बेटी आणि बार्नी हिल यांचे रहस्य || Betty and Barney Hill Incident in Marathi

 बेटी आणि बार्नी हिल यांचे रहस्य


सूचना: सदर लेख हा स्टिव्ह मॅकग्रेगर यांच्या लेखाचा अनुवाद आहे. 
याच्या वापराचे व छपाईचे सर्व अधिकार स्टिव्ह मॅकग्रेगर आणि अमित भालेराव ह्यांचे आहेत. इतर कुठेही ह्याचा वापर अथवा छपाई आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

  • प्रस्तावना

परग्रहींनी केलेलं अपहरण हा विषय इतर रहस्यमयी विषयांपासून खूपच वेगळा पडतो. ह्यात खूप मतमतांतरं असल्यामुळे लोकं हे विभागले जातात. या विषयात एका बाजूला आहेत संशयवादी व पोलखोल करणारी मंडळी जी परग्रही या विचारानेच इतके उपहासात्मक होतात की त्यांना हसण्यापलीकडे काही सुचत नाही. त्यात जर परग्रहींकडून अपहरण ह्या विषयाबद्दल बोलणं चालू झालं की ही लोकं अनुभव सांगणाऱ्या लोकांना tin foil hats व rectal probe ह्या उपहासात्मक गोष्टींचा आधार घेऊन हिणवलं जात. ह्यांच्या विरुद्ध विचारसरणी असलेली लोकं आहेत जे आंधळेपणाने एलिएन्स आणि एलिएन्स कडून अपहरण ह्यावर विश्वास ठेवतात आणि सरकार मुद्दामहून ह्या गोष्टी लपवून ठेवते आहे असा विचार बाळगतात. या दोघांसोबतच एलिएन्स ने अपहरण केल्याच्या अनुभवामुळे आपल्या आयुष्याचा सत्यानाश झाला आहे असा विचार करणारा वर्ग सुद्धा थोड्या फार प्रमाणात अस्तित्वात आहे. इतका व्यापक विषय असल्या कारणाने ह्या विषयावर वस्तुनिष्ठ चर्चा होण्याची शक्यता फार कमी आहे. पण आपले इतरही लेख वस्तुनिष्ठ प्रकारे लिहिलेले असतात तर आता ह्या विषयावर सुद्धा काही तार्किक लिहिण्याचा प्रयत्न करू. आपल्या ह्या विषयाबद्दलच्या सगळ्या पूर्वकल्पना थोड्या वेळासाठी बाजूला ठेवुयात आणि ह्या केस ला पूर्णपणे पुराव्यांच्या आधारावर पडताळून पाहूयात. 

१९६१ मध्ये बेटी (Betty Hill) आणि बार्नी (Barney Hill) यांचं परग्रहींनी UFO तुन (कदाचित) केलेलं अपहरण हे काही पहिलं वहिलं नव्हतं. याअगोदरही इतर लोकांनी स्वतःच्या इच्छेने किंवा जबरदस्तीने झालेल्या UFO अपहरणांबद्दल दावे केले होते. पण तरीही अमेरिकेत आणि ऐकूनच UFO अभ्यासामध्ये हिल दाम्पत्याचे अपहरण खूप गाजलं आहे. ह्या अपहरणाला खूप प्रसिद्धी लाभली व नंतर घडलेल्या अपहरण कथांत ह्या केसशी समानता दिसून आली आहे. ह्या घटनेवर बरंच काही लिहिलं गेलं आहे, विश्वासू बाजूनेही आणि संशयी बाजूनेही. आज ह्या घटनेला घडून पन्नासहुन अधिक वर्ष झालीत तरीही तिला अभ्यासताना काही ना काहीतरी नवीन असं दर वेळेस मिळत राहत. 

अनुवादकाकडून सूचना: 
बरेच शब्द मराठी मध्ये अनुवादन करता येत नाहीत त्यामुळे ते इंग्रजीतच वापरण्यात आले आहेत. 

  • वस्तुस्तिथी 

ह्या केसला मी तीन भागांत विभागून तिच्याबद्दल बोलणार आहे. 

पहिल्या भागात हिल दाम्पत्याने त्यांच्या अनुभवानंतर जी काही लिखित माहिती व नोंदणी करून ठेवल्या आहेत त्यांबद्दल आपण माहिती घेऊयात. ह्या घटनेशी संबंधित बरीचशी पुस्तकं आणि लेख हे एकाच गोष्टीला धरून लिहिली आहेत, ती अशी की हिल दाम्पत्याला, विशेषतः बार्नीला, त्यांनी संमोहन उपचार सुरु केला नव्हता तोपर्यंत १९/२० सप्टेंबरला काय घडले याबद्दल खूप कमी आठवू येत होत. काही ठिकाणी असं लिहिलंय की बार्नीला काहीच आठवत नव्हतं आणि बेटी त्याला काय बोलावं याबद्दल सांगत होती. परंतु हे सत्य नाही कारण घटना घडल्यानंतरच्या पुढील काही क्षणांत जे काही दिसलं त्याबद्दल बार्नी ने तपशीलवार वर्णन करून ठेवलेलं आहे. ते आपल्याला पुढे कळेलच. 

बेटी आणि बार्नी हिल केस मध्ये मिळालेली काही माहिती ही त्यांच्या संमोहन सत्रांमधून समोर आली आहे. ही संमोहन सत्रे मूळ घटना घडल्याच्या दोन ते तीन वर्षांनंतर केली गेलेली. संमोहन पद्धतीला मानसोपचारात महत्व द्यायचं की नाही याबद्दल अजूनही संभ्रम आहे कारण संमोहन पद्धतीने खरोखरच्या दडलेल्या स्मृती बाहेर येतात की फक्त खरी वाटणारी स्वप्ने आणि काही काल्पनिक विचार बाहेर येतात याबद्दल साशंकता आहे. ह्या संभ्रमामुळे सम्मोहन सत्रांदरम्यानच्या कालावधीचा दुसऱ्या भागात आढावा घेतला आहे. 

बेटी आणि बार्नी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर UFO सेलिब्रिटी बनल्यानंतरच्या काळाचा आढावा तिसऱ्या भागात घेतला आहे. 

भाग १: अनुभव 

१२ मे १९६० साली बेटी आणि बार्नी यांच्या संसाराला सुरुवात झाली. ह्या दोघांचं प्रेम प्रकरण हे लग्नाच्या ५ वर्ष पूर्वीपासून सुरु होते आणि लग्न झालं तेव्हा बेटी ४१ तर बार्नी हा ३८ वर्षांचा होता. दोघांचेही आधी दुसऱ्या व्यक्तींबरोबर लग्न झालं होतं पण हे लग्न खूप वेगळं आणि धक्कादायी ठरलं. असं का? कारण हि घटना १९६० च्या सुरुवातीच्या काळातील आहे आणि या काळात काळे आणि गोरे हा वर्णद्वेष अजूनही लोकांच्या मनात रुजून होता. बेटी ही एक गोरी युरोपिअन स्त्री होती तर बार्नी हा काळ्या वर्णाचा आफ्रिकन अमेरिकन होता. हे दोघेही नागरी अधिकार चळवळीत सक्रिय होते आणि दोघेही National Association for the Advancement of Coloured People (NAACP) चे सदस्य होते. 

लग्ना नंतरच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये त्यांना एकमेकांचा इतका सहवास लाभला नाही. बेटी ही New Hampshire Division of Welfare मध्ये एक समाजसेवक म्हणून कार्यरत होती त्यामुळे तिचं वास्तव्य हे न्यू हॅम्पशायरच्या पोर्ट्समाऊथ मध्येच असे. बार्नी US Post Office मध्ये टपाल वाहकाच काम करायचा ज्यासाठी तो पेन्सिलवानियाच्या फिलाडेल्फिया मध्येच राहत असे.  लग्नाच्या पहिल्या दहा महिन्यांत ते वेगळे राहिले पण १९६१ च्या मार्च मध्ये बार्नीला बोस्टनला बदली करण्याची संधी आली. आता ही बदली काही सोपी नव्हती कारण यामुळे बार्नीला दर दिवशी रात्रपाळी करून १२० मैलांचा लांबचा असा गोलाकार प्रवास करावा लागणार होता. असे असूनही त्याने १७ मार्च पासून बेटी बरोबर पोर्ट्समाऊथ मध्ये राहणे सुरु केले. 


बेटी आणि बार्नी हिल

बेटी आणि बार्नी दोघेही खूप खुश होते. बार्नी रात्रपाळी आणि मोठ्या प्रवासामुळे थकलेला असायचा पण कमीत कमी आता ते एकत्रतरी राहत होते. बेटी ला १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर अशी एक आठवडी रजा मिळणार होती. त्यामुळे बार्नीनेसुद्धा काही दिवसांसाठी एक छोटी सुट्टी घेऊन इतर प्रेमी युगलांसारखा एकत्र वेळ व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. ही त्यांच्या लग्नानंतरची पहिली वहिली सुट्टी होती जी ते एकत्र घालवणार होते आणि यामुळेच कि काय बार्नी मजेमध्ये ह्या दिवसाला त्यांचा 'मधुचंद्राचा दिवस' असं संबोधत होता. त्यांनी नायगारा फॉल्स, टोरोंटो आणि मॉण्टरिअल असा प्रवास करण्याचा बेत आखला व १७ तारखेच्या सकाळी बेटीच्या १९५७ शेवर्ले कार ने ते तिकडे मार्गस्थ झाले. पहिले त्यांनी वरमॉण्ट ते नायगारा फॉल्स व त्यांनतर टोरोंटो ते थाऊजंड आयल्स असा टप्पा पार पाडला. १८ सप्टेंबरच्या रात्री मॉण्टरिअल च्या शंभर एक मैल उत्तरेस असलेल्या एका मोटेल मध्ये रात्र घालवली व १९ च्या सकाळी ते येथून शहराकडे निघाले. १९ ची सकाळ व संध्याकाळ त्यांनी मॉण्टरिअल मध्येच घालवली आणि रात्रही येथेच काढण्याचा त्यांचा बेत होता. परंतु संध्याकाळी प्रवास करताना बार्नी फ्रेंच भाषेतील रोड साइन्स बघून गोंधळला आणि दोघेही शहराच्या पूर्वेकडील टोकावर पोहोचले. इथे प्रवाश्यांचं सामान घेईल असं एखादं मोटेल शोधायला त्यांना अपयश आलं आणि फिरताना त्यांनी न्यू हॅम्पशायर ला येणाऱ्या वादळाची सूचना ऐकली होती त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर पोर्ट्समाऊथला जाण्याचं ठरवलं. 

त्यांचा मॉण्टरिअल ते पोर्ट्समाऊथ रस्ता त्यांना पहिले पूर्वेस, शेरब्रुकमधुन, त्यानंतर US बॉर्डरवरून न्यू हॅम्पशायर येथे व येथून US रूट ३ असा नेणार होता. येथून ते लँकेस्टर, लिंकन,  व्हाईट माऊंटन आणि प्लायमाऊथ असा प्रवास करून काँकॉर्डला पोहोचणार होते. काँकॉर्ड येथून पुन्हा एकदा पूर्वेस वळून शेवटी ते पोर्ट्समाऊथ ला पोहोचणार होते. हा पूर्ण प्रवास जवळ जवळ ३५० मैलांचा होता. बार्नी ने सांगितलं की तो थकलेला नव्हता त्यामुळे त्यांनी प्रवास सुरु केला. त्यांनी हेही ठरवलं कि जर त्यांना थकवा आला तर ते व्हाईट माउंटनच्याच कोणत्यातरी भागात थांबून रात्र घालवतील. त्यांनी संध्याकाळी मॉण्टरिअल मधून प्रवास सुरु केला तेव्हा हवामान ठीक होत. अंदाज वर्तवल्याच्या दोन दिवसांनंतर वादळ न्यू हॅम्पशायरला पोहोचलं. 

घरी जाण्याच्या प्रवासात मध्यरात्री पर्यंत तरी वेगळं असं काही घडलं नाही. परंतु पोर्ट्समाऊथ पासून १५० मैल दूर,  रूट ३ वर लिंकनच्या दक्षिणेस असताना त्यांना एक चमकणारी वस्तू बराच वेळ आकाशात उडत असलेली दिसली. ही वस्तू अनिश्चितपणे हवेत इकडे तिकडे जागा बदलत होती. त्यानंतर जेव्हा ते इंडियन हेड (एक नेटिव्ह अमेरिकन भासणारा नैसर्गिकरित्या तयार झालेला मोठा दगड) च्या एका वळणावर आले तेव्हा ही वस्तू त्यांना आणखीन जवळून दिसू लागली. ते पोर्ट्समाऊथला ०५:०० वाजता पोहोचले. बार्नीच्या म्हणण्यानुसार त्यांचा गरजेपेक्षा जास्त वेळ या प्रवासात गेला होता. त्याला वाटले होते की ०३:०० वाजेपर्यंत तरी ते पोर्ट्समाऊथला पोहोचतील.

आपण एखादं परग्रही विमान बघितलं यावर बेटीचा पूर्णतः विश्वास बसला होता आणि दुसऱ्या दिवशी तिने याबद्दल तिच्या परिवारासोबत चर्चा केली. यात तिची बहीण जानेट इचाही समावेश होता (जानेटनेसुद्धा १९५७ साली एक UFO बघितली असल्याचा दावा केला आहे). बार्नीनेसुद्धा त्याच्या मित्रपरिवारासोबत या UFO दर्शनाबद्दल चर्चा केली. 

२१ सप्टेंबर ला बेटी ने न्यूइंगटन येथील पिस एअर फोर्स बेस (Peace Air Force Base) च्या १००th बॉम्ब विंग ला फोन केला व आपल्या UFO दर्शनाची नोंदणी केली. बेटी आणि बार्नी दोघांनीही त्यांच्या मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यास त्यांनी पाहिलेल्या उडणाऱ्या वस्तूची साधारण माहिती पुरवली. नंतर त्याच दिवशी, मेजर पॉल हेंडरसन यांनी हिल दाम्पत्याला फोन केला व दोघांचीही विस्तारपुर्ण अशी मुलाखत घेतली. दुसऱ्या दिवशीही हेंडरसन यांनी पुन्हा फोन करून हिल दाम्पत्याची अधिक विचारपूस केली. १९६१ साली US एअर फोर्स प्रोजेक्ट ब्लू बुक (Project Blue Book) च्या अंतर्गत अशा प्रकारच्या UFO दर्शनांच्या नोंदण्या करत होती. हिल दाम्पत्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे स्टँडिंग इंस्ट्रकशन्स ना धरून हॅन्डरसन यांनी एक एअर इंटेलिजन्स रिपोर्ट तयार केली. ही रिपोर्ट त्यांनी UFO रिपोर्ट गोळा करून अभ्यासणाऱ्या १०६६ एअर इंटेलिजन्स सर्विस स्क्वाड्रन कडे सुपूर्त केली. त्या रिपोर्ट मध्ये खालील मजकूर नोंदला होता: 

" १९-२० सप्टेंबर च्या रात्री २०/०००१ आणि २०/०१०० दरम्यान निरीक्षक (observers) कार मधून रूट ३ दाक्षिणात्य मार्गावर, लिंकन, न्यू हॅम्पशायर च्या दक्षिणेस  प्रवास करत होते जेव्हा त्यांना त्यांच्या गाडीच्या समोर, जवळ जवळ ४५° कोनावर, एक तेजस्वी प्रकाशित वस्तू दिसली. ही वस्तू त्यांना तिच्या आकार आणि तीव्र प्रकाशामुळे आकाशातील ताऱ्यांपेक्षा वेगळी वाटली. हवामान आणि आकाश दोन्ही स्पष्ट होते. ह्या हालणाऱ्या वस्तूला ते त्यांच्या धावत्या गाडीतून काही मिनिटांसाठी पाहत राहिले व त्यानंतर त्यांनी गाडी थांबवली. गाडी थांबवल्यावर त्यांनी दुर्बिणीतून अधून मधून ह्या वस्तूची पाहणी केली. 

ही वस्तू वेगाने उत्तरेच्या दिशेस प्रवास करत होती असं त्यांनी सांगितलं. अचानक तिने दिशा बदलून दक्षिणेस मार्गक्रमण सुरु केलं असं त्यांनी सांगितलं. यानंतर ती हवेतच थांबली. या क्षणाला दोन्ही निरीक्षकांनी तिला दुर्बिणीतून पाहण्यास सुरुवात केली. आकाशात थांबली असताना तिच्यावरील काही गोष्टी दिसू लागल्या. या गोष्टी पंखांसारख्या होत्या आणि पसरल्यावर त्या V आकार करायच्या असं त्यांनी सांगितलं. या पंखांच्या टोकावरील भागात लाल रंगाचे दिवे होते हेही त्यांनी सांगितलं. ह्यानंतर ती वस्तू हळू हळू आकाशातून खाली येत त्यांच्या दिशेला येत होती. कार आणि वस्तूमधील अंतर हे काही 'शेकडो फूट' होईपर्यंत ही वस्तू कारच्या वरील बाजूस खाली येतच राहिली. 

या क्षणाला त्यांनी ह्या जागेपासून लवकरात लवकर लांब जाण्याचा निर्णय घेतला. श्रीमान हिल गाडी चालवत होते व श्रीमती हिल ह्या खिडकीतून डोकं बाहेर काढून वस्तूचा आढावा घेत होत्या. ह्या वस्तूने आता उत्तरी पूर्व दिशेस जाण्यास सुरुवात केली परंतु गाडीत असल्यामुळे श्रीमती हिल ना तिचा पूर्ण प्रवास पाहता आला नाही. 

त्यांनी असं नोंदवलं की वस्तू त्यांच्या वर उडत असताना जेव्हा ती त्यांच्या दिशेने आली तेव्हा त्यांनी खूप सारे छोटे पण जोरदार असे घोंघावणारे आवाज ऐकले. ह्या आवाजा बद्दल सांगताना त्यांनी सांगितलं की द्विशूल स्वरित्र (tuning fork) पडल्याच्या आवाजासारखा तो आवाज होता. हा आवाज त्यांना कारमध्येही जाणवत होता असे ते म्हणाले. ही वस्तू पुन्हा त्यांच्या दृष्टीस आली नाही. लिंकन पासून ३० मैल, ऍशलॅन्ड परिसरात पोहोचल्यावर त्यांना त्या वस्तूचा घोंघावणारा आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला. परंतु यावेळी त्यांना ती वस्तू दिसू आली नाही. 

श्रीमती हिल यांनी या 'वस्तूचा' उड्डाण प्रकार अनियमित होता आणि ती पटापट दिशा बदलत होती असे सांगितले. हवेत उडताना तिने बऱ्याच वेळा ती वर आणि खाली अशी झेप घेत राहिल्याचेही त्यांनी सांगितले. ती सुलभरितीने  न उडता हिसके घेत उडत होती असे वर्णन त्यांनी केलं आहे. 
 
श्रीमान हिल हे बोस्टन पोस्ट ऑफिसात नागरी सेवा अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे किंवा त्यांच्या पत्नीकडे कोणत्याही प्रकारच्या शास्त्रीय किंवा वैज्ञानिक प्रशिक्षणाचा अनुभव नाही. 

नंतर झालेल्या संवादात श्रीमान हिल यांनी सांगितलं की या घटनेची नोंद करण्यास ते पत्नीइतके उत्साही नव्हते. परंतु घटना खरोखर घडली व त्यामुळे तीची नोंद व्हावी म्हणून त्यांनी स्वतः यात सहभाग घेतला. त्यांनी पुढे असं म्हंटलं की आता ह्या घटनेकडे पाहताना ती जितकी विलक्षण वाटते तितकीच हास्यास्पदही वाटते. त्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये की असं काही होऊ शकत, घडू शकत. पण त्याचबरोबर ते असेही म्हणतात कि त्यांनी दोघांनीही ही घटना अनुभवली  आहे, असे असल्यामुळे ती खरी असण्याची शक्यता वाढते.  

इथे उपलब्ध असलेली माहिती ही निरीक्षक आणि रिपोर्ट अधिकारी यांच्या टेलिफोन संभाषणातून मिळाली आहे. निरीक्षकाची विश्वासार्यता या क्षणीतरी पारखता येणार नाही. निरीक्षकाच्या बोलण्यात गहणता आणि  प्रामाणिकपणा जरी असला तरीही ती या क्षणी पारखता येणार नाही. "

मेजर हेंडरसन यांनी या रिपोर्टलाच जोडून एक चिठ्ठी पाठवली. ह्या चिठ्ठीत २० सेप्टेंबरला रात्री ०२.०० वाजता पीएस एअर फोर्स बेसच्या रडार वर दिसलेल्या एका अनोख्या गोष्टीबद्दल लिहिले होते. चिठ्ठीतील मजकूर खालीलप्रमाणे: 

"२२ सप्टेंबर ६१ ला मेजर गार्डिनर द. रेनॉल्ड्स, 100th BW DCOI आणि कॅप्टन रॉबर्ट ओ. डोघादे, Commander 1917-2 AACS DIT, Pease AFB, NH यांच्या संभाषणातून असं समजलं की २० सप्टेंबरला या बेसच्या भागात ०२१४ वाजता काही तरी वेगळं घडलं होतं. त्यावेळी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं. विचारपूस करून ह्याबद्दल अधिक माहिती काढून घेणाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे 'दैनंदिन कंट्रोलर नोंदणीत' जितकी माहिती आहे तितकीच प्राप्त झाली आहे.

ह्या दोन घटनांना एकत्र जोडने शक्य नाही कारण रडार वर वस्तुंचे वर्णन होत नाही. दोन्ही घटना घडल्याची वेळ आणि अंतर या प्रसंगांत संबंध जोडू शकतात. ''

दैनंदिन कंट्रोलर अहवालाचा काही भागही मेजर हेंडरसन यांच्या रिपोर्टला जोडलेला होता. त्यातील काही मजकूर असा: 

''PAR पासून ४ मैल अंतरावर अज्ञात यानाचे  निरीक्षण झाले. अज्ञात यानाने बेसकडे धाव घेतली आणि अर्ध्या मैलावर पुन्हा वर गेले. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा  वाहत्या वाऱ्याच्या  दिशेने  यानाच थोडंस दर्शन झालं आणि  रडार शी त्याचा संपर्क तुटला. यान खाली येत असताना TWR (एअर ट्राफिक कंन्ट्रोल  टॉवर) ला सूचना दिली. TWR ला यावेळी कोणत्याही प्रकारचं यान दिसलं नाही.''


दैनंदिन कंट्रोलर रिपोर्ट मधील काही भाग, Pease AFB. २० सप्टेंबर १९६१. मेजर हेंडरसन यांच्या एअर इंटेलिजन्स इन्फॉरमेशन रिपोर्ट ला जोडलेला अहवालाचा काही भाग. 
'PAR' चा अर्थ Precision Approach Radar.  

२३ सप्टेंबरला बेटीने पोर्ट्समाऊथ पब्लिक लायब्ररीतुन  मेजर डोनाल्ड एडवर्ड किहो यांनी लिहिलेलं The Flying Saucer Conspiracy हे पुस्तक घरी आणलं. मेजर डोनाल्ड यांनी UFOs बद्दल काही पुस्तकं व लेख लिहिले होते आणि ते National Investigations Committee on Ariel Phenomena (NICAP) चे संचालकही होते. NICAP ही UFO रिपोर्ट्स चा तपास आणि मूल्यमापन करणारी स्वतंत्र समिती होती.  २६ सप्टेंबरला बेटी ने किहो यांना एक पत्र पाठवले ज्यात तिने १९/२० सप्टेंबरला दोघांना आलेल्या अनुभवाबद्दल माहिती दिली होती. ते पत्र खालीलप्रमाणे:

NICAP: http://www.nicap.org/

''आम्ही अनुभवलेल्या भयानक घटनेनंतर मी व माझे पती, दोघांच्याही मनात ह्या विषयाबद्दल तीव्र कुतूहल निर्माण झालं आहे. आमचा अनुभव इतर लोकांच्या अनुभवापेक्षा वेगळा आहे असं मला वाटते. २० सप्टेंबरच्या मध्यरात्री आम्ही  व्हाईट माउंटनच्या राष्ट्रीय वन विभागातून  प्रवास करत होतो. माणसाचा मागमूस नसलेला, पूर्णपणे निर्जन असा हा भाग आहे. सर्वात पहिले तर आम्ही आकाशात एक  तेजस्वी वस्तू वेगाने उडताना पाहिली. आम्ही आमच्या गाडीतून उतरून तिला दुर्बिणीने पाहण्याचा प्रयत्न केला. अचानक तिने उडण्याची दिशा बदलली व उत्तरेकडून दक्षिण पूर्वेस प्रयाण केले. ही वस्तू  हिसके खात अनियमितपणे उडत होती असे भासले. तिच्या उड्डाणाचा प्रकार  आम्हाला खालीलप्रमाणे दिसला : 


ही वस्तू गोल फिरत होती आणि तिची एकच बाजू प्रकाशित असल्यामुळे ती लुकलुकल्यासारखी भासत होती. 

ती आमच्या गाडीजवळ आल्यावर आम्ही पुन्हा थांबलो.  ती आमच्यासमोर आकाशात थांबून राहिली होती तेव्हा ती पॅनकेकच्या आकारात दिसत होती. तिच्यावर खिडक्यांची वर्तुळाकार रांग होती. या खिडक्यांतून आम्ही तेजोमयी निळा पांढरा प्रकाश पाहू शकत होतो. अचानक तिच्या दोन बाजुंना लाल प्रकाश दिसायला लागला. या क्षणी माझे पती रस्त्यात उभे राहून निरीक्षण करत होते. येथे त्यांनी वस्तूच्या दोन्ही बाजूंतून एक एक पंख बाहेर निघताना पहिला. ते लाल दिवे या पंखांच्या टोकावर गेले होते.  

जशी ही वस्तू अजून जवळ आली तस माझ्या पतींना ह्या वस्तूच्या आतलं दिसू लागलं. त्यांना आतमध्ये काही आकृत्या कसली तरी तयारी करताना गोंधळ घालत असलेल्या दिसल्या. ह्यातील एक आकृती आम्हाला खिडकीतून पाहत होती. ज्या अंतरावरून आम्ही हे पाहिलं त्या अंतरावरून ह्या आकृत्या पेन्सिल इतक्या दिसत होत्या आणि त्यांनी चमकणारे काळ्या रंगाचे कपडे घातलेले असं वाटत होत. 

या टप्प्यावर माझ्या पतींना धक्का बसला आणि ते पुन्हा गाडीत येऊन बसले. माझे पती उन्मादात हसत होते आणि बोलत होते की ह्या आकृत्या आता आपल्याला पकडणार आहेत. गाडीचं इंजिन चालूच होत आणि त्यांनी लगेच गाडी तेथून काढली. जशी जशी आमची गाडी पुढे जाऊ लागली तसे तसे आम्हाला काही घोंघावणारे आणि बीप बीप असे  आवाज येऊ लागले. हे आवाज आमच्या गाडीच्या डिकीवर आदळत होते असं वाटत होत. 

सध्यातरी आम्ही अशा माहितीच्या शोधात आहोत जेणेकरून माझ्या पतींना आठवेल की त्यांनी त्या यानाच्या आतमध्ये नक्की काय पाहिलं ज्यामुळे ते इतके घाबरले. त्यांचं मन या क्षणाला पूर्णपणे खाली झालं आहे आणि त्यांना काहीही आठवत नाहीये, ते जेव्हा जेव्हा ती गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा ते खूप घाबरून जातात. आमचा एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ञाला भेटून संमोहन उपचार घेण्याचा विचार चालू आहे. ''

पुढे जाऊन बार्नीला त्याने मेजर हेंडरसन यांना यानाच्या आतमध्ये दिसलेल्या आकृतींबद्दल का नाही सांगितलं असं विचारलं असता त्याने स्वतःच हसू करून न घेण्याच्या उद्देशाने ही माहिती मेजरना दिली नाही असे सांगितलं.  UFO दर्शनाच्या १० दिवसांनंतर बेटीला भयावह स्वप्ने पडायला लागली. यानातील आकृत्या आपलं अपहरण करून यानात नेत आहेत असं तिला स्वप्नांत दिसे. 

१७ ऑक्टोबरला NICAP सचिव, रिचर्ड हॉल यांनी बेटीच्या पत्राला उत्तर दिल ते असं: 

''मेजर किहो तुमच्याशी सविस्तर पत्रव्यवहार करतीलच परंतु तोपर्यंत साठी त्यांनी मला तुमच्या २६ सप्टेंबरच्या  पत्रास उत्तर म्हणून हे पत्र लिहावयास सांगितलं आहे. आम्ही तुमच्या अनुभवाने फारच प्रभावित झालो आहोत आणि त्याचा तपास करण्याची तयारी सुरु केली आहे. आमची बॉस्टन येथील उपसमिती तुमच्याशी येत्या काही दिवसांत संपर्क साधेल. वॉल्टर वेब हे जरी अध्यक्ष असले तरीही मेजर किहो यांची सही असलेलीच ओळखपत्रे आमच्या उपसमितीतील तपासनीस सोबत आणतील. श्रीमान वेब हे NICAP चे घनिष्ठ मित्र आणि सल्लागार आहेत, तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. ''

२१ ऑक्टोबरला वॉल्टर वेब यांनी हिल दाम्पत्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्याशी वैयक्तिक आणि एकत्र असा जवळ जवळ सहा तास संवाद साधला.  २६ ऑक्टोबरला वेब यांनी NICAP ला ''न्यू हॅम्पशायर च्या व्हाईट माउंटन्स मध्ये एक नाट्यमय UFO सामना, सप्टेंबर १९-२०, १९६१ ''  या मथळ्याखाली एक वर्गीकृत अहवाल पाठवला.  तो अहवाल असा: 

''श्रीमान हिल यांनी गाडीला थांबवले परंतु तिच्या हेडलाईट्स व इंजिन चालूच ठेवले. त्यांच्या पत्नीने त्यांना दुर्बीण दिली व त्या स्वतः विण्डशिल्ड मधूनच बाहेर पाहत राहिल्या. यानंतर अजून चांगल्या प्रकारे पाहणीसाठी श्रीमान हिल यांनी त्यांच्या बाजूचा दरवाजा खोलून महामार्गावर पाय ठेवले. या क्षणी UFO ने गाडीच्या उजवीकडून डावीकडे जागा बदलली आणि हवेतच तरंगत राहिली. आपण जे काही पाहतोय याला काही ना काही तार्किक स्पष्टीकरण आहे असे बार्नीला अजूनही वाटत होते, कदाचित सैन्यदलातलं एखादं हेलिकॉप्टर त्यांची मजा घेत असावेत. त्याला नवल या गोष्टीचे वाटले की हे यान बिना काही आवाज करता इतक्या वेगाने हलते आणि थांबतेसुद्धा, ते कसे?  

यानाने मोहिनी पाडल्यागत ते त्याकडे दुर्बिणीतून बघत होते. हे सुरु असतानाच यान  थोडं पुढे झुकून हळू हळू त्यांच्या दिशेने खाली येऊ लागलं. यानाच्या खिडक्यांतून आठ ते दहा आकृत्या आपल्याला पाहात आहेत असे त्यांना दिसत होते.  आकृत्या एका मध्यवर्ती भागाच्या गोल उभ्या राहिल्या होत्या असं त्यांना दिसत होत. अचानक या स्तब्ध आकृत्या खिडकीकडे पाठ करून आकस्मिक हालचाली करू लागल्या. असं दिसत होत की ते मध्यवर्ती भिंतीवरील कळा आणि तरफा दाबत होते. एक आकृती खिडकीतच थांबून राहिली. या क्षणाला वस्तूवरील लाल दिवे तिच्यापासून दूर जाऊ लागले. आता श्रीमान हिल यांना समजले की या लाल बत्त्या यानाच्या पंखांच्या टोकावर आहेत आणि ही पंखं माश्याच्या कल्ल्यांसारखी दिसू लागली होती.

श्रीमान हिल यांच्या म्हणण्यानुसार या आकृत्या मानवी आकारात होत्या व त्यांनी चमकणारे काळे गणवेश घातले होते. त्यांनी डोक्यात टोपडंही घातलं होत हे त्यांनी डोकं हलवल्यावर दिसत होत. हे गणवेश चकाकणाऱ्या चामड्याचे होते. ते खिडकीत उभे होते तेव्हा हिल याना त्यांचा कमरेपर्यंतचा भाग दिसत होता. जेव्हा ते भिंतीकडे वळले तेव्हा त्यांचा कंबरेखालचा भाग काही अंशी दिसत होता. या आकृत्या जर्मन अधिकाऱ्यांसारख्या थाटात होत्या असं श्रीमान हिल यांचं म्हणणं आहे. या आकृत्या पटापट पटापट त्यांचं काम करत होत्या आणि खिडकीत थांबलेली एक आकृती सोडल्यास इतर कोणाच्याही चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे भाव दिसत नव्हते. श्रीमान हिल म्हणतात की ह्या आकृतीने त्यांना पाहून एक छोटंसं स्मित दर्शवलं.''


पाहिलेल्या वास्तूचे बार्नी हिल ने काढलेलं चित्र.  

नोव्हेंबर मध्ये US एअर फोर्स ने पत्रकार परिषद घेऊन अधिकृत अहवाल सादर केला. त्यात खालील विधाने होती: 

" उड्डाणाबद्दल कोणत्याही प्रकारची विशिष्ठ माहिती दिली गेली नाही. 

प्रकाशाचा खरा स्रोत माहिती नाही. कोणत्याही प्रकारची उभीआडवी हालचाल दिसली नाही यामुळे ही वस्तू गुरु ग्रह असावा. 

कोणत्याही प्रकारचा पुरावा हे दर्शवत नाही की ही वस्तू अनैसर्गिक होती."

येणाऱ्या  काळात बेटी आणि बार्नी, दोघांच्याही रात्रीच्या वेळेस मानवी वस्तीपासून दूर रस्त्यांत गाडी चालवण्याच्या चिंतेत वाढ होऊ लागली. बेटीला पडणारी दुःस्वप्न आणखीनच भयावह होऊ लागली. बेटी आणि बर्नी यांना त्यांच्या हरवलेल्या वेळेची आता खूपच चिंता वाटू लागली. उडणाऱ्या विचित्र वस्तूला पाहण्यासाठी गाडी हळू चालवून व रस्त्यात थांबूनही त्यांना जितक्या वेळात घरी पोहोचणं अपेक्षित होत त्यापेक्षाही दोन तास जास्त वेळ त्यांना लागला होता. दोघांनाही रस्त्यात असलेल्या एका अडथळ्याबद्दल अंधुक अंधुक अस आठवत होत परंतु ते हरवलेले दोन तास कुठे गेले याबद्दल दोघांनाही आठवत नव्हतं.


बार्नी त्याने पाहिलेल्या वस्तूच वेगळं चित्र बेटी आणि डेलसी ला दाखवताना.  

भाग 2: संमोहन

१२ मार्च, १९६२ रोजी बेटी आणि बार्नी यांनी जॉर्जटाऊन, मासाचुसेट्स येथील डॉ. पॅट्रिक कर्क या मानसोपचारतज्ज्ञांना पत्र लिहून त्यांची अपॉइंटमेंट मिळण्याची शिफारीश केली. यात त्यांनी त्यांच्या १९/२० सप्टेंबरच्या अनुभवाबद्दल थोडक्यात लिहिलं अनी पुढे खालील मजकूर लिहिला होता: 

''बरेचशे गोंधळात घालणारे पैलू राहिले आहेत आणि संमोहन कदाचित ते स्पष्ट करू शकेल. आम्ही हा अनुभव NICAP आणि काही जवळचे मित्र सोडल्यास बऱ्याच गोपनीयतेने हाताळला आहे. आम्हाला अशी माहिती मिळवायची आहे जी आम्हाला वैज्ञानिकरीत्या मदतीची ठरेल.''

एका सल्लामसलतीनंतर डॉ. कर्क यांनी हिल दाम्पत्याला संमोहन उपचार न घेता अजून थोडे दिवस थांबून काही नवीन आठवणी बाहेर येतात का याची वाट बघण्यास सांगितले. परंतु, बार्नीची तब्यत आणि चिंता खालावतच गेली, १९६३ पर्यंत बार्नीला उच्च रक्तदाब, नियमित डोकेदुखी, निद्रानाश, आणि पोटाचा अल्सर अश्या व्याधी जडल्या होत्या ज्या रुढीबध्द उपचाराने बऱ्या होत नव्हत्या. बार्नीच्या डॉक्टरने असा निष्कर्ष काढला की बार्नीचे आजार हे psychogenic (मानसिक आणि भावनिक त्रासातून उत्पन्न होणार शारीरिक त्रास) होते. त्यांनी बार्नीला येथीलच स्थायिक मानसोपचारतज्ज्ञ, डॉ. डंकन स्टिव्हन्स यांची भेट घेण्यास सांगितले. मानसोपचार घेऊन सुद्धा बार्नीची तब्यत इतकी खालावली की त्याला कामावरून तीन महिन्यांची रजा घ्यावी लागली. त्या दिवशी नक्की काय घडलं ते न आठवत येणे  याबद्दलची चिंता,  आणि त्या रात्रीच्या तुटक तुटक स्मृती यांमुळे त्याला त्रास होताच राहिला. कदाचित संमोहन उपचाराने स्मृतिभ्रंशाच काही निदान मिळेल या आशेने बार्नीने शेवटी डॉ. स्टीव्हन्सना एखाद्या उत्तम मानसोपचारतज्ञ आणि संमोहन तज्ज्ञाचा त्याला संदर्भ देण्यास सांगितले. डॉ. स्टिव्हन्सने त्याला बोस्टन येथील डॉ. बेंजामिन सिमोन यांना भेटण्याचा सल्ला दिला. डॉ. सिमोन हे बऱ्याच वर्षांपासून संमोहन उपचाराचा मानसोपचारात वापर करत होते.  


डॉ. बेंजामिन सिमोन  

क्लेशदायक स्मृतीभ्रंश ही एक मानसीक व्याधी आहे जिच्यात एखादी त्रासदायक, क्लेशदायक घटना आठवण्याची क्षमता अर्धी अथवा पूर्णपणे निघून जाते. यामुळे स्मृतीमध्ये काही मिनिट किंवा काही दिवस इतके लांब खिंडार पडू शकतात. ही परिस्तिथी युद्धकाल, नैसर्गिक अरिष्टे आणि अपघात अशा त्रासदायक घटनांत दिसून येते. ही व्याधी जडलेली व्यक्ती तिच्या स्मृतिभ्रंशाबद्दल जाणून असते व यामुळे ती गोंधळून जाते, तणावातून जाते आणि विसरलेल्या वेळेदरम्यान नक्की काय झालं या एका उद्देशाने ती पछाडून जाते. बार्नीच्या क्लेशदायक स्मृतिभ्रंशासाठी संमोहन उपचार करण्यास डॉ. सिमोन यांनी मंजुरी दर्शवली. डॉ. सिमोन याना हेही लक्षात आलं की बेटीला तिचे विचित्र आणि त्रासदायक दुःस्वप्ने छळत होते. यामुळे  बेटीवरही हाच उपचार वापरण्याचा निर्णय डॉ.सिमोन यांनी घेतला. 

१९६४ च्या फेब्रुवारीपासून डॉ. सिमोन यांनी हिल दाम्पत्याच्या हरवलेल्या स्मृती बाहेर काढण्यासाठी बरीचशी संमोहन सत्रे घेतली. ही सत्रे दोघांना वेग वेगळं घेतली जात आणि डॉ. सिमोन हे प्रत्येक सत्राचं ध्वनिमुद्रण करून ठेवत. सुरुवातीला डॉ.सिमोन यांनी दोघांचीही वेग वेगळी चौकशी केली ज्यात त्यांनी घटना घडण्यापर्यंतच्या गोष्टीचा आढावा घेतला व त्यानंतर त्यांनी UFO दर्शनाची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यांनी पाठवलेली माहिती साधारणपणे आधी दिलेल्या माहितीशी समरूप होती आणि थोडीशीच काही ती नवीन माहिती त्यातून प्राप्त झाली. पण जेव्हा डॉ. सिमोन यांनी हिल दाम्पत्याला हरवलेल्या वेळात काय झालं याची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या घटनेच्या चेतनायुक्त आठवणींच्या पलीकडे नेले तेव्हा गोष्टी प्रमाणाच्या बाहेर विचित्र झाल्या. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जरी वेंधळ्या वाटत असल्या तरी त्यांनी त्या वेळात एकत्र असताना दिलेला वृत्तांत तंतोतंत जुळत होता. 

उदाहरणार्थ, बार्नीने सांगितले की तो यानापासून दूर जाण्यासाठी गाड़ी चालवत असताना त्याला लक्षात आलं की तो आता रूट ३ वर गाड़ी चालवत नव्हता.  

''मी एकदा वळलो आणि मला ते कळलंही नाही. मला नाही माहिती मी ते वळण का घेतलं आणि तेथे मी हरवून गेलो. मला दिसलं की मी महामार्गाच्या एका विचित्र भागात होतोय आणि मी याआधी कधीही आलो नव्हतो. आणि मला थांबवलं जात होत. मला खूप अस्वस्थ वाटत होत... आणि मला ही माणसं खाली येताना, माझ्याकडे येताना दिसली...''

त्याने पुढे रस्त्यात उभ्या असलेल्या सहा माणसांच्या गटाचं वर्णन केलं. त्याने गाडी थांबवली तशी ही माणसे तीन तीन च्या गटांत विभागली. एका गटाने त्याला गाडीतून बाहेर काढलं आणि त्याला जंगलात घेऊन जाऊ लागले. या क्षणाला त्याच मन एका कोऱ्या पाटीसारखं झालेलं. त्याने त्याचे डोळे बंद केले आणि त्या माणसांनी त्याला पुढे नेलं. डॉ. सिमोन यांनी यावेळी बार्नीला मधेच थांबवून प्रश्न केला की ही त्याची कल्पना किंवा स्वप्न तर नव्हतं ना? यावर बार्नी बोलला,''नाही, हे माझ्या स्वप्नातील नाही.''  डॉ. सिमोन यांनी विचारलं की तुम्हाला खरोखर रस्त्यावर माणसांनी थांबवलेलं का? यावर बार्नीने होय असं उत्तर दिल. 


विचित्र यान पाहिल्यावर पळ काढताना अचानक एका अनोळख्या वळणावर कसे आलो आणि तेथे कसे पोहोचलो याबद्दल काहीही माहिती नाही असे बेटीनेही एका वेगळ्या सत्रामध्ये सांगितले. मग गाडी थांबली आणि त्यांनी रस्त्यावर काही मांस उभी असलेली पहिली. तिला वाटलं कि गाडी बिघडली असेल. ही माणसे दोन गटांत विभागली आणि गाडीकडे येऊ लागली. एका ग्रुप ने  बेटीचा दरवाजा खोलला आणि दोन माणसांनी तिला गाडीतून काढून जंगलात नेलं. तिच्यामागे ती बार्नीला इतर दोन व्यक्ती नेत आहेत असं बघू शकत होती. पण बार्नीचे डोळे बंद दिसत होते आणि तो झोपलाय असं वाटत होत. 

बेटी आणि बार्नीने दिलेले या सत्रांच्या ट्रांसस्क्रिप्टमधील बरेचशे वृत्तांत विलक्षणियरित्या तंतोतंत आहेत. इतके की असं वाटत की दोन व्यक्ती एक खरीखुरी घटना आपआपल्या दृष्टिकोनाने सांगत आहेत. या सत्रांमध्ये खूप खोलवर जाऊन यानातील माणसांची, यानाच्या अंतर्भागाची आणि यानात बार्नी व बेटीवर वेग वेगळं नेऊन केलेल्या परिक्षणाची माहिती काढण्यात आली. बेटीला कोण्या एका 'लीडरशी' संवाद साधल्याचे आठवत होत. हा लीडर या यानाचा मुखिया होता असे वाटते. यानात असताना एका वेळी लीडर ने आपल्याला त्रिमितीय (३D) नकाशा दाखवला असे बेटीने सांगितले. त्याचे वर्णन तिने संमोहित असताना असे केले आहे: 

''...ठिपक्यांनी भरलेला एक आयताकृती नकाशा. काही खूप लहान, तर काही बिंदूंइतके तर इतर काही नाण्यांइतके मोठे होते. काही ठिपक्यांवर वक्र रेषा होत्या ज्या एका ठिपक्यापासून दुसऱ्या ठिपक्या पर्यंत जात होत्या. त्यानंतर, यात एक मोठा वर्तुळ होता ज्यावर एकमेकांशी जुळलेल्या काही जाड्या रेषा होत्या. या रेषा मोठ्या वर्तुळाला एका छोट्या वर्तुळाशी जोडत होत्या.''

हा नकाशा बेटी साठी फार महत्वाचा वाटत होता यामुळे डॉ. सिमोन यांनी तिला घरी जाऊन आराम करून नंतर या नकाशाला तो जसा दिसत होता तसा कागदावर रेखाटण्यास सांगितले. बेटीने तस केलं आणि या नकाशाची एक आवृत्ती डॉ. सिमोन यांना नंतरच्या भेटीत सुपूर्त केली. 


बेटीचा तारका नकाशा 

ही सत्रं सहा महिने सुरु राहिली. जेव्हा सत्रे थांबली तेव्हा हिल दाम्पत्याला ती असमाधानकारक वाटत होते. ही सत्रे सुरु करण्याआधी डॉ. सिमोन यांनी त्यांना त्यांच्या हरवलेल्या स्मृती परत मिळवण्याचे आश्वासन दिले होते असे त्यांना वाटलेले. परंतु , डॉ. सिमोन यांनी त्यांना त्यांचे संमोहन मधील वृत्तांतं ही असत्य असून ती बेटीच्या दुःस्वप्नांतून बाहेर आली असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. ऑगस्ट १९६५ मध्ये बेटीने वॉल्टर वेब यांना खालील पत्र लिहिलं: 

" बार्नीला डॉ. सिमोन यांनी आपल्याला फसवले असे वाटते कारण आधी त्यांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं होतं की या टेप्स मध्ये फक्त आणि फक्त सत्य असेल. आणि नंतर शेवटी त्यांनी अस ठरवलं की हे सगळे अनुभव खरे नसून माझ्या स्वप्नांतून आले आहेत. माझ्या स्वप्नांची एक वेगळी प्रत त्यांच्याकडे होती. माझे स्वप्ने आणि आमचा अनुभव यांची त्यांनी नंतर तुलना केल्यावर खूप फरक जाणवला तरीही त्यांनी शेवटी असा निकाल लावला. माझ्या स्वप्नांचा आधार घेऊन बार्नी हे सगळं बोलतोय असेही त्यांनी सांगितले. ही पूर्ण कसरत त्रासदायक, वेळ आणि पैसे वाया घालवणारी ठरली."

असे असूनदेखील बेटी संमोहणातून प्राप्त झालेल्या माहितीला सत्य समजून आपलं खरोखर परग्रहींकडून अपहरण झालं या मतावर ठाम राहिली. ती UFOs आणि परग्रही अपहरणे या विषयांत खूपच रुची घेऊ लागली. असे असूनदेखील ती सामान्यपणे जीवन जगत राहिली आणि तिला कामामध्ये बढतीही लाभली. याविरुद्ध बार्नीला हे सगळं विसरून आपलं अपहरण होण्या अगोदरचं सामान्य जीवन जगायचं होत. घेतलेल्या अनुभवाबद्दल कोणी विचारपूस केल्यास तो रागावत असे आणि चिंतातुर होत असे. पण डॉ. सिमोन यांच्या सत्रांनंतर त्याची तब्यत बरी होऊ लागली होती यामुळे त्याने पुन्हा नागरी हक्काच्या चळवळींमध्ये स्वतःला झोकून दिले. मे १९६५ मध्ये त्याची न्यू हॅम्पशायर स्टेट कमिटी टू युएस कमिशन ऑन सिव्हिल राईट्स मध्ये नियुक्ती झाली. जवळच्या व्यक्तींना सोडल्यास बेटी आणि बार्नीच्या अनुभवाची माहिती म्हणावी इतकी बाहेर कोणापर्यंतही पोहोचली नव्हती. हळू हळू हिल दाम्पत्याच आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागलं होतं.


बार्नी हिल त्याचं काम करताना

भाग 3: प्रसिद्धी

मग २५ ऑक्टोबर १९६५ मध्ये बोस्टन ट्रॅव्हलर मासिकाने "UFO थरार - त्यांनी युगलाला पकडले काय?" या मथळ्याखाली काही लेख प्रकाशित केले. पत्रकार जॉन लुटट्रेल याने बेटी व बार्नी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु दोघांनीही त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. ती लेखं वाचून असे समजले की या पत्रकारांनी कुठूनतरी त्यांची खरी घटना आणि संमोहन उपचार सत्रे यांबद्दल माहिती गोळा करून स्वतःच्याच कल्पनांनी रंगवलेले UFO अपहरणाचे लेख लिहिले होते. आता यामुळे अचानकच बेटी आणि बार्नी हे अमेरिकेतच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध झाले होते. युरोप मधून त्याच्या UFO अनुभवाबद्दल माहिती विचारणारे फोन येऊ लागल्यावर बार्नीला या लेखांच्या अस्तित्वाबद्दल समजले. जेव्हा बेटी कामावरून घरी परतली तेव्हा तिला खूप साऱ्या गाड्या रस्त्यावर थांबलेल्या दिसल्या. यामुळे पहिले तिला वाटले की कदाचित शेजारच्या घरात एखादी पार्टी वगैरे चालू असेल. नंतर तिला समजले की आपले घर पत्रकारांनी गजबजले आहे आणि बार्नी लंडन मधील कोणत्यातरी पत्रकाराशी फोन वर बोलत आहे. त्या रात्री बार्नी जेव्हा कामावर गेला तेव्हा त्याला पोस्ट ऑफिस पत्रकारांनी भरलेले दिसले. या पत्रकारांना त्याच्याशी संवाद साधायचा होता. दुसऱ्या दिवशी बेटीलाही कामावर असाच अनुभव आला. यानंतर हिल दाम्पत्याच आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. 

बोस्टन ट्रॅव्हलर मधला लेख इतका लोकप्रिय झाला की मागील ८४ वर्षात या दैनिकाच्या जितक्या प्रति एकत्रितरित्या विकल्या गेल्या नव्हत्या तितक्या या एका आवृत्तीच्या विकल्या गेल्या होत्या आणि या लेखाच्या ३००० हुन अधिक प्रतींसाठी पुन्हा मागणी आली होती. या लेखात रंगवलेल्या खोट्या गोष्टींची पोलखोल करण्यासाठी हिल दाम्पत्याने ७ नोव्हेंबरला पहिल्यांदा जनसंवाद साधला. हा जनसंवाद जवळीलच डेवर शहरातील पिअर्स मेमोरियल उनिटारीअन-युनिव्हर्सलिस्ट चर्च येथे पार पडला. ४०० खुर्च्या असलेलं हे चर्च गच्च भरलं होत. बाहेर जमा झालेल्या गर्दीलाही बोललेलं सगळं ऐकू जावं यासाठी मोठे स्पीकर लावले गेले होते. या प्रेक्षकांमधील एक व्यक्ती ही लेखक, नाटककार आणि द सॅटरडे रिव्ह्यू चे स्तंभलेखक जॉन जी. फुलर हे होते. फुलर हे तेव्हा UFOs वरील एका पुस्तकाचं (Incident at Exeter: The Story of Unidentified Flying Objects Over America Now, 1966) लिखानकाम करत होते. आपल्या पुस्तकात हिल दाम्पत्याचा अनुभव नमूद करण्यासाठी कार्यक्रम संपल्यावर फुलर यांनी हिल दाम्पत्याची भेट घेतली. परंतु, संवाद साधल्यावर फुलर यांना इतका विश्वास बसला की त्यांनी या हिल अनुभवावर एक पुर्ण पुस्तक लिहिण्याचा विचार केला. हा विचार त्यांनी हिल दाम्पत्यास सांगितलं. बेटी आणि बार्नी हे दोघेही या चुका आणि अतिशयोक्तीने भरलेल्या लेखांनी त्रस्त झाले होते. कदाचित हे पुस्तक जर आलं तर आपण लेखांमधील चुका खोडुन आपली खरी घटना आणि मतं मोकळेपणाने मांडू शकतो असे त्यांना वाटले. 

हिल दाम्पत्य आणि फुतर यांत लवकरच एक करार केला गेला ज्यात पुस्तकातून येणार नफा आणि अधिकार हे दोघांमध्ये अर्धे वाटून घेतले जातील असे ठरले. त्याचबरोबर हिल दाम्पत्याने हेही ठरवलं की पुस्तकातील वैद्यकीय विधाने आणि निष्कर्ष यांस मंजूर अथवा नामंजूर करण्यासाठी म्हणून पुस्तकाच्या लिखाणात डॉ. सिमोन यांनाही घेतलं जावं आणि पुस्तकातून येणाऱ्या नफ्यातील काही भाग हा त्यांस देण्यात यावा. फुलर यांना हे पुस्तक लिहीणं कठीण वाटलं (मुख्यत्वे डॉ. सिमोन यांच्या संपादकीय इनपुटमुळे) पण तरीही १९६६ मध्ये The Interrupted Journey: 2 Lost Hours "Aboard a Flying Saucer'' हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. उपलब्ध झाल्या झाल्या पुस्तकाला भरभराटी प्राप्त झाली, ते लगेच The New York Times च्या बेस्टसेलर लिस्ट मध्ये प्रथम क्रमांकावर झळकलं. पुस्तकाच्या ३००,००० हुन अधिक प्रति विकल्या गेल्या.  त्याच जगभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर झालं. १९८८ पर्यंत The Interrupted Journey ची छपाई सुरू राहिली. 


जसे पुस्तक प्रकाशित झाले तसे बेटी आणि बार्नी मीडिया स्टार बनले. १९६६ आणि १९६७ दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या दूरचित्रवाहिनी आणि रेडिओवर येऊन भेटी व मुलाखती दिल्या. यात अमेरिकन तसेच इतर देशांतील प्रकाशकांचा समावेश होता. हिल दाम्पत्यांसारखाच अनुभव घेतलेल्या आणि त्यांच्या अनुभवाबद्दल अजून जाणून घेणाऱ्या लोकांची पत्रे मोठ्या प्रमाणात आता हिल यांच्या घरी येऊ लागली. UFO ग्रुप्सना हजेरी लावणे किंवा त्याच्यासमोर बोलणे ही एक गोष्ट करणे त्यांनी टाळले. १७ नोव्हेंबर, १९६६ ला बार्नीने लुईस लोमॅक्स या दूरचित्रवाहिनी कार्यक्रमातील आपल्या मुलाखतीत त्यांनी पुस्तकाच्या लिखाणास सहमती आणि सहकार्य का केले हे सांगितले: 

''आम्ही UFOs च समर्थन नाही करत आहोत. मला वैयक्तिकरित्या याच्याशी काहीएक घेणं-देणं नाही.आम्ही त्या पत्रकाराशी संवाद साधण्याचं टाळलं यामुळे त्याने दैनिकात सलग पाच दिवस त्याच्या स्वतःच्या मनाने काहीही लेख लिहिले. हे सगळं १९६५ मध्ये घडलं आणि जरीही ठिकाण व माणसं यात लिहिली नव्हती तरीहि प्रत्येक जण याबद्दल चर्चा करत होता.  आमची सहमती न घेता त्याने ही गोष्ट  जोडूली आणि स्वतःच लिहिली. यामुळे आम्ही सक्तीने हा सगळं प्रकार थांबवण्याचा विचार करू लागलो.''

हे ऐकायला वेगळं वाटेल परंतु बार्नीला त्याचा अनुभव किंवा UFOs यांबद्दल चर्चा करण्यात काहीएक रस नव्हता असे जाणवते. आता त्याच्या अनुभवाबद्दल बोलताना तो भ्यायलाय किंवा चिडलाय असे वाटत नसे. त्याला ही गोष्टी खूप काही मनोरंजक किंवा महत्वाची अशी वाटत नसे व त्याच्या रेडिओ आणि दूरदर्शनवरील मुलाखतींत तो बराच वेळ हा नागरी अधिकार चळवळ व अमेरिकेत सामाजिक न्यायासाठी करावा लागणारा संघर्ष यांवर चर्चा करण्यात घालवत असे. याउलट बेटीला UFOs आणि परग्रही या विषयांनी मोहिनीच घातली होती. त्याकाळातील तिची पत्रं आणि रोजनिश्या दिवसेंदिवस या दोन विषयांभोवती फिरू लागल्या. याचसोबत तिला होणाऱ्या UFO दर्शनांची संख्या वाढू लागली. ४ एप्रिल १९६६ मध्ये तिने एका पत्रात नमूद केले: 

"बार्नी आणि मी अधून मधून काहीनाकाही कारणासाठी रात्री बाहेर पडतो. मागच्या ऑक्टोबर पासून आम्ही  दहा मधून सरासरी आठ ते नऊ वेळा आमच्या 'मित्रांना' पोर्ट्समाऊथच्या बाहेर फिरताना पाहिले आहे. 

एका रात्री मी सहा सहदर्शींसोबत सुमारे ४५ मिनिटे एका यानाला पहिले. यातील एका यानाने बाहेर येऊन तळ्यावर आमच्यासाठी  सादरीकरण केले. या सादरीकरणात त्याने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे उडून दाखवले, वेगवेगळी उड्डाणे दाखवली, वेगवेगळे प्रकाशित दिवे दाखवले. यानंतर त्याने एका दुसऱ्या यानाला भेटून काही मिनिटांत तेथून वेग वेगळ्या दिशांत निघून गेले.''

ह्याच काळात बेटीची तब्यत खालावू लागली. जानेवारी १९६८ मध्ये तिच्या तोंडातून पॉलीप्स काढावे लागले. जुने १९६८ मध्ये तिला पेरीकारडायटिस आणि हृदयावरील सुजेमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे ती खूपच नाजूक बनली. तिला जास्त वेळ काम करणे कठीण जाऊ लागले. यात तिच्या अधून मधून येणाऱ्या निमोनियाने त्रास आणखीनच वाढवला. याउलट बार्नीचे स्वास्थ्य आणखी सुधारू लागले. त्याला होणाऱ्या डोकेदुखी, निद्रानाश आणि पोटाचे विकार या सगळ्या व्याधी १९६८ मध्ये गायब झाल्या. परंतु तो स्वतःला खूपच थकवत होता. बार्नी आपल्या पोस्ट ऑफिसामधील कामासोबतच यूएस सिविल राईट कमिशनसोबत काम करत होता. याअंतर्गत त्याने रॉकींगहॅम काउंटी कम्युनिटी ऍक्शन प्रोग्राम ची स्थापना केली व तिचा पहिला संचालक म्हणून रुजू झाला. हे सगळं चालू असतानाच तो अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन त्या रेडिओ आणि दूरदर्शनवरील भेटी मुलाखती करत होता, पत्रकारांशी बोलत होता UFO  अनुभवाबद्दल सांगत होता. १९६८ च्या उत्तरार्धात एका अश्याच कार्यक्रमास गाडी चालवून जात असताना त्याला तीव्र भोवळ आली. ती इतकी तीव्र होती की त्याला बेटीला गाडी चालवायला सांगावे लागले. हा कार्यक्रम संपल्यावर बेटीने बार्नीला दवाखान्यात नेले परंतु ही भोवळ येण्यामागचे कारण काही समजले नाही व ती हळूहळू निघून गेली. 

नंतर,१९६९ च्या २५ फेब्रुवारीला बार्नीचा मेंदूतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. तेव्हा तो फक्त ४६ वर्षांचा होता. बेटीचा शारीरिक त्रास तसाच राहिला आणि १९७० च्या मध्यात तो इतका वाढला की बेटिला वयाच्या ५६व्या वर्षीच त्यामुळे समाजकार्यातून निवृत्त व्हावे लागले. याचबरोबर ती कोणीतरी लोकं वारंवार आपल्या घरात घुसून, आपल्या अनुभवासंभंधीत सर्व वैद्यकीय आणि कर(tax) नोंदणी असलेली कागदपत्रे मिटवत आहेत असा दावा करत राहिली. बेटी नवीन नवीन UFO दर्शनांबद्दल नोंदणी करत राहिली आणि काहीतरी पुरावा म्हणून तिने या भेटींचे फोटोज घ्यायला सुरुवात केली.


१९७५ च्या सुरुवातीस जेम्स अर्ल जोन्स या अभिनेत्याने The Interrupted Journey चे चित्रपट अधिकार विकत घेतले. पुस्तक वाचल्यानंतर त्याला त्यावर एक चित्रपट बनवून स्वतः बार्नीची भूमिका साकारण्याची त्याची उच्च होती. १९७५ च्या उन्हाळ्यात एक दूरदर्शन चित्रपट बनवण्याचं काम सुरु झालं. या चित्रपटात बेटी आणि पटकथा लेखक हेस्पर अँडरसन यांत झालेले संवादही समाविष्ट करण्यात आले. १९७५ च्या २० ऑक्टोबर ला NBC Television वर The UFO Incident चा प्रीमिअर पार पडला. या चित्रपटात जोन्स ने बार्नी तर एस्टल पार्सन ने बेटीची भूमिका साकारली होती. ऑगस्ट १९८३ ला बेटीने F. Lee Bailey Lie Detector Show, या लोकप्रिय दूरदर्शन कार्यक्रमात येण्यास संमती दिली. या कार्यक्रमात येणाऱ्या व्यक्तींची लाय डिटेक्टर वापरून त्यांनी केलेल्या विधानांची on air पडताळणी केली जायची. बेटीला खालील तीन प्रश्न विचारण्यात आले: 

१. तुला ताऱ्यांच्या नकाशा संबंधित माहिती UFO च्या आत असताना झाली का?
२. तू ही माहिती UFO सोडून इतर कोणत्या स्रोताकडून मिळवलीस का? 
३. तुला तुझा तारका नकाशा खोटा वाटतो का? 

अमेरिकन पॉलीग्राफ असोसिएशन चे अध्यक्ष , एड गौल्ट, यांनी या चाचणीची पाहणी केली होती. या सगळ्या प्रश्नांची बेटीने दिलेली उत्तरे (होय, नाही आणि नाही) हे सत्य म्हणून घोषित झाले होते. 

UFOs वर वारंवार होणाऱ्या संशयामुळे निराष झालेल्या बेटीने आपल्या मित्रांचा आणि इतर मंडळींचा मिळून एक गट बनवला. हा गट एकत्र मिळून आकाशात पाहत असत आणि दर्शनाच्या नोंदणी करत असत. ती फोटोजसोबतच आता मुव्ही कॅमेरा वापरून या वस्तूंना रेकॉर्ड करायचाही प्रयत्न करू लागली. माध्यमं आता बेटी व तिच्या गटाने केलेल्या दर्शनांची उपरोधिक भाषेत चर्चा करू लागले. ज्या लोकांनी तिच्यासोबत गटात सहभाग घेतला होता त्यांनी बेटी वारंवार विमानांना देखील चुकून UFO समजे असं सांगितलं. काही वेळेस ती आकाशात UFO दिसते आहे असं सांगे परंतु तिच्यासोबत असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला मात्र काहीही दिसत नसे. बेटीच्या कोणत्याही गोष्टीस UFO बोलण्याच्या सवयीमुळे मुख प्रवाहात असलेल्या व वैज्ञानिकरीत्या अभ्यास करणाऱ्या UFO समुदायापासून ती दूर पडली. १९७९ मध्ये जॉन फुलर ने भेटीस लिहिले: 

''तुझी स्वतःची विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे ती अशी की, काहीही जे इतरांना दिसत नाही, नोंदता येत नाही किंवा सिद्ध करता येत नाही हे तुला धोका पोहोचवू शकते मग त्यात तुझा विश्वास असो किंवा नसो याने काहीही फरक पडत नाही. The Interrupted Journey त्यावर लिहिताना ठेवलेल्या निर्बंधांशिवाय  इतकं प्रसिद्ध झालं नसत. दुसरं महत्वाचं असं की, तू हे समजून घे की जरी तू वैयक्तिकरित्या कशावर विश्वास ठेवत असशील तरी ते इतरांसाठी पुरे नाही. आपण स्वतः स्वतःला कधी कधी फसवू शकतो.''

आणखीन एका नावाजलेल्या UFO तपासणीसाने बेटीला याच विषयावर १९८० मध्ये पत्र एक लिहिले: 

''तुझ्याबरोबर ज्या लोकांनी आकाशात ''UFO'' पाहण्यासाठी साथ दिली त्यांच्यासोबत बोलल्या नंतरही माझा तुझ्यावरील विश्वास आणि भावना कायम आहेत. विमानांचे दिवे, रस्त्यावरील दिवे, किंवा मोठ्या वाहनांचे दिवे हे दिवेच आहेत, फक्त तू त्यांना ओळखू शकत नाहीयेस. कदाचित ते चुकीचं बोल्ट असतील परंतु माझ्या मनात त्यांच्यासाठीही आदर आहे. काही दिवसांपूर्वी दैनिकांत आलेल्या तुझ्या गुप्त ठिकाणी घडणाऱ्या UFO दर्शनाही बातमी वाचून माझा त्यांच्या मतांवरील विश्वास अजून ठाम झाला आहे.मला असं वाटतंय की तू आता फक्त प्रसिद्धीसाठी असं काहीही करत सुटली आहेस आणि तरीही तुझ्या नोंदण्याचा गांभीर्याने अभ्यास व्हावा म्हणून आणि नक्की काय चाकू आहे हे जाणण्यासाठी मी तुझ्या गटातील सदस्यांकडून तुझ्या UFO दर्शनाच्या रिपोर्ट्स मागून घेतल्या आहेत.  तुझ्या पहिल्या अनुभवातुन तुला लाभलेल्या प्रतिष्ठेमुळे तुझ्या विधानांना अनावश्यक महत्व मिळू शकते.''

UFO बाबत उत्साही असलेल्या इतर लोकांकडून दुर्लक्ष आणि उपहासात्मक चर्चा होऊ लागल्यावर बेटीने UFO अभ्यास क्षेत्रातून १९९१ मध्ये आपली निवृत्ती जाहीर केली. असे असूनदेखील मागील काही वर्षांत तिने UFO क्षेत्रात बनवलेले मित्र व ओळखी नंतरही जपून ठेवल्या. १९९५ मध्ये तिने A Common Sense Approach to UFOs हे पुस्तक स्वतः लिहून स्वतःच प्रकाशितही केलं. या पुस्तकाला म्हणावा तितका चांगला प्रतिसाद लाभला नाही. या पुस्तकात बेटीने अनुभवलेल्या UFO दर्शनाच्या वेगवेगळ्या घटनांबद्दल लिहिलं होत. या घटना बऱ्याचश्या वाचकांना विश्वास करण्याजोग्या वाटल्या नाहीत. 


बेटीने आपल्या पहिल्या अनुभवावेळी घातलेल्या ड्रेसवर २००० च्या दशकाच्या सुरुवातीस बरेचश्या वैज्ञानिक चाचण्या घेण्यात आल्या. हा ड्रेस तिने पुन्हा न वापरता जपून ठेवला होता. या चाचण्यांमधून ड्रेस वर एका प्रकारच्या 'विसंगत जैवीक पदार्थाचे' अस्तित्व दिसून आले. 

२००४ मध्ये बेटीचा मेटास्टॅटिक लंग कॅन्सरने (या कर्करोगात कर्करोगाच्या पेशी गाठींतून बाहेर निघून रक्ताच्या माध्यमाने इतरत्र पसरतात) मृत्यू झाला. 

  • थिअरीज

जर तुम्ही अजूनही इथे आहात तर तुमचं अभिनंदन! 'वस्तुस्तिथी' भाग खूपच तपशीलवार होता. परंतु बार्नी आणि बेटी यांच्यासोबत १९६१ च्या १९/२० सप्टेंबरला नक्की काय घडलं हे उत्तमरीत्या समजण्यासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे. या केसमध्ये फक्त चार थिअरीज आहेत आणि हा भाग खूप लहान असेल. हे जाणून तुम्हाला आनंद झाला असेल हे मी गृहीत धरतो. 

या प्रत्येक थिअरी बद्दल मी एक एक करून बोलेल. या थिअरीज अशा आहेत: 

१. बेटी आणि बार्नी हे दोघे विकृतीने भरलेली मूर्ख मांस होती ज्यांचा पूर्ण अनुभव एक तर भ्रम किंवा कल्पना होता. 

२. बेटी आणि बार्नी हे एक नंबर चे लोकांना मूर्ख बनवणारे चालू व्यक्ती होते ज्यांनी UFO क्रेझ मधून पैसे मिळवण्यासाठी हा सगळी काल्पनिक कथा बनवली. 

३. बेटी आणि बार्नीचं खरोखर परग्रहींनी अपहरण केलं होत. 

४. १९६१ च्या सप्टेंबर मध्ये त्या रात्री हिल दाम्पत्यासोबत खरोखर काहीतरी वेगळं घडलं परंतु संमोहन उपचारादरम्यान त्यातुन भलतंच काहीतरी झालं ज्यामुळे बेटी आंधळेपणाने UFOs आणि परग्रहींच्या अस्तित्वावर विश्वास ठेवू लागली. 

पहिली थिअरी सिद्ध करणे अशक्य जरी नसली तरीही फार कठीण आहे. बेटी आणि बार्नीला समाजात व कामाच्या ठिकाणी खूप आदर असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. दोघांपैकी कोणाला भ्रम व्हायचे, कल्पनेत रमलेले असायचे,अमली पदार्थांचं सेवन करायचे अथवा मानसिकरीत्या असंतुलित होते असा आपल्याकडे एकही पुरावा नाही. एक समाजसेविका म्हणून असलेलं काम करताना बेटीला कोणत्याही केसबद्दल महत्वाचे निर्णय घेता येणे, त्यांचा पाठपुरावा करता येणे व विश्वसनीय निकाल लावणे गरजेचे होते. हे सगळं करायला ती कमी पडत होती असं तिच्या एकाही नियोक्त्याने म्हंटल नाही. उलट तिला १९६२ मध्ये बढती करून पर्यवेक्षनाच काम देण्यात आलं. 

बार्नीला त्याच्या नागरी हक्क चळवळीतील कामामुळे  खूप आदर प्राप्त झाला होता. त्यामुळे त्याला राष्ट्रीय नागरी हक्क परिषदेत महत्वाचं काम देण्यात आलं होतं. १९६१ मधील बेटी आणि पुस्तकाच्या प्रकाशनानंतरची बेटी यांमध्ये खूप फरक होता व ती आधीपासूनच UFOs आणि प्रगरही यांत रस घ्यायची व त्यामुळे तिला १९६१ मध्ये UFO दिसली याची सुतराम शक्यता नाही. याला दुमत देणारे कोणतेही पुरावे आपल्याकडे नाहीत. १९६१ मध्ये दोघानाही खूप सम्मान होता, समाजात त्यांना आदर होता आणि लोकं त्यांना विश्वासू व वैचारिकरित्या संतुलित मानत होते. 


पोर्ट्समाऊथ, न्यू हॅम्पशायर, circa १९६० 

पहिल्या थिअरीचाच भाग म्हणून मला अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी की त्यांचं UFO दर्शन हे कदाचित थकव्यामुळे झालेला भ्रम असू शकतो. पुराव्यांत या शक्यतेबद्दल बोललेलं नाही त्यामुळे हेही होण्याची शक्यता नाही. १९ च्या सकाळी बार्नीने मॉँटरिअल येथे रात्रभर आराम करून जवळ जवळ 100 मैल गाडी चालवली. पूर्ण दिवस शहरात घालवून संध्याकाळी त्यांनी पोर्टसमाऊथ च्या प्रवासास सुरुवात केली. त्यांनी प्रवास सुरु करताना हेही ठरवलं होतं की बार्नीला जर थकवा आल्यासारखं वाटलं तर ते रात्र घालवण्यासाठी रस्त्यातच थांबून घेतील. पहिल्या दर्शनापर्यंत त्यांनी पाच तासांत २०० मैलाचा प्रवास केला होता. एवढासा प्रवास करून कोणाला थकावट येऊन इतके वेगळे भ्रम झाले अशी घटना मला शोधूनही सापडली नाही. आणि जरी बार्नीला थकवा आला असेल तरीही बेटी तर प्रवासी खुर्चीत मस्त आरामात विश्रांती करत असेल मग तिला भ्रम होण्यासाठी थकवा कसा येणार? थकव्यामुळे झालेला भ्रम सिद्ध करायला आपल्याकडे काहीही पुरावा नाही. 

दुसऱ्या थिअरीचे खंडन करे जरा कठीणच आहे. १९५० व १९६० च्या दशकात अमेरिकेत UFOs हा एक मोठा चर्चेचा विषय होता. प्रसिद्धी आणि पैश्यांसाठी बरीच लोकं UFO दर्शनाच्या काल्पनिक कथा बनवायचे. परंतु हिल दाम्पत्यास हे करण्यासाठी काहीही कारण किंवा गरज होती असे वाटत नाही. त्याच्याकडे त्यावेळी पैश्यांची कमी नव्हती. आपलं काम करून ते एक सुखी जीवन व्यतीत करत होते. याचबरोबर या दोघांपैकी कोणालाही प्रसिद्धी किंवा ओळख हवी होती असे कोणाच्याही ऐकिवात नाही. पण ही थिअरी खोडुन काढण्यासाठी एकच गोष्ट खूप महत्वाची वाटते व ती म्हणजे अशी की ऑक्टोबर १९६५ मध्ये दैनिकात जबरदस्ती लेख येईपर्यंत हिल दाम्पत्याने आपला अनुभव गुपितच ठेवला होता. तोपर्यंत ही घटना घडून चार वर्षं उलटली होती. घटना घडल्या घडल्या त्यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना व जवळच्या मित्रांना याबद्दल सांगितले आणि यूएस एअर फोर्स व NICAP कडे याची नोंदणी केली. यावरून ते गोंधळले होते, चक्रावले होते आणि कदाचित थोडे घाबरलेही होते असे समजते. डॉ. सिमोन यांसोबत केलेल्या संमोहन सत्रांनंतर ते आणखीनच गोंधळून गेले. या सत्रांबद्दल त्यांनी मित्र, परिवार आणि काही UFO तपासनिसांना कळवले परंतु यातून प्रसिद्धी मिळवण्याचा कोणताही प्रयत्न त्यांनी केला नाही. त्यांनी प्रसिद्धी आणि पैसे मिळवण्यासाठीच जर हे सगळं केलं असतं तर चार वर्षांनंतर ही घटना जबरदस्ती जनसामान्यांत पोहोचण्याची त्यांनी वाट पाहिली असती का?

तिसरी थिअरी वरवर तरी मान्य करायला कठीणच वाटते आहे. आणि जर ती खरी असेल तर आपलं या विश्वाबद्दल असलेलं, जमवलेलं सगळं ज्ञान व विचार उलट पुलट होतील. पण तरीही आपण आपलं मन मोकळं ठेवून वस्तुनिष्ठ प्रकारे तिचा विचार करून बघू. ही थियरी खरी ठरवण्यासाठी काही गोष्टी 'पुरावे' म्हणून वापरल्या जातात. सगळ्यात महत्वपूर्ण मानले गेलेले तीन पुरावे खालीलप्रमाणे:

१. संमोहित असताना बेटी आणि बार्नीने वेग वेगळ बसून एखाद्या खऱ्या घटनेसारखंच त्यांच्या अनुभावाचं एकसारखं विवरण केलं. 

२. बेटीने तयार केलेला तारकांचा नकाशात दिसणारा एक तारकासमूह हा आकाशगंगेच्या एका विशिष्ट भागातून पाहिल्यावरच आपल्याला दिसू शकतो. 

३. बेटी च्या ड्रेसवर आढळलेला 'विसंगत जैविक पदार्थ' हा पृथ्वीवरील असू शकत नाही. 

आता यांकडे एक एक करून पाहुयात. 

मोठ्या खेदाने मी सांगू इच्छितो की पहिला पुरावा फोल ठरतो. कारण १९ सप्टेंबर नंतर लगेचच बेटीला भयावह स्वप्न पडण्यास सुरुवात झाली. या स्वप्नांचे विवरण तिच्या 'अंतर्मनातील आठवणींशी' मिळते जुळते आहे. संमोहन सुरू होण्याआधी या स्वप्नांबद्दल तिने बार्नीसोबत बऱ्याच वेळी खोलवर जाऊन चर्चा केल्याचं सर्वांनाच ज्ञात आहे. डॉ. सिमोन हे एक अनुभवी मानसोपचारतज्ञ होते व त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की ज्या काही संमोहणातून बाहेर येत आहेत त्या हरवलेल्या किंवा विसरलेल्या स्मृती नाहीत (हे आपल्याला बेटीने वॉल्टर वेब यांना ऑगस्ट 1१९६५ मध्ये लिहिलेल्या पत्रातून समजते). त्यांच ठाम मत होतं की हे सगळं बेटीच्या स्वप्नांतून व तिने बार्नीला दिलेल्या त्यांच्या महितीमुळेच बाहेर येत आहे. The Interrupted Journey या पुस्तकात याचा उल्लेख करणं जॉन फुलर नयांनी जाणीवपूर्वक टाळलं. पुस्तकातील आपल्या मुद्द्यांची अशी अर्धवट मांडणी पाहून डॉ. सिमोन यांना सुद्धा थोडस लाजिरवाण वाटल असेल. फुलर यांच्या पुस्तकात संमोहनातून बाहेर आलेल्या माहितीचा हिल यांच्या अपहरणाचा दावा खरा असल्याचं दाखवण्यासाठी वापर करण्यात आला आहे. ही बाब नंतर समोर आली जेव्हा डॉ. सिमोन यांनी १९७५ च्या २५ ऑक्टोबर मध्ये NBC-TV Today या वाहिनीवर जाहीररीत्या याबद्दल माहिती दिली. त्यांनी अस सांगितलं की संमोहनातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर UFO अपहरण झालं यावर माझा विश्वास आहे असे काहीही नाहीये. याचा पाठपुरावा त्यांनी २८ ऑक्टोबरला लिहिलेल्या एक पत्रात केला आहे:

" जेव्हा फुलर ने पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा मी हे मान्य केलं की परग्रही आले असतील याला आपण टाकण्यात हरकत नाही परंतु मला वैयक्तिकरित्या अस बिलकुलही वाटत नाही. मी जर इतकीही मन मोकळं ठेवलं नसत तर फुलर च पुस्तक तयारच झालं नसत.

हेही लक्षात घ्या की दर्शन झालं याबद्दल काही वादच नाही आणि मी ते कधीही अमान्य करणार नाही. कसलं दर्शन झालं हे मला अथवा हिल दाम्पत्याला माहिती नाही. आणि मी हेही खात्रीपूर्वक बोलू शकतो की 'अपहरण व निरीक्षण' हे फक्त आणि फक्त बेटीच्या स्वप्नांत घडलं आहे आणि माझ्याकडील महत्त्वाच्या पुराव्यांनी हे सिद्ध ही होत."

संमोहनाचा मानसोपचारात वापर करावा की नाही यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी खरोखर दबलेल्या आठवणी बाहेर येतात की नाही हे नक्की समजलेलं नाही. ज्या स्मृती बाहेर येतात त्या 'false memory syndrome' मुळे येतात अस बोललं जातंय. या सिन्ड्रोममध्ये खोट्या आठवणीही खऱ्या वाटायला लागतात. १९९४ साली मानसोपचारतज्ज्ञ स्टीवन जे लिन यांनी एक समोहन प्रयोग करून पाहिला. ज्यात त्यांनी काही लोकांना संमोहित करून 'तुम्ही आकाशात काही तीव्र प्रकाशाच्या गोष्टी पाहत आहात आणि तुमचा काही वेळ हा कुठेतरी हरवला आहे' असं त्यांच्या मनात टाकले. यातल्या ९१% लोकांनी UFOs संबंधित प्रश्न विचारले असता त्यांच्या परग्रहींशी संबंध आला आहे अशी उत्तरे दिली. 

हरवलेल्या, दबलेल्या स्मृती मिळवण्यात संमोहनाच्या उपयुक्ततेबद्दल असलेला संशय आणि डॉ. सिमोन यांचं स्वतःच अनुभवी मत यावरून संमोहन सत्रांतून मिळालेली माहिती पुरावा म्हणून वापरता येऊ शकत नाही. 

हिल दाम्पत्य परग्रहींशी संपर्कात आले हे पटवण्यासाठी बेटीचा तारका नकाशा सगळ्यात मोठा भौतिक पुरावा म्हणून वारंवार वापरला जातो. या नकाशाचा सगळ्यात पहिला अभ्यास हा ओहायो येथील मार्जरी फिश, या एका प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेकडून झाला होता. फिश UFOs च्या बाबतीत उत्साही होती व तिला बेटीचा नकाशाही खरा वाटत होता. जर हा नकाशा पृथ्वीवरून न दिसणारे तारे किंवा तारामंडल दाखवू शकला तर याने बार्नी आणि बेटीला खरोखर परग्रही भेटले होते हे सिद्ध होईल असं तीच मत होतं. बेटीने हा नकाशा कोणत्या दृष्टिकोनातून पहिला होता हे समजण्यासाठी फिशने मासेमारीच्या तारेचा वापर करून व त्यावर रंगीबेरंगी मनी विणून एक त्रिआयामी प्रतिकृती बनवली. ही प्रतिकृती तिने आपल्या घरातच ठेवून तिला वारंवार सुधारित करून सलग तीन वर्षे तिचा अभ्यास केला. तीन वर्षांनंतर तिने जाहीर केलं की बेटीच्या तारका नकाशात दिसणारी तारका प्रणाली ही झेटा रेटिकुलाई तारका समूह ही आहे. पण ती तेव्हाच झेटा रेटिकुलाई आहे जेव्हा बघणारा हा पृथ्वीव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून तिला बघतोय. बरेचशे खगोलशास्त्रज्ञ याच्याशी सहमत नव्हते (बरेचशे सहमतही होते). पण हेही लक्षात घ्यायला हवं की नकाशात 'तारका आणि ग्रह' दिसत होते आणि फिशचे अनुमान तेव्हाच बरोबर सिद्ध होतं जेव्हा आपण ठिपक्यांना तारे म्हणून मानतो. 


मार्जरी फिश

यात दुसरी समस्या अशी की या नाकाशाची इतरही वेगवेगळे पण तितकेच खात्रीपूर्वक अशे अनुमान काढले गेले आहेत. बेटीला तो नकाशा पेगासस नक्षत्राचा आहे असे वाटे. चार्ल्स अट्टरबर्ग यांना तो नकाशा फिश ने सुचवलेल्या तारका प्रणालीच्या जवळीलच पण इतर तारकांचा आहे असे वाटे. दोन जर्मन UFO उत्साहीनी अस दाखवलं की हा नकाशा आपल्या तारका समूहातील मोठे आणि छोटे ग्रह दाखवतो. यारी दांजो यांनी अस मत मांडले की हा नकाशा परग्रहींच घर, अल्फा सेंटाउरी या सूर्यमालेत आहे अस दाखवतो. मी अजूनही वेगवेगळ्या लोकांचे अनुमान येथे लिहू शकतो परंतु मी ते लिहिणे टाळेल. मला अस वाटत एवढ्याने तुम्हाला समजलं असेल. विश्वात अनगिणद तारे आहेत. वेळ आणि मेहनत घेतल्यास कोणत्याही ठिपक्यांना आपण कोणत्याही तारकांसोबत जोडू शकतो. जरी आपण बेटीने त्रिआयामी नकाशा पहिला यावर विश्वास ठेवला तरीही तिने तीन वर्षांनंतर तो दुआयमात काढल्यावर त्यात चूका झाल्या असण्याची शक्यता दाट आहे. इतके वेगवेगळे अनुमान निघत आहेत यावरून आपल्याला समजते की हा नकाशा चुकीचा आहे व त्यात तपशीलवार माहितीचाही अभाव आहे. त्यामुळे या नकाशाला पुरावा मानणे चुकीचं ठरेल.


बेटीचा ड्रेस 

आणि शेवटी बेटीने घातलेल्या ड्रेस बद्दल. हा ड्रेस तिने कपाटात ठेवला आणि दोन वर्षांनंतर बाहेर काढला. त्यावेळी तो गुलाबी धुळीने भरला होता असं तिने सांगितले. १९९० ते २००० या दोन दशकांत तो वेगवेगळ्या गटांनी तपासला. त्यावेळी यावर कोणतीही गुलाबी धूळ नव्हती परंतु काही ठिकाणी त्यावर डाग दिसत होते. Pinelandia Biophysics Laboratory of Grass Lake, Michigan ने या ड्रेसवर 'विसंगत' जिवाणू असल्याचं सांगितलं होतं. हे ऐकायला भारी वाटत पण निकाल वाचल्यावर वेगळंच चित्र समोर येत. त्यात अस लिहिलं होतं की 'ड्रेस वरील डाग पाण्यात गेल्यावर जास्त प्रमाणात ऊर्जा उत्सर्गीत करतात' डाग न लागलेल्या जागेपेक्षा. हे वाक्य पूर्णपणे खोट आहे आणि त्याला वैज्ञानिकरित्या काहीही अर्थ नाही. यांनंतर लक्षात घ्या की या लॅब च मुख्य काम हे क्रॉप सर्कल्स मधून माती व गवत काढून त्याचा अभ्यास करण्याचं होत. त्यातही त्यांनी काहीही भलती सलती अवैज्ञानिक अशी अहवाले तयार केली होती जी खूपच हास्यास्पद होती. हे सगळं समजल्यावर या पुराव्याचीही खर असण्याची शक्यता शून्य होऊन जाते. 

बाकी गाडीत असलेले चमकणारे डाग, गाडीजवळ कंपस काम न करणे, बार्नी च्या बुटांची झीज या सगळ्या पुरावे म्हणून संबोधलय जाणाऱ्या गोष्टीही खोट्या आहेत. याचा मुळीच असा अर्थ नाही की त्यांचं अपहरण हे झालंच नाही. ते झालं असेल परंतु ते सिद्ध करायला आपल्याकडे तशे पुरावे नाहीत. 

चौथी थिअरीत अस म्हंटल जात की हिल दाम्पत्याचा १९ सप्टेंबर चा अनुभव आणि त्यांनंतर घडलेल्या घटना यांना वेग वेगळं बघितलं जावं. या थिअरी बद्दल मी पुढच्या भागात बोललो आहे. 

  • माझं मत

बेटी आणि बार्नी हिल इनसिडेंट सारख्या नावाजलेल्या घटनेकडे बघताना आपल्यात पूर्वमानस नसणे कठीण आहे. मी जेव्हा ह्या लेखाबद्दल काम करण्यास सुरुवात केली तेव्हा मला वाटलं होतं की मला या केसबद्दल ठाऊक आहे. माझा असा विस्तारित समज होता की बेटी ही खरी सूत्रधार होती व बार्नी हा स्वेच्छेने तिच्या हो ला हो करत होता. आणि हेही वाटले होते की हे दोघे फक्त प्रसिद्धीसाठी मुंगीचा डोंगर करत होते. पण मी पूर्णपणे चुकीचा ठरलो.
 
संमोहणातून येणारे 'पुरावे' हे परग्रहींकडून झालेल्या अपहरणाचे पुरावे नाहीत आणि ज्याच्या डोक्यात आधीपासूनच परग्रही हा विचार असेल त्यालाच ते परग्रहींकडून झालेल्या अपहरणाचे पुरावे वाटतील. एका अनुभवी मानसोपचारतज्ञाने या पुराव्यांना स्वप्नांतील माहिती बोलून निकालात काढले आहे. त्याने संमोहन सत्रे संपण्याआधीच हे सगळं हिल दाम्पत्यास सांगितलं होतं. आणि तरीही जॉन ग. फुलर ने हे महत्वाचे भाग वगळून एक सुप्रसिद्ध अस पुस्तक प्रकाशित केलं. पण तरीही फुलर ने बोलल्याप्रमाणे जर हे महत्वाचे भाग पुस्तकात टाकले असते तर हे पुस्तक पुस्तक म्हणून राहिलं नसतं. आणि मला नाही वाटत The Interrupted Journey या पुस्तकाशिवाय या घटनेला आणि या विषयाला इतकी प्रसिद्धी आणि लोकप्रियता प्राप्त झाली असती. तारका नकाशा, तो ड्रेस आणि इतर भौतिक पुरावे हे पुरावे म्हणून अतिशय निकृष्ट आहेत. ऐकूनच बोलायचं झालं तर हिल दाम्पत्याचं परग्रहींकडून अपहरण झालं याबद्दल कोणतेही विश्वासकरण्याजोगे खुणा अथवा पुरावे हयातीत नाहीत.


हि संस्मरणीय फळी रूट ३ वरील तो भाग दर्शवते जिथे बेटी आणि बार्नीला UFO च दर्शन झालं होत.
परंतु मला कोणीही 'सिगार च्या आकाराच्या यानाचा' उल्लेख केलेला आठवत नाही.  

आपलं अपहरण झालं असं बार्नीला वाटत असेल याबद्दलही मला खात्री नाही. त्याला याबद्दल काय वाटत होतं हे इतरांना समजण्यासाठी त्याने या घटनेबद्दल कुठेही काही लिहून ठेवलेलं आढळत नाही. परंतु, तुम्हाला त्याने १९६६ ला दूरदर्शनवरील  मुलाखतीत UFO खऱ्या आहेत का या प्रश्नावर उत्तरलेलं ते वाक्य आठवतंय? 

"मला वैयक्तिकरित्या याच्याशी काहीएक घेणं-देणं नाही."

एक व्यक्ती ज्याला वाटते की आपलं परग्रहींनी तबकडीत नेऊन अपहरण केलं त्याच्याकडून हे अस उत्तर अपेक्षित आहे का? मला नाही वाटत, पण बार्नीचा UFOs कडे पाहण्याच्या दृष्टिकोन हाच होता असे दिसून येते. तुम्ही जर बार्नीच्या The Interrupted Journey पुस्तकाच्या प्रकाशनांनंतरच्या मुलाखती बघाल तर हे समजून येईल की त्याला UFOs बद्दल बोलण्यात मुळीच रस नव्हता. त्याला या विषयाची ना भीती वाटत होती ना त्याने कधी तो टाळण्याचा प्रयत्न केला पण तो या विषयाला कंटाळवाणा विषय मानत असावा. त्याला फक्त नागरी हक्क व अधिकार आणि सामाजिक न्याय याबद्दल बोलायलाच आवडत असे (जे त्याची UFO संबंधी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींना आवडत नसे).

याउलट बेटीला पूर्ण विश्वास होता की त्यांचं परग्रहींकडून अपहरण झालं होतं आणि संमोहणानंतर तिचा यावरील विश्वास अजून मजबूत झाला. तिने डॉ. सिमोन यांचे निकशसुद्धा नाकारले. बार्नीच्या मृत्यूनंतर बेटी भ्रमित होत गेली आणि आणखीन UFO दर्शन मिळण्याच्या हव्यासापोटी कोणत्याही गोष्टीला UFO मानायला लागली. यात ती असंही म्हणायला लागली की UFO या तिच्याशी मानसिकरित्या संपर्क करतात म्हणून त्या तिलाच दिसतात आणि जाणवतात. हे बोलणं चुकीचं वाटेल परंतु १९६८ मधील बेटीच्या कोणत्याही विधानाला गंभीररीत्या घेणे खूपच कठीण होऊन जाते.)

तर मग आता काय उरतं? आता आपल्याकडे फक्त १९/२० सप्टेंबरला दिसलेली विचित्र वस्तू आणि घटना व प्रसिद्धीच्या झोतात येण्यापूर्वीची हिल दाम्पत्याची वर्तवणूक हेच उरत. आणि या घटनेतून आपण त्या अपहरण, परग्रही आणि उडती तबकडी या गोष्टी बाजूला काढल्या तरीही एक रोचक रहस्य आपल्याकडे राहते.

मला यात काही शंका नाही वाटत की बार्नीने व्हाइट माउंटन्स वर काहीतरी विचित्र वस्तूला उडताना पाहिले. काहीतरी इतकं विचित्र की ज्यामुळे तो घाबरला, अस्वस्थ झाला आणि पुढील काही वर्षांसाठी आपण ज्याला Post Traumatic Stress Disorder (PTSD) म्हणतो त्याची लक्षणं दाखवू लागला.वरवर बघितल्यास त्याच UFO दर्शन जरा मूर्खासारखं वाटते- एक मोठं यान ज्याच्यावरील खिडक्यांतून तो आतमधील आकृत्या घाई घाईने काहीतरी करत आहेत हे तो पाहू शकत होता. टोकांवर लाल दिवे असलेले पंखं जे यानाच्या आतून बाहेर सरकत होते. हवेत एका ठिकाणी आवाज न करता उडत राहायची आणि लगेच हालचाल करायची क्षमता. आतमध्ये चमकते काळे कपडे व टोप्या घातलेले कामगार, ज्यातील एकजण बार्नीकडे बघून स्मितहास्य करत होता. स्मितहास्य करतानाच त्याने एक कळ ओढून पंख पसरवले. यात तिळमात्र शंका नाही की बार्नीला स्वतःला सुद्धा हा देखावा सांगण्यास मूर्खासारखं वाटत असेल. यूएस एअर फोर्स मेजर ज्यांनी बार्नी सोबत चर्चा केली त्यांनीही दोन दिवसांनंतर खालील नोंद लिहून ठेवली:

''त्यांनी पुढे अशी म्हंटल की आता ह्या घटनेकडे पाहताना ती जितकी विलक्षण वाटते तितकीच हास्यास्पदही वाटते. त्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये की अशी काही होऊ शकत, घडू शकत. पण त्याचबरोबर ते असेही म्हणतात कि त्यांनी दोघांनीही ही घटना अनुभवली असल्यामुळे ती खरी असण्याची शक्यता वाढते.''

घटनेत विचित्रपणा असूनदेखील ( आणि कदाचित यामुळेही की जर तुम्हाला काही खोटं नाटं कथानक बनवायचं असतं तर तुम्ही यापेक्षा विश्वासार्हच काहीतरी बनवलं असतं) मला असं वाटत की बार्नीने जे काही पाहिलं त्याची प्रामाणिकपणे खरी आणि तंतोतंत अशी माहिती दिली. त्याने सांगितलेली माहिती सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी बोलतानासुद्धा तंतोतंत राहिली. हा सगळा प्रकार चालू असताना त्याची वर्तवणूक ही एका प्रामाणिक, हुशार, आणि तर्कवादी माणसाची होती जो त्याने पाहिलेल्या गोष्टीशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु जी त्याच्या विचारांच्या साच्यात बसत नव्हती. त्याने कधीही प्रसिद्धीचा हव्यास केला नाही आणि त्याने कोणाला UFOs मध्ये विश्वास ठेवण्यास संगीतल्याचंही कधी दिसलं नाही. डॉ. सिमोन ज्यांनी स्वतः अपहरण सौ प्रतिशत घडलेल नाही असं मानलं होतं तेही खरी UFO दर्शनाची घटना घडली होती हे मानत होते. बार्नीने काय पाहिले असेल किंवा काय पाहिले असा विश्वास ठेवला असेल याचा मी विचारही नाही करू शकत. त्याने दिलेलं विवरण हे इतकं खोलवर आहे की त्याला आपण विमान किंवा हेलिकॉप्टर (किंवा गुरू ग्रह) बोलून खोडुन नाही काढू शकत.पण ते नक्कीच काहीतरी इतकं विचित्र आणि भयावह होत की ज्यामुळे त्याला मनात खोलवर मोठा धक्का बसला. हा धक्का तिथून गाडी चालवताना ही तसाच होता आणि यानंतर त्याने जगलेल्या उर्वरित आयुष्यातही.



या केससंबंधीत माहितीचा तपास करताना मी फक्त एकदाच जोराने हसलो आणि तेही कधी तर जेव्हा यूएस एअर फोर्स ने बार्नीने काय बघितले याचं दिलेलं उत्तर वाचलं तेव्हा. ते जे काही होते ते गुरू ग्रह नव्हतं हे नक्की. आणि येथेच आहे ह्या रहस्याचा आत्मा. सप्टेंबरच्या त्या अंधाऱ्या रात्रीत व्हाइट माउंटन्समध्ये एका पुरुषाचं आणि त्याच्या पत्नीचं आयुष्य त्यांनी बघितलेल्या कोणत्यातरी गोष्टीमुळे न भूतो बदलून गेलं. कदाचित काहीतरी बघितल्याचा त्यांनी फक्त विचार केला त्यामुळेही. हे एक साधस व मेहनती प्रेमी युगल होत. याआधी त्यांनी कधीही वेडेपणा, वेंधळे विचार, मानसिक आजार, अमली पदार्थांचे सेवन किंवा इतर काहीही केले नव्हते ज्यामुळे त्यांना असला भ्रम झाला असेल. घटना घडली तेव्हाही आणि त्याच्या चार वर्षांनंतरही ते या घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते. परंतु या घटनेचा त्यांनी कधीही प्रसिद्धी अथवा पैसे कमवण्यासाठी वापर केला नाही. खरंतर ती आपल्यासारखीच साधी माणसं होती, इतर कोणत्याही साध्या माणसाने अशा परिस्तिथीत जे काही केलं असतं त्यांनीही तेच केलं. जर त्यांना पूर्ण घटना घडल्याचा भासच झाला असेल तर तो आपल्यापैकी इतर कोणालाही होऊ शकतो. जर त्यांनी जे सांगितलं तेच जर पाहिलं असेल तर आपल्यापैकीही कोणाला तसलं काही दिसू शकतं. आणि याचमुळे जरी तुम्ही या घटनेतील मूर्खपणा आणि अतार्किक गोष्टी काढल्या तरीही येथे एक विलक्षणीय आणि महत्व देण्याजोगं रहस्य टिकून राहतं. 

या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी: 

The Interrupted Journey: Two Lost Hours Aboard a Flying Saucer, १९६६,  John G. Fuller. 


Captured! The Betty and Barney Hill UFO Experience: The True Story of the World’s First Documented Alien Abduction, २००७, Stanton T Friedman आणि Kathleen Marden.


Kathleen Marden UFO. कॅथलिन मार्डेनची वेबसाईट व ब्लॉग , कॅथलिन ही बेटी व बार्नीची पुतणी आहे. ती त्यांच्या अपहरणाच्या घटनेत विश्वास ठेवते आणि त्याचा पाठपुरावा करते. 


अनुवादकाच्या सूचना: 

मी या केससंबंधी खूपच गोंधळलेलो आहे आणि मला ते खरं कि खोटं आहे याबद्दल बोलायचं नाही. माझे UFOs बद्दल चे विचार २०१७ नंतर पूर्णपणे बदलले आहेत. त्याबद्दल मी वेगळं काहीतरी लिहून तुमच्याशी बोलेल. 

इथे मला फक्त एकच बोलायचं आहे ते असं की जेव्हा जेव्हा मी ह्या घटनेकडे पाहतो तेव्हा मला खूप वाईट वाटत. बार्नी आणि बेटी दोघांसाठीही. बार्नीने इतके सारी कामं केली आणि ज्ञानी लोकांना जरी त्याच्या कामाबद्दल माहिती असेल तरीही बरीच लोक त्याला अमेरिकेत, त्याच्या कर्मभूमीत,  ह्या UFO घटनेमुळे ओळखतात. त्याची लेगसी हे त्याच समाजकाम नाही तर हा विचित्र प्रसंग आहे असं सगळ्यांना वाटत. बार्नीला त्याने देशासाठी दिलेल्या योगदानासाठी त्याचे आभार मानण्यासाठी शासनाने प्रेसिडेंट जॉनसन यांच्या राष्ट्राअध्यक्षपदावर रुजू होण्याच्या समारंभात त्याला बोलावले होते. त्याने खूप आजार व त्रास सहन केला आणि अकाली निधनही झालं. बेटी बिचारी त्याच्या जाण्यानंतर इतकी एकटी पडली की तीच संतुलन बाधित झालं. विचार करा जेव्हा लोक तिच्यावर टीका करत असतील तेव्हा तिला किती एकटं वाटत असेल. UFO किंवा इतर पॅरानॉर्मल घटना (त्या खोट्या असोत किंवा खऱ्या) तुम्हाला पैसे किंवा प्रसिद्धी देत नाहीत. ते फक्त तुम्हाला मूर्ख ठरवण्यासाठी उपयोगात येतात. देवाधर्मावर विश्वास ठेवणं जर नॉर्मल आहे तर कमीत कमी आपण ज्यांनी ह्या घटना अनुभवल्यात किंवा ज्यांना वाटत कि त्यांनी ह्या घटना अनुभवल्यात त्यांचं हसू न करता कमीत कमीत मन मोकळं ठेवून त्या ऐकून तर नक्कीच घेऊ शकतो. लोकांना एकटं पडून देऊ नका, ते दुखी होतात, इतरांपासून तुटतात आणि आत्महत्या करतात. 

NAACP अजूनही नागरी हक्कांसाठी कार्यरत आहे, त्याबद्दल माहिती साठी


NICAP महत्वाच्या UFO archives पैकी एक आहे. जरी सगळ्याच रिपोर्ट्स extraterrestrial जरी नसल्या तरी तुम्हाला drones, baloons, birds, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, अडवान्सड प्लेन्स यांच्या UFO म्हणून केलेल्या घटनाही दिसतील.  


MUFON चा जरीही या लेखात उल्लेख नसला तरीही UFOs च्या माहितीसाठी मी तिचा वापर करतो. येथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या UFO sightings चे उल्लेख, तपास आणि निकष येथे भेटतील. तुम्ही स्वतः ही येथे कोणत्या अनोळखी उडणाऱ्या वस्तूचा फोटो टाकून तिची ओळख करून घेऊ शकता. 


रहस्य कथेवरील पुढचा लेख २५ सप्टेंबरला २०२० ला प्रकाशित होईल. तोपर्यंत चित्रपट किंवा इतर विषयांसंबंधित लेख साईट वर येतील. 

Author 

Steve MacGregor 


स्टिव्ह मॅकग्रेगर (Steve MacGregor) हे UK बॉर्न इंग्लिश लेखक आहेत. ते इतिहास, रहस्य आणि गुन्ह्यांशी संबंधित लेख व पुस्तकं लिहितात. तुम्ही त्यांची पुस्तकं ऍमेझॉन वर विकत घेऊ शकता. 


ह्या लेखाबद्दल जे काही मत असेल ते कमेंट मध्ये कळवा आणि नव्या गूढ रहस्य संबंधित लेखांसाठी साईट ला भेट देत रहा. 

माझे लेख आवडत असतील व पुढील लेखांसाठी मला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर माझ्या ऍमेझॉन अफिलिएट लिंक्स वरून शॉपिंग करा. 

ऍमेझॉन अफिलिएट लिंक

अजून रहस्य लेखांसाठी वेबसाईटला भेट देत रहा. तुम्हाला कोणत्या रहस्याबद्दल लेख हवा असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये तसं कळवा. 

तोपर्यंत माझ्या YouTube Channel ला भेट देऊन वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल जाणून घ्या!


Comments

Popular Posts

कोसला समीक्षा अणि विश्लेषण || Kosla Book Review & Analysis

Why you need to watch Asur? || Asur Webseries Review

दयातलोव पास चे रहस्य || Dyatlov Pass Incident in Marathi