते, स्त्रियांच्या शरीराबद्दल तिला माहिती असू शकते व तिच्या कपड्यांवरील रक्ताकडे आपण तिच्या कामामुळे दुर्लक्ष सुद्धा केलं असेल. 
ही थिअरी खूप रोचक वाटते आणि तिच्यातूनच काही स्त्रियांना संशयित म्हणून मानलं गेलं परंतु पुराव्यांअभावी तीची सत्यता खूपच पुसट झाली आहे. या थिअरीला शेरलॉक होल्म्सचे जनक, सर आर्थर कॉनन डॉयल याचा पाठिंबा होता. 

दुसरी थिअरी/ कॉन्स्पिरसी थिअरी आहे प्रिन्स अल्बर्ट व्हिक्टर जॅक द रिपर असण्याची. 


प्रिन्स अल्बर्ट व्हिक्टर

ही थिअरी १९६२ ला समोर आली जेव्हा किंग एडवर्ड यांची चरित्रपुस्तिका प्रकाशित झाली. या थिअरी मध्ये असं बोललं जात की प्रिन्स अल्बर्टला लंडनच्या गरिबीने भरलेल्या गल्ल्यांमद्ध्ये फिरायची आवड होती व तो तिकडे जाऊन वैश्यांशी शारीरिक संबंध ठेवत असे. यातीलच एका वैश्येमुळे त्याला सिफिलिस या STD रोगाची लागण झाली ज्याने तो पिसाटला व वैश्यांचे खून करू लागला. त्याला पकडले गेले नाही कारण तो राजा होता व हा विषय शासनाने जाणीवपूर्वक दाबून ठेवला. आता यात किती सत्यता आहे आणि किती नाही हे न बोललेलंच बरं पण ऐकायला ही थिअरी मजेशीर आहे.

माझी तिसरी आवडती आणि सर्वात तार्किक थिअरी आहे ती जोसेफ बार्नेट हा इसम जॅक असल्याची. 


जोसेफ बार्नेट

जोसेफ बार्नेट हा एक मच्छिमार होता व एप्रिल १८८७ ते ऑक्टोबर १८८८ यादरम्यान तो मेरी जेन केलीचा प्रियकर राहिला होता. त्याचे व मेरीचे सारखं भांडण होत असत व त्याला मेरीच्या वैश्याव्यवसायाचा राग येत असे. तिला या धंद्यातून बाहेर काढण्यासाठी व तिच्या मनात या व्यवसायाबद्दल भीती निर्माण करण्यासाठी जोसेफ ने पहिले चार खून केले असं म्हंटल जात. मेरी हे खून झालेले पाहून घाबरलीही होती व तिने रात्री रस्त्यांवर ग्राहक शोधणे बंदही केलं होतं. परंतु जोसेफचा मच्छिमारीचा व्यवसाय ठप्प झाल्याने मेरीने पुन्हा शरीरविक्री सुरु केली. यामुळे त्यांत पुन्हा भांडण झालं व जोसेफ घर सोडून निघून गेला. याच्या दहा दिवसांनंतर मेरी चा खून झाला. 

आता या थिअरी मध्ये खुनाचं कारण आहे, जोसेफ मच्छिमारी करत असल्यामुळे त्याला हिंसा ही काही नवी नव्हती आणि मेरीच्या इमारतीबद्दल त्याला पूर्ण माहितीदेखील होती ज्यामुळे तो घरात घुसून तिला इतक्या क्रूरपणे मारू शकला. या थिअरी मध्ये काही व्हेरिएशन आहेत परंतु ही सर्वात विश्वसनीय थिअरी आहे. पण प्रत्येकाला वेगवेगळी थिअरी विश्वसनीय वाटते आणि त्याचमुळे अजूनही आपण एका विशिष्ट व्यक्तीला जॅक म्हणून पिनपॉईंट करू शकलेलो नाहीत. 

बोनस थिअरी!
असंही मानलं जात की जॅक द रिपर ची ओळख कधीच पटली आहे परंतु जॅकच्या लेजंड मुळे व्हाईटचॅपलला खूप महत्व प्राप्त झालं आहे. दर वर्षी वेगवेगळ्या तपास करणाऱ्या लोकांकडून आणि पर्यटकांकडून बक्कळ पैसे येथील संस्थांना आणि येथे काम करणाऱ्या कामगारांना मिळतात. ऐकूनच जॅक हा लोकांच्या रोजगाराचाही विषय बनला आहे. आणि हे सगळं टिकवून ठेवण्यासाठीच त्याची ओळख लपवून हे रहस्य कायम ठेवलं जात आहे.  

माझे मत 

जॅक द रिपरचा समाजावर पडलेला प्रभाव व त्यातून भांडवली व्यवस्थेचा लावलेला अर्थ हा मला खूप महत्वपूर्ण वाटतो. माणसांमध्ये इतकी विकृती का, कशी आणि कुठून येऊ शकते हे प्रश्न विचारायला आपल्याला जॅक भाग पाडतो. स्त्रियांच्या शरीराबद्दलची असलेली एका प्रकारची वासना जी काही कारणांमुळे पूर्ण होत नसेल किंवा भांडवली अर्थव्यवस्थेतील इतर काही अडथळ्यांमुळे ह्या प्रकारची मानसिकता उद्भवली असेल असे मला वाटते. ज्या प्रकारे पहिल्या बळीच्या योनीवर वार केले होते त्यावरून हे दिसून येते. हा खुनी कदाचित आई न बनता येणारी स्त्री किंवा तिचा पतीही असू शकतो आणि झालंच तर एखादा समलैगिक व्यक्तीही असू शकतो. या केसमध्ये खुनी खून का करतो हा प्रश्नच सर्वात महत्वाचा आहे आणि त्यावर विचार करूनच आपण समाजात अशे जॅक बनण्यापासून थांबवू शकतो. हे शरीराचं विकृतीकरण काही गरिबीतून येतं अस नाही याउलट ते उच्च वर्गातच जास्त आहे हे आपण उच्च वर्गातील स्त्री पुरुषांनी इंटरनेटवर लिहिलेल्या त्यांच्या BDSM fantasies वरून बोलू शकतो. 

जॅक द रिपर च रहस्य कधी उघड होईल असे मलातरी वाटत नाही. आणि जरी ते उघडं झालं तरीही आतापर्यंत जमा केलेल्या पन्नासेक संशयितांपैकी तो कोणीही नसेल. आजवर कधीही उल्लेख न झालेली व्यक्तीच रिपर असेल हे माझे मत.

त्याच रहस्य रहस्य राहिलेलेच चांगलं आहे कारण मला Alan Moore च्या From Hell कॉमिक मधला सैतानी जॅक खरा वाटतो. मला Assassins Creed Syndicate या गेम मधला जॅक मिस्टिकल वाटतो. मला जॉनी डेप च्या From Hell चित्रपटातील जॅकही खूप आवडतो. जॅक सारख्या रहस्यांमुळेच आपल्याला शेरलॉक होल्म्स सारखे काल्पनिक पात्र खरोखर लंडन च्या रस्त्यांवर फिरले असावेत असे वाटते. जर जॅक ची ओळख पटली असती तर एवढ्या कलाकारांनी आणि लेखकांनी जॅकला आपआपल्या पद्धतीने दिलेली विशिष्ट ओळख आपल्याला कधीच इतकी भावली नसती.

जॅक हा लंडन चा पॉप कल्चर आयकॉन आहे आणि त्याच्या ओळखीबद्दल असलेल्या रहस्यामुळेच त्याला इतके महत्व आहे. ते तसेच राहो हीच माझी इच्छा!

जॅक द रिपर बद्दल अजून जाणून घेण्यासाठी:

मला कमी शब्दांत पूर्ण केस समजवायचा असल्यामुळे काही पत्रं आणि घटना मी येथे घेतल्या नाहीत. या केसबद्दल प्रत्येक प्रकारची छोटी मोठी बाब, कागदपत्रे, फोटो आणि रिसर्च पेपर, दैनिकांतील बातम्या आणि लेख आणि अजून बरच काही माहितीसाठी खालील वेबसाईट्सना भेट द्या. 

Casebook: Jack the Ripper
इंटरनेटवर असलेली सगळ्यात मोठी आणि सर्वसमावेशक अशी जॅक रिपॉझिटरी. येथील संपूर्ण माहिती वाचता वाचता एक वर्ष निघून जाईल. ही वेबसाईट असेल तर इतर साईट्सची गरजही भासत नाही. 

Jack the Ripper Tour
येथे तुम्हाला जॅक द रिपर व त्याच्याशी संबंधित सध्याच्या घडामोडींबद्दल काही माहिती भेटेल. यांच्या ब्लॉग वर जॅक संबंधी वेगवेगळे लेख प्रकाशित होत असतात. या वेबसाईट वरून तुम्हाला जॅक द रिपर या विषयाभोवती फिरणाऱ्या पर्यटन व्यवसायाबद्दल खोलवर माहिती मिळेल फक्त साईट पडताळताना त्या दिशेने विचार करा. 

इतर काही साईट्स



माझे लेख आवडत असतील व पुढील लेखांसाठी मला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर माझ्या ऍमेझॉन अफिलिएट लिंक्स वरून शॉपिंग करा. 

ऍमेझॉन अफिलिएट लिंक

अजून रहस्य लेखांसाठी वेबसाईटला भेट देत रहा. तुम्हाला कोणत्या रहस्याबद्दल लेख हवा असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये तसं कळवा. 

तोपर्यंत माझ्या YouTube Channel ला भेट देऊन वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल जाणून घ्या!


Comments

Popular Posts

कोसला समीक्षा अणि विश्लेषण || Kosla Book Review & Analysis

Why you need to watch Asur? || Asur Webseries Review

दयातलोव पास चे रहस्य || Dyatlov Pass Incident in Marathi